कमळगड आणि बरेच काही....

 

नमस्कार,

दर वेळी काही तरी नवीन...

ब्लॉग लिहिणे खरंचच सोपे नाही..

यावेळी घेतलेला अनुभव. क्षणभरासाठी डोळ्यात पाणी आणणारा, विचार करायला लावणारा होता.

यासगळ्या गोष्टी मी अनुभवल्या. अर्थात निम्मित्त आमचा JPP पालक किल्ले भ्रमंती गट. किल्ले भ्रमंती गटावर नियोजन मंडळाचा मेसेज आला. यावेळी कमळगडचा ट्रेक करायचा. ग्रुप तयार झाला. वय सांगून, गाडी बुक झाली. ट्रेक चे नियोजन होऊन आम्हाला अंदाजे वेळापत्रक पाठवले गेले.... आणि आम्ही तयारीला लागलो. 🎒🦯🧢🥾

रविवारी पहाटेच आम्ही निघालो ट्रेकला. सकाळचे शांत आणि नयनरम्य वातावरण , आजुबाजूला शेती, मोर, धोम धरण आणि गावाकडची सकाळी. अहाहा!

 ७ बाबा पालक आणि मी ८ वी. एवढीच काय ती संख्या. AC बस मधून ट्रेक ला निघालेलो आम्ही. सकाळी ६.३० वाजता न्याहारी करण्यासाठी थांबलो. ( ताकाचे सांगू काय 🤫) 

वाई मधून वाट काढत धोम धरणाला वळसा घालून आम्ही पुढे आलो. एका आश्रमाजवळ गाडी थांबवून चढायला सुरुवात केली. चढता चढता पुढे आलो आणि सहज सोपा वाटणारा हा गड चढताना मला मात्र दिवसा तारे दाखवून गेला. मलाच उन्हामुळे त्रास सुरू झाला....मग काय हळूहळू पुढे निघालो.



पुढे वाटेत एका ठिकाणी थांबून गारेगार ताक पिऊन जरावेळ विसावा घेतला आणि निघालो म्हातारीचे दात बघायला. खरंच अगदी म्हातारीला शोभतील असेच असणारे दात मस्त दिसत होते.  पुढे आम्ही कमळगडावरची विहीर बघायला निघालो. वर चढून गेलो आणि......



समोर दिसणारा निसर्ग. 

कुठे निसर्गाची लयलूट ...सगळ काही हिरवेगार.

 तर कुठे उन्हाचा तडाखा म्हणून वाळलेली वृक्षवल्ली. 

तर वणव्याने जळणारी झाडे झुडपे.. 

हे सगळ पाहून काय बोलावे कळेना. मनात , डोक्यात खूप विचार एकाच वेळी डोकावले. खरंचच माणसाचे आयुष्यही तसेच तर आहे. कधी आनंदी, तर कधी काळजी तर कधी दुःखं..

समोरचे दृश्य पाहून मन हेलावले. खूप काही या दृश्याने मला सांगितले. कदाचित जगण्याचे तंत्र आणि मंत्रही. आजूबाजूला कुठलीही परिस्थिती असो आपण त्यातून स्वतःला सांभाळून कसे पुढे जायचे हे यातून मला उलगडले. क्षणभर डोळ्यात पाणी आले. आजूबाजूला बघताना समोर छोट्याशा पटांगणात असलेले ते छोटे घर. जिथे आमच्या जेवणाची सोय केलेली होती. परत मनात आले या सगळ्या आजूबाजूच्या वातावरणात तग धरून हे घर आणि ह्या घरातील लोक कसे राहत असतील? 

जेवणाची तयारी करताना मी आत जाऊन काही मदत हवी का? म्हणून विचारायला गेले. तर तिथली आजी मला, “नको ग बाय”, मी करते", असे शांतपणे आणि हसतमुखाने म्हणाली. खरंच तिच्या चेहऱ्यावरचे तेज मला खूप काही सांगून गेले. एका चुलीवर ती गरम गरम नाचणीच्या भाकरी करून आमच्यासाठी जेवण बनवत होती. तर शेजारी नावाला पार्टिशन टाकून केलेली वेगळी खोली त्यात चुलीवर एका बाजूला पिठले आणि दुसऱ्या बाजूला भात शिजत होता. त्याघरात दिवे नावालाच होते. पण त्यांच्या जीवनात त्याने काही फरक पडलेला नव्हता हे दिसत होते. इथे शहरात जरा वेळासाठी दिवे गेले तर आपली पंचाईत होते. तिथे तर त्यांचे आयुष्य त्यात जात होते. आनंदाने ते आम्हाला वाढत होते. हातचे राखून न ठेवता वाढत होते. जेवण झाले आणि मी मनात म्हणाले अन्नदाता सुखी भव! 

तिथून निघून आम्ही पुढची वाट धरली. मजल दर मजल करत पुढे जाताना एक दादा डोक्यावर सिलेंडर घेऊन येताना आम्हाला भेटला. पुढच्या गावातून रिकामा सिलेंडर डोक्यावर घेऊन तो भरून घ्यायला निघाला होता आणि इथे आम्हा शहरवासियांना युद्ध सुरु झाले आहे. सिलेंडर चा तुटवडा निर्माण झाला आहे आणि आपल्याला whats app फिरणारे मेसेज लागले  “ चुलीवारचे जेवण म्हणून पाट्या लावणारे हॉटेल्स जर गॅस टंचाई मुळे बंद झाली तर समजून जा.... सगळ्यांनीच हसून गंमत म्हणून तो घेतला आणि सोडून दिला. पण आपली परिस्थिती सोडून आपण इतर ठिकाणीही पहावे.  ज्यांना त्याची गरज आहे त्यांचे काय? इथे २ दिवस पाणी नाही आले तर किती प्रश्न , Traffic झाले तर आपण जरा वेळ थांबू शकत नाही, दिवे गेले तर सगळी कामे थांबतात, मेट्रो किंवा बस चुकली की आभाळ कोसळ्यासारखे वाटते आणि गावातली लोकं सहज सगळ स्वीकारून जगत असतात. आपले प्रश्न वेगळे त्यांचे वेगळे हा विचार मनात नक्की येईल पण फरक इतकाच आपण प्रश्न घेऊन जगतो आणि हे खेड्यातले लोक उत्तरे शोधत जगतात.... यावेळेसचा ट्रेक मला बरेच काही शिकवून गेला हे नक्की.... पुढे कोळेश्वराचे दर्शन घेतले आणि आम्ही सूर्यास्तासोबत वाट उतरायला सुरुवात केली.



असो  पण यातही त्या ७ जणांनी मला खुपच सांभाळून नेले आणि आणले. त्यांच्या मनात आलेही असेल कुठून ही बया आपल्यासोबत गड चढायला आली 🤨😠. पण आलिया( भट नाही...) भोगासी.... कारण माझ्या समजाप्रमाणे ट्रेक जास्तीत जास्त १०-१२ किलो मीटर चा होईल असे होते पण तो झाला त्याच्या डबल. 

पण गरज पडेल तेव्हा Moral Support देऊन त्यांच्या बरोबरीनी २५ किमी चा ट्रेक माझ्याकडून करून घेतला असेच म्हणावे लागेल. पुढच्या वेळी भरपूर तयारीनिशी मला जावे लागणार आहे हे नक्की. 

असो,

पण या सातही जणांचे मनःपूर्वक धन्यवाद! तुमच्यामुळे माझा me Time ही मला मिळाला 🤗 Thank You Soooo Much!

©kkdhanashree

Comments

Popular posts from this blog

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद