आहुपे मधील गोलमेज परिषद
आपल्या, हो आपल्याच, पुण्यातील काही मंडळी भ्रमंतीला निघाली की काही जणांचा सूर असतो की "काय ते तंगडतोडीला जायचंय. रविवारची पहाटेची झोप सोडायची, घरून निघायचे, घाट उतरायचा आणि तो घाट किंवा दुसरा एखादा घाट चढत परत वरती यायचे. ही तंगडतोड सांगितली कोणी? यात काय सुख मिळणार आहे?" अशा लोकांचे काय करायचे, त्यांना काय उत्तरे द्यावीत, त्यांना सुखाची व्याख्या काय सांगावी यावर चर्चा करण्यासाठी एक गोलमेज परिषद ज्ञानप्रबोधिनीच्या पालकांनी आहुपे घाटात आयोजित केली होती.
घाट पुणे शहरापासून थोडा लांब. त्यामुळे मंडळी पहाटे साडेचारलाच पुण्यावरून निघाली. भारत सरकारने संविधानात वजा २० अनुच्छेदात नमूद केल्याप्रमाणे यावेळीही वाहन चालक शुमाकरच होता. पण त्याचे कौशल्य बघायला जनता जागी राहिली नाही. त्यामुळे तो थोडासा नाराजच झाला होता. तरीही त्याने वेळेत आहुपे घाटाच्या सुरुवातीला सर्वांना सुखरूप सोडले.
झोपेतून उठल्यावर डोळे उघडल्यावर समोर हिरवाईने नटलेला प्रदेश, श्रावणात नेहमी प्रमाणे डोंगरांना भेटण्यासाठी खाली आलेले ढग, शेतातील डोलणारी पिके हे बघण्याचे सुख काही निराळेच. हे कमी की काय पण हे बघता बघता वेळेवर, कोणाच्याही मागे न लागता पोहे आणि चहा आपल्या पुढ्यात आयते यावे हे सुख तर काही वेगळेच असते.
अशी नितांत सुंदर सुरुवात करून मंडळी वाटाड्याबरोबर घाट चढायला लागली. घाटाच्या सुरुवातीलाच आजूबाजूला बरेच डोंगर दिसत होते. ते डोंगर कुठले, तो गड कुठला, तो कडा कुठला यावर चर्चा आलीच. नेहमी प्रमाणे अस्मादिक निव्वळ श्रोते. गुगल मावशीची ही मदत घेतली जात होती. आणि सरते शेवटी प्रत्येक डोंगराचे बारसे झाले आणि मंडळींनी घाट चढायला सुरुवात केली.
आता घाटच तो. तो थोडीच असा सपाट असणार. चढण अंमळ जास्तच होती. पण मध्ये मध्ये पाण्याचे प्रवाह वाहत होते आणि हिरवीगार झाडे डोलत होती त्यामुळे ती चढण खूप सोपी वाटत होती. मंडळी झऱ्यातील पाण्याचा आस्वाद घेत पुढे पुढे जात होती. कोण काय करत आहे यावर गोरक्ष आणि मच्छिंद्र लक्ष ठेवून होते. त्यांनीच पुढच्या फळीला हळूच सांगितले की मागच्या फळीने गुपचूप गुलाबजाम खात गोलमेज परिषद चालू केली आहे. पुढच्या फळीलाही गुलाबजाम पाहिजे होते आणि गोलमेज मध्ये सामील व्हायचे होते त्यामुळे पुढची फळी मागच्या फळीला शोधायला परत खाली उतरली आणि त्यांना शोधून गोलमेज परिषदेत सामील झाली. या मागच्या फळीला शोधणे आणि त्यांना रस्त्यावर आणून परत वरती घेऊन येणे यातही काही वेगळे सुख आहे बरं का. त्यांना शोधताना पुढची फळी भरपूर आवाज देत होती शिट्ट्या मारत होती. पण खालच्या फळीला ऐकू जात नव्हते. हे काही विशेषच. हे जंगलच काही विशेष. माणसाचा आवाज येथे काहीही करू शकत नाही. दुसऱ्या डोंगरावरचा हुप्प्याचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकू येईल पण माणसाचा आवाज दहा फूट वीस फूट खालपर्यंत सुद्धा नीट जात नाही. माणूस किती क्षुल्लक प्राणी आहे याची प्रचिती इथे येते.
आता सर्वच मंडळी एकत्र जात असल्याने नकळत गोलमेज परिषदेत बऱ्याच जणांचा शिरकाव झाला. या परिषदेत वेगवेगळे विषय हाताळले गेले. सुख म्हणजे काय यावर जास्त चर्चा न होता दोन गांधी की अडीच गांधी, गुलाबजाम की दगड, सोने की चांदीच्या विटा, अभिव्यक्ती मध्ये एक नवीन प्रवेश, अफू तस्करी करणारी टोळी इत्यादी विषयांवर चर्चा जास्त रंगली. ही चर्चा करता करता घाट चढून मंडळी वरती पोहोचली देखील. पण गुलाबजाम काही पिशवीतून बाहेर आले नाहीत.
इतका वेळ गोरक्ष आणि मच्छिंद्र कडे मान वरती करून बघावे लागत होते तेच घाट चढून गेल्यावर त्यांना बघण्यासाठी मान खाली करावी लागत होती एवढा तो आहुपे घाटाचा चढ. वरती गेल्यावर आहुपे गावाचे पठार लागले. पूर्ण पठार पावसाळ्यामुळे हिरवे गार दिसत होते. वरतून कोकण परिसर आणि घाट माथ्याचा परिसर खूप छान दिसत होता. आहुपे गाव थोडेसे लांब पण त्यातील कौलारू घरे, मंदिर, गुरे चारायला आलेली माणसे दिसत होती.
एवढा घाट चढून आल्यावर थोडी पेट पूजा तो बनती है असे म्हणत लोकांनी घरून आणलेला खाऊ फस्त केला आणि येतोबाची वाट पकडली. कोकणातून वरती घाट माथ्यावर आल्यावर आपण बरीच उंची गाठली आहे असे वाटते पण यावरही अजून दोन छोटे डोंगर चढून येतोबाला जाता येते. ही वाटही छान अशी शेताच्या कडेकडेने मध्येच झाडीतून अशी वरती जात होती. थोड्यावेळाने सर्व मंडळी येतोबाला पोचली. इकडचे दृश्य आहुपे कमी की काय असेच वाटत होते. येतोबाच्या मंदिरापासून समोर सिद्धेश्वर ध्यान लावून बसला होता. त्याच्या ध्यानात व्यत्यय न यावा म्हणून त्याचे मित्र ढग हे आजूबाजूला लक्ष ठेवून होते. दूर शंकर महादेव भीमाशंकर वरून सिद्धेश्वराकडे नजर ठेवून होते. हे असे विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्याचे सुख सर्वांनी अनुभवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतका छान निसर्ग आणि तो अनुभवताना आजूबाजूला जसे पुण्याच्या आजूबाजूला दंगा करणारी टोळकी मिळतात तसे इथे कोणीच नव्हते. सर्व मंडळींना आपल्या परीने आपल्या इच्छेने कोणाचाही व्यत्यय मध्ये न येता तो निसर्ग बघता आला, अनुभवता आला. सिद्धेश्वराप्रमाणे आपल्यालाही ध्यान जमते का हा प्रयत्न करून लोकांनी येतोबाचे दर्शन घेतले. येतोबा हे इथले एक जागृत देवस्थान. मंदिर छान ठेवले होते शांत सुंदर. त्याचे दर्शन घेऊन मंडळी आहुपे गावाकडे परत निघाली.
परत जाता जाता वरूण राजाने ही तुम्ही पावसाळ्यात भ्रमंती करत आहात याची जाणीव देण्यासाठी पावसाची एक सर आणली. मजल दरमजल करत मंडळी शेवटी गावात पोहोचली. आता एवढी तंगडतोड केल्यावर थोडे ताजेतवाने होऊन मंडळी बसली आणि समोर भाजी भाकरी भात आमटीचे जेवण. वा! हे सुखही प्रत्येकाने अनुभवायलाच पाहिजे. जेवता जेवता आजूबाजूचा परिसर हा मध्येच ढगात जात होता तर मध्येच ढग बाजूला होऊन आजूबाजूचा हिरवागार निसर्ग छान दिसत होता. या जेवणाने गोलमेज परिषदेची सांगता झाली आणि सुख न मोजता ते अनुभवणे हेच जास्त महत्त्वाचे असे ठरवून मंडळी गुलाबजाम न खाताच पुण्याकडे परत जायला निघाली.
डेला नंतर गुलाबजाम ही पण एक दंतकथाच राहणार की हे सुख प्रत्यक्षात उतरणार याचे उत्तर शोधण्यासाठी मंडळींनी कृत्रिम बुद्धिमत्तेची आणि पु. ल. आणि व. पु. यांनी लिहून ठेवलेल्या बऱ्याच संदर्भ ग्रंथांची मदत घेतली. पण यावर उत्तर मिळणार आहे की नाही हे पुढची भ्रमंतीच ठरवेल. तर भेटू अशाच पुढच्या एका भ्रमंतीला.
©kkdhanashree






Comments
Post a Comment