Mind-Blowing
"अगं चल ग या वेळी एखादा किल्ला पाहू "
"अरे नको रे, पाय दुखतात."
" बरं चल मग या वेळी लेण्या पाहू"
" नको रे कंटाळा येतो"
हे आमचे नवरा बायकोचे संभाषण. अर्थात त्याचे म्हणणे आपण गड किल्ले बघू आणि मी आपली नको रे, पाय दुखतात, कंटाळा येतो. कोणीच नसते, कशाला जायचे.....वगैरे वगैरे...
तर तुम्हाला समजलेच असेल..परत एकदा केलेली भटकंती.
या वेळेस, आदल्या दिवसापर्यंत जायचे का नाही हा निर्णय घेणे पावसामुळे पुढे पुढे जात होते. पण वरूण राजाची कृपादृष्टी आम्हा पामरांवर पडली आणि आदल्यादिवशी संध्याकाळी उशिरा आम्ही जायचे नक्की केले. सकाळी लवकर निघून आम्ही फक्त न्याहारीसाठी थांबा घेतला आणि तिथून जे सुसाट निघालो ते थेट आगाशिव लेण्यांच्या पायथ्याशीच थांबलो.
तर वरचा संवाद अर्थात यासाठी होता. इथे आलो आणि पायऱ्या चढायला सुरुवात करणार तर मोरराजाने 2-4 क्षणांसाठीच दर्शन दिले. ते फक्त डोळ्यांनी टिपण्यासाठीच ( मोबाईल काढून फोटो काढण्यासाठी त्याने वेळ दिलाच नाही) जवळ जवळ 5 फुटा एवढा त्याच्या पिसाऱ्याचा झुपकाच होता. डोळ्याचे पारणे फिटले ना राव!... काय सांगू काय वाटले😯 जबरदस्त! भारी! एकदम भारी! आणि भारीच ! थोडे पुढे तो परत दिसला पण झाडाझुडपात 😍
५०० पायऱ्या चढून आम्ही बौद्ध कालीन लेण्या पहायला गेलो. अतिशय स्वच्छ आणि उत्तम स्थितीत असलेल्या लेण्या पाहण्याऐवजी आम्ही फक्त वारा आणि आजूबाजूला असणाऱ्या पक्षांचे आवाज ऐकत एका पायरीवर काही वेळ बसून राहिलो. अहाहा! .... स्वर्गातच इतके सुंदर वातावरण असेल... पाऊस पडून २ दिवस झालेले, निसर्ग हिरव्या रंगाची उधळण करतो आहे.. पक्षी मनसोक्त गात आहेत.. आणि शहरापासून दूर असणाऱ्या जागी... एकाही गाडीचा आवाज नाही..जगाचा विसर पडला आहे... आणि तिथे फक्त आम्ही बाकी कोणीच नाही. फक्त निसर्ग, आणि आम्ही बस्स अजून काय हवे? असे वाटत होते इथून कुठेच जाऊ नये. पण तसे नाही ना करता येत.... मग काय एक एक लेणी पहायला सुरुवात केली. काही लेण्यांमध्ये पाणी साठले होते. काही मात्र उत्तम आणि स्वच्छ स्थितीत दिसल्या. एका लेणीत विठ्ठल रखुमाईची प्रसन्न मूर्ती होती. दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या उतरून खाली आलो.
समोरच शेत नांगरण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसले. लेकाला मी सांगितले जा बघ ते कसे नांगर चालवत आहेत. वाटले आपण जवळ जाऊन पाहू. म्हणून जरा पुढे चालत गेलो आणि आत शेतात वळलो. एका बाजूला थांबून ते बघत होतो. एक पूर्ण चक्कर त्यांची झाली आणि त्यांनी थांबवून लेकाला विचारले, " काय चालवायचा का नांगर?" तो अचंबित झाला. आणि लगेच पुढे गेला. त्यांच्या समोर उभा राहून त्याने दोर पकडला. त्यांनी चला र! असे म्हणून बैलांना सूचना दिली आणि निघाले हे नांगरायला. एक चक्कर मारून ते आले आम्ही त्या काकांना आमच्याकडचा थोडासा खाऊ देऊन मनापासून धन्यवाद दिले🙏🏻 गाडीत बसलो आणि लेक म्हणाला किती शेपूट मारले त्या बैलांनी माहीत आहे 😅 मग त्याला समजावले तू रोजचा नाहीस म्हणून. पण ते काका म्हणाले त्या बैलांना सोन्या आपला हाय तो चला...हा एक वेगळा अनुभव लेकाला मिळाला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजे अनुस्कूरा घाटाकडे कूच केली.
घाट सुरू झाला आणि आपसूक गाडी थांबवली. हा घाट आणि घाट माथ्यावरून दिसणारा निसर्ग... त्यात नुकताच पडून गेलेला पाऊस🤩 किती आणि काय काय लिहू... असो पाऊस झाला आहे, त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता 😀मला काय म्हणायचे आहे याची. ते दृश्य अहाहा!.... mind-blowing असेच होते. पुढे काही माकडे दिसली म्हणून गाडी त्यांच्याजवळ थांबवली आणि पाहिले तर माकडीणी आणि त्यांच्या पोटाला चिकटून बसलेली त्यांची छोटी छोटी पिल्ले. भारी दृश्य होते ते. आईवेडी माकडे☺️ ( सगळी कडची पिल्ले सारखीच🤣)
तिथून पुढे राजापूरमार्गे आम्ही अंबोळगडला आलो. खोलीतल्या पलंगावर पडून आम्हाला समोरच समुद्राचे दर्शन होत होते. जरा वेळ विश्रांती घेऊन आम्ही किनाऱ्यावर एक चक्कर मारली. पण यावेळी का कोणास ठाऊक समुद्र किनाऱ्यावर positive vibes मला जाणवल्या नाहीत. पाणी प्रचंड काळसर असल्याचे जाणवले. कुठे तरी काही तरी मिसिंग आहे असे वाटले. मन तयार होईना तिथे थांबायला. तरी जरा किनाऱ्यावर चक्कर मारून आलो.
मग घरगुती जेवण केले. जेवण चवीला उत्तम होते. जेवताना विषय निघाला उद्याचे काय आणि अचानक आमच्या नियोजनात आम्ही बदल केला. आमच्या ओळखीचे एक जण श्री देवेंद्र राणे हे अंजनवेल - गुहागरला राहतात. तर गुहागरला राहू आणि त्यांना भेटू असे ठरले. पहिल्यांदाच आम्ही pre booking न करता जायचे ठरवले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच अंबोळगडावर गेलो. तिथे आता काहीच गडाचे अवशेष नाहीयेत फक्त बाजूची भिंत राहिली आहे. तिथे गेलो तर स्वागताला वानरे आवर्जून बसली होती. तिथे असणारा गगनगिरी महाराजांचा आश्रम आम्ही पाहिला, प्रसन्न वाटले. दिवसाची सुरुवात छान झाली हे जाणवले. शेजारचे दत्त मंदिर पहिले, आणि मंदिरामागे समुद्र पहिला गेलो. तर समोरचे दृश्य पाहून अचंबित झालो. समोर उसळणाऱ्या लाटा जेव्हा किनाऱ्याच्या खडकांवर आदळत होत्या तेव्हा त्या २- ३ मजले उंच उसळत होत्या. बाप रे! 😲हे काय आहे, म्हणून बराच वेळ आम्ही ते पाहत थांबलो होतो. जणू त्यांची शर्यतच लागली आहे उंचच उंच उसळण्याची असे वाटले. मग जरावेळ कोणाचा दगड समुद्राच्या पाण्यात जातो या खेळाचा आनंद घेतला. परत मुक्कामाच्या जागी येऊन आम्ही न्याहारी केली. गरम गरम घावणे खाल्ली. त्यानंतर मात्र आम्ही पावले निघालो ते कुठेही न थांबता सरळ गुहागर गाठू या उद्देशाने. पण एक छोटासा धबधबा पाहून थांबलो.
जरा वेळ रेंगाळून पुढे निघालो . एक छोटासा सरबत ब्रेक घेतला.
राणे दादांनी सांगितले होते पोर्ट दाखवतो. आता हे काय म्हणून विचार करून आधीच डोक्याचा भुगा करून ठेवलेला. मग विचार केला जाऊ तेव्हा पाहू. त्यांनी हसतमुखाने आणि थंड कोकम प्लस मोजितो सरबताने आमचे मनापासून स्वागत केले. आम्हीही सुखावलो. जरावेळ त्यांच्या ऑफिस मध्ये विश्रांती घेऊन आणि अर्थात 👟 शूज घालून आम्ही त्यांच्या गाडीने खाली पोर्टकडे जायला निघालो. एका छोट्याशा मुंगुसाने आमचे तेवढ्यात लक्ष वेधले. पटकन रस्ता ओलांडून ते बाजूच्या झाडीत पसारही झाले. समोरचा छोटासा घाट उतरून समोर जाणाऱ्या रस्त्याकडे नजर गेली आणि समजले हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. गाडी समुद्रावरून आत जाणाऱ्या १.८ किलो मीटरच्या रस्त्यावरून धावत सरळ जात होती. एके ठिकाणी थांबली तसे पुढे आम्ही चालत निघलो. काय आहे समोर याची उत्सुकता मनात घर करून होती त्यामुळे कधी एकदा बघतो असे झाले होते. सरळ चालत गेलो तसे त्यांनी दाखवले जहाज कसे इथे उभे करतात, समोर समुद्रात भिंत कशी बांधली आहे. १०० फूट खाली आणि वर ७- ८ फूट ही भिंत आहे.😲 ऐकून नवलच वाटले. जहाजाचा दोर कसा बांधतात? वगैरे वगैरे. मग आम्ही डेक वर गेलो. सिक्युरिटी किती टाईट आहे हे मात्र आल्यापासून पदोपदी जाणवत होते. जे टब
देवेंद्र दादांकडेच आम्ही मुक्कामाला गेलो. जाताजाता लाईट हाउस पाहू म्हणून गेलो पण ते बंद असल्याचे समजले. मग काय परत येताना करवंदाची जाळी दिसली. उतरून करवंद तोडून खाल्ली. पानाचे द्रोण केले. त्यातून करवंद घरी आणली. रात्रीचे जेवण दादांच्या ओळखीच्या मेसमधे केले. रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्ही न्याहारी करून निघालो अर्थात न्याहारीसाठी आम्ही सकाळी सकाळी ८ वाजताच त्या मेसमधे म्हणजेच काऊंकडे गेलो. गरम गरम डोसे खाऊन अंजनवेलचा आणि दादांचा निरोप घेऊन आणि सोबत ६- ७ शहाळी घेऊनच आम्ही निघालो.
पुढे चिपळूण रस्त्याला लागलो आणि वरुण देवांनी आम्हाला गाठलेच. मग काय अख्या रस्ता त्यांचा अन् आमचा लपंडाव सुरूच होता. पोलादपूरपर्यंत आलो आणि सरळ ताम्हिणी मार्गे जाऊ असे बोलणे सुरू होते पण एक मन म्हणत होते आता इथं पर्यंत आलो तर जाऊ महाबळेश्वर मार्गे आणि मॅप्रो ला जाऊन जरा सँडविच चा आनंद घेऊयात. असे सुरू असतानाच लेकाने फर्मान सोडले "बाबा महाबळेश्वर कडून चला मला मॅप्रोमधे जायचे." झाले लगेच गाडीने उजवीकडचे वळण घेतलेच. मग काय अंबनेळी चढायला सुरुवात केली. पाऊस पडायला झालेली सुरुवात आणि समोर हिरवाईने नटलेले जावळीचे खोरे. नजर जाईल तिकडे फक्त सौंदर्य आणि सौंदर्यच दिसत होते. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी या जावळीच्या खोऱ्याचा विचार तेव्हा का केला असेल? हा प्रश्न जरी मनात आला तरी उत्तर मात्र समोर बघतच क्षणी कळून येत होते. ट्रॅफिक नव्हते पण रस्त्याचे एक बाजूने काम सुरू असल्यामुळे जरा सावकाश गाड्या पुढे जात होत्या. १ - २ ठिकाणी ट्रॅफिक लागले. पण लगेच पुढे सरकलो.
झाडांच्या कमानी खालून जाताना, पावसाची रिपरिप पाहताना ,निसर्गाचा आनंद मनसोक्त घेत आम्ही पुढे जात होतो. महाबळेश्वरमध्ये पोहोचलो आणि पुढे पाचगणीकडे जायच्या रस्त्याला वळलो आणि झाले ; जे ट्रॅफिक सुरू झाले की काय सांगू. मुंग्या पण आम्हाला ओव्हरटेक करून पुढे जात होत्या पण आम्ही मात्र कणाकणानी पुढे सरकत होतो.
जरा वेळापूर्वी हे सगळे वातावरण खूप सुंदर भासत होते. पण जसे ट्रॅफिक सुरू झाले तसे अरे देवा! काय हे!🤷🏻 असेच मनात संवाद सुरू होते. हळू हळू करत आम्ही कसे बसे मॅप्रो गार्डन मध्ये प्रवेश केला. सँडविच आणि icecream वर ताव मारत मन आणि आत्मा शांत करत पुढे निघालो. पसरलेला पसरणी ओलांडून पुढे वाईला आलो. तर परत रस्त्याचे काम सुरू. पुणे सातारा महामार्गापर्यंत आम्हाला यायला वेळ लागला. मग जरा हुश्श झाले. तर पुढे महामार्ग ही diversion मुळे त्याच स्थितीत 🤷🏻🤦🏻 कसे बसे पुण्यात पोहोचलो तर भरीस भर सिंहगड रस्त्यावर ट्रॅफिक. अशी दिवसभराची मज्जा घेत ,आमची स्वतः ची झालेली मज्जा पाहत आणि मुख्य ट्रॅफिक ची मज्जा घेत आम्ही सकाळी ८.३० निघालेलो रात्री ८ वाजता पुण्यात सुखरूप येऊन पोहोचलो.
©kkdhanashree










Comments
Post a Comment