सह्याद्रीचे धुरंधर
त्याने विडा उचलला आणि स्वराज्यावर चाल करून आला. त्याने दिसतील ती गावे बेचिराख केली, मंदिरे तोडली, अगणित माणसांची कत्तल केली. पण त्याला माहीत नव्हते की तो एका मृत्यूच्या सापळ्यात अडकत चालला होता. हा सापळा रचला होता शिवाजी महाराजांनी आणि हा सापळा रचण्यासाठी मदत केली सह्याद्रीच्या धुरंधरांनी.
योजना तयार होती. त्याला कसा कोणी आडवा करायचा हे ठरले होते. कोणती शस्त्रे वापरायची तेही ठरले होते. काय डाव टाकायचे तेही ठरले होते. फक्त ठरले नव्हते ते म्हणजे ठिकाण. हे ठिकाण ठरवण्यासाठीच महाराजांचे गुप्तहेर चोहूबाजूंना सह्याद्री कड्यांवर फिरत होते. असाच एक प्रबोधिनी गुप्तहेर गट पुण्यनगरी वरून ब्रह्म अरण्याच्या दिशेने निघाला. ही मोहीम खास होती. त्यामुळे या मोहिमेसाठी अश्वही उच्च दर्जाचे मिळाले होते. जे वाऱ्याशी नव्हे गार वाऱ्याशी बोलत होते. पुण्यनगरी जेव्हा गाढ झोपी गेली होती तेव्हाच या गटाने गावाची वेस ओलांडली आणि ब्रह्म अरण्याकडे कूच केले. अख्खा दिवस हा उन्हात जंगलात फिरण्यात जाणार होता. त्यामुळे वाटेतच गटाने न्याहारी करून पुढची वाट धरली.
सूर्योदय झाल्यावर थोड्याच वेळात गट जोर गावी पोहोचला. आपण कोणत्या मोहिमेवर आलेलो आहोत हे कोणालाही समजून न देण्यासाठी हा गट अतिशय सहजतेने गावकऱ्यांमध्ये मिसळायला. दोन गावकऱ्यांबरोबर मैत्री करून त्यांनाही आपल्याबरोबर घेतले. त्या दोघांना घेऊन गट ब्रह्म अरण्यात शिरला. पण तेवढ्यात या अरण्याचा चौकीदार सर्प राजा समोर आला. गटाने सर्प राजाची पूजा केली आणि त्याचे आशीर्वाद आपल्या मोहिमेसाठी घेऊन ब्रह्मारण्यात पुढे वाटचाल सुरू केली. बाहेर चैत्राचे ऊन मी म्हणत होते पण या अरण्यात इतकी घनदाट झाडी होती की सूर्याची किरणे देखील जमिनीपर्यंत पोहोचत नव्हती.
थोड्याच वेळात थोडा चढ चढून गट भैरोबा मंदिरापाशी पोहोचला. भैरोबाचे दर्शन घेऊन काही शिलेदारांनी तेथील कड्यावरून आजूबाजूच्या सह्याद्रीचे निरीक्षण केले आणि ते महाराजांच्या मोहिमेसाठी कसे उपयुक्त ठरेल याची नोंद केली. इथे दिवसाचा अर्धा टप्पाच झाला होता. गट पुढे निघाला पण काही ठिकाणी मार्ग कळत नव्हता. अशा वेळेस ज्या जटायू ने रामाला मदत केली त्याच जटायुने असंख्य फुलपाखरांचे रूप घेऊन या गटाला योग्य दिशा दर्शविली. फुलपाखरू रुपी जटायूचे आभार मानून गट पुढे निघाला. पण पुढे बघतो तर काय एक कातळ कडा आ वासून उभा होता. मोहीम पूर्ण करायची तर या कातळ कड्यावर विजय मिळवणे अत्यावश्यक होते. हे शिलेदारही पूर्ण तयारीनिशी आले होते. काहीजण कातळ कड्यावर पटपट चढले तर काहीजणांना दोरखंडाची मदत घ्यावी लागली. हा कातळ कडा चढताना मागे खोलवर दरी होती. जर कोणाचा हात निसटला तर त्याच्यासाठी ही मोहीम शेवटची ठरणार होती. पण तरीही सर्व शिलेदारांनी प्रचंड शौर्य दाखवून कातळखडा पार केला.
थोडी विश्रांती घेऊन गट त्या कड्यावर अजून वरती चढला. तेथून प्रतापगड ते चंद्रगड असे खूप मोठे खोरे सहज दिसत होते. खाली घनदाट झाडी होती. नजर जाईल तेथे सह्याद्रीचे कोरीव कडे स्वराज्याचे रक्षण करताना दिसत होते. या सगळ्याची व्यवस्थित नोंद करून गट महाबळेश्वर क्षेत्री पोहोचला. तेथेही या गटाने गावकऱ्यांमध्ये मिसळून त्यांचा विश्वास संपादन केला आणि दुपारचे भोजन त्यांच्याबरोबरच केले.
जुने महाबळेश्वर येथे एक कृष्णाई मंदिर होते. गटाने मंदिरात जाऊन भोलेनाथांचा आशीर्वाद घेतला. महाराजांची मोहीम फत्ते होऊ दे असे साकडे घातले. हे झाल्यावर गट कोणासही न कळता पटकन जोर गावी जाण्यासाठी परत निघाला. वाटेत जंगलात गणेशाचे दर्शन घेतले. जंगलातून उतरताना गटाने महाराजांना काय अहवाल द्यायचा याची सविस्तर चर्चा केली. हे सर्व करताना गटाने आपला वेग कुठेही कमी होऊ दिला नाही आणि लवकरच ते जोर गावात पोहोचले देखील. जोर गावात पोहोचल्यावर गटाने गावकऱ्यांचे आभार मानले आणि पुण्यनगरी कडे वाटचाल सुरू केली.
या अहवालात काय लिहिले होते, हा अहवाल महाराजांपर्यंत पोहोचला की नाही, या अहवालाचा प्रमुख मोहिमेत किती उपयोग झाला या सर्व प्रश्नांची उत्तरे फक्त त्या मोहिमेमधील गुप्तहेरांनाच माहिती आहेत. तुम्हालाही अशाच एखाद्या मोहिमेमध्ये तडफदार शिलेदार होऊन सामील व्हायचे असेल तर प्रबोधिनीच्या पुढच्या भ्रमंतीला नक्की भेटूयात. तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी!
©kkdhanashree



Comments
Post a Comment