नवीन जागा नवीन अनुभव, आणि यातून बरेच काही शिकलेलो आम्ही....😊
भटकंती कोणाला आवडत नाही. असे खूपच कमी जण असतील पण आवडणारे अगणित. आम्ही आवडणाऱ्यांमध्ये मोडत असल्याने वेळ, ठिकाण मिळाले की आम्ही फिरून येतो. या वेळेस चे ठिकाण लांब पल्याड होते.
स्वच्छ शहर , मोठे रस्ते, हेल्मेट चा नियम कटाक्षाने पाळणारे नागरिक, संस्कृतीचे प्रतीक म्हणून रंगवलेल्या भिंती, प्रत्येक घरा समोरील तुळशी वृंदावनाला बांधलेली ओढणी, प्रत्येक गाडीला बांधलेली ओढणी आणि प्रसन्न वातावरण... हे असे असले की फिरायला पण मजा येते.
डे वन
पुण्यातून सकाळी साडेद हा वाजता रेल्वेने आम्ही प्रवासाला सुरुवात केली. अख्खा दिवस प्रवास आणि प्रवास...
डे टू
वेळ संध्याकाळी 4.30 ची. प्लॅटफॉर्म वर गाडीची वाट पाहणारे आम्ही चौघे. अर्थात गाडी किमान एक ते दीड तास लेट. मग काय प्लॅटफॉर्म वर असणारी माणसे त्यांचे निरीक्षण, इंजिन्स, वेगवेगळ्या गाड्या यात वेळ कसा गेला कळले नाही. गाडी आली. थोडा वेळ थांबते करता करता चक्क तासभर तिथेच उभी राहिली. मग काय त्यासाठीही चुळबुळ सुरू झाली. पण एकदाची निघाली आम्हाला घेऊन. ती थेट 2 तास उशिरा आमच्या इच्छित स्थळी पोहोचली म्हणजे रात्री ठीक 2 वाजता 😲तिथून पुढे ola ची गडबड. स्टेशन बाहेर 500 मीटर च्या पुढे कुठे तरी ती थांबलेली. थकलेलो भागलेलो आम्ही समान उचलत, ढकलत निघालो आमची ola शोधत🥴
डे थ्री
रात्री उशिरा पोहोचल्याने आम्ही सकाळी उशिरा उठू या हिशोबाने 6.30 लाच उठून बसलो आणि लवकर आवरून ,न्याहारी करून आमच्या ठरलेल्या पहिल्या मंदिरात पोहोचलो ते होते श्री लिंगराज मंदिर. चप्पल आणि आमचे फोन जमा करून प्रवेश द्वारातून आता आलो आणि झेंडा कळसावर चढवणे सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे तिथेच रेंगाळलो. ते पाहून पुढे सरकलो तर समोर एक खांब दिसला. शेजारी उभा असलेला पुजारी त्या खांबाची एकदम भारी जाहिरात करत होता. दक्षिणा ठेवा आणि खांबाचे दर्शन घ्या. तुमची पोट दुखी कायमची जाईल. अगं बेबो 😲भलतंच काही तरी हो ना. शिस्तीत दक्षिणा ठेवून आम्ही खांबाचे दर्शन घेतलेच. मग पुढे गेलो तर अर्थात भारतीय परंपरे नुसार हळूहळू वाढत जाणारी गर्दी लागली आणि बंद असलेले मंदिराचे द्वार😮 जरा नाही, बराच वेळ रांगेत थांबून आम्ही शेवटी आवारातील बाकीची मंदिरे पाहू म्हणून शिस्तीत रांगेतून बाहेर पडलो आणि बाकीच्या देवळात श्री शंकर भगवान यांचे दर्शन घ्यायला सुरुवात केली. एक एक देऊळ पाहता एक गोष्ट जाणवली सगळी मंदिरे एक सारखी फक्त लहान मोठी आहेत. पण त्यावरचे कोरीव काम बारीक , सुबक आणि अप्रतिम आहे. मुख्य मंदिर बाहेरून पाहताना लक्षात आले हत्तीवर सिंह आरुढ आहे. याचा अर्थ तिथे एक गुरुजींना विचारले तर त्यांनी जे सांगितले ते अर्थात डोक्यात कमी व वरून जास्त गेले. असो इतर मंदिरातील महादेवाचे दर्शन करून मुख्य मंदिरात परत आलो तर समोर महादेव आणि त्यात मध्यभागी शाळीग्राम या प्रकारचे शिवलिंग दिसले. मोठे शिवलिंग आहे. त्याचे दर्शन करून पुढे मुक्तेश्वर मंदिराकडे निघालो.
वाटेत एक परशुराम स्थापित शिव मंदिर दिसले दर्शन करून पुढे गेलो. मुक्तेश्वराच्या मंदिरात गेलो. दोन्ही मंदिरे स्वच्छ , आणि उत्तम स्थितीत असल्याचे दिसले. मुक्तेश्वर मंदिराची कमान खूप उत्तम रीतीने कोरीव काम केलेली दिसली.
त्यानंतर राजाराणी मंदिर पहिले. एन्ट्री फी भरून आता प्रवेश मिळाला. तिथे कोणतीच मूर्ती नाही पण नाव मात्र राजा राणी टेम्पल असेच आहे. दुपारचे जेवण करून आम्ही परत पुढच्या डेस्टिनेशन ला म्हणजे चौसष्ठ योगिनी मंदिर आणि धौली हिल करायला निघालो. पार्वतीची विविध ६४ रूपे दगडात कोरलेली असे हे ठिकाण पाहून अचंबित व्हायला झाले. मंदिरात प्रवेश करताना एक पाय असणारी अशी एक मूर्ती कोरलेली दिसली. खूप सुंदर कोरीव काम केलेले हे मंदिर पाहून पुढे धौली हिल ला निघालो तिथे मोठा स्तूप आहे. शांती स्तूप. शांत आणि उंचावर असलेली जागा तसं तिथे पाहिला आजूबाजूचा निसर्ग आणि तिथून दिसणार भुवनेश्वर शहर खूप मनमोहक आहे. या स्तूपाच्या मागे एक महादेवाचे मंदिरही आहे पण आम्हाला जास्त करून या ठिकाणी या स्तूपावर होणार लाईट ॲन्ड साऊंड शो बघायचा होता. साधारण साडेसहा ते सव्वासात एवढा वेळ हा शो असतो आम्ही खूप लवकर पोहोचलो पण आम्ही थोड्यावेळ तिथे आजूबाजूला फिरलो आणि बरोबर पावणेसहा पासून तिथे खुर्च्या मांडायला सुरुवात झाली. सुरुवातीला असे वाटले एवढं काय आहे? तिथे आलेले बऱ्यापैकी सगळेजण लाईट आणि साऊंड शो पाहायला थांबले होते . पण जसं जसं सुरु झाला तसं तसं मौर्य साम्राज्य ,राजा अशोक आणि पुढे जाऊन त्याने जिंकलेले कलिंगा असे एकूणच त्याच्या संपूर्ण आयुष्यावर हा शो तयार केला गेलेला आहे. फक्त चित्रातून नाही तर ती चित्र काढल्या गेली आहेत असं दाखवून खूप सुंदर पद्धतीने हा शो त्याच स्तूपावर दाखवला जातो. या साठी ओम पुरी यांनी त्यांच्या आवाजात हा शो चे रेकॉर्डिंग केलेले आहे. अगदी आवर्जून पाहण्यासारखा हा नक्कीच आहे.
डे फोर
सकाळी उठून आवरून आम्ही खंडगिरी आणि उदयगिरी ह्या गुहा पाहण्यासाठी गेलो.अतिशय उत्तम रितीने सांभाळल्या जात असलेल्या. या गुहा लांबूनच आपल्याला त्यांच्याकडे खेचून घेतात किंवा आपलं लक्ष त्यांच्याकडे खेचून घेतात. उदयगिरी बघण्यासाठी आम्ही तिथे चक्क गाईड केला. ज्याने आम्हाला सगळ्या तिथल्या गुहा त्याच्याबद्दलची माहिती दिली.
त्यानंतर समोरच असणार खंडगिरी जिथे देवीचे मंदिर आणि त्याच्यावर थोडंसं अजून चढून गेल्यानंतर भगवान महावीर यांचे जैन मंदिर आहे. तेही आम्ही पाहिले तिथून आम्ही डायरेक्ट गेलो ते पिपिली या गावी. हस्तकलेसाठी प्रसिद्ध असणारे हे गाव तसे छोटेसेच आहे पण याच्या मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळी दुकाने आहेत येथे जी लोककला किंवा हस्तकला चित्रकला या कला जोपासल्या गेल्या आहेत. तर त्या तिथे वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून विकायला ठेवलेल्या आहेत तिथे आम्ही थोडसं फिरलो थोडीफार खरेदी केली आणि पुढे कोणार्क सूर्य मंदिर असे म्हणण्यापेक्षा सूर्य रथ बघण्यासाठी गेलो.
वर्ल्ड हेरिटेज साईट असणारे हे सूर्य मंदिर तसे पाहायला गेले तर हळूहळू हळू त्याचा साचा ढळत चाललेला आहे. एका बाजूने बऱ्यापैकी ढळलेला आहे त्याला सपोर्ट देऊन तो आहे तसाच सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न पुरातत्व खाते चांगल्या प्रकारे करत आहेत. सूर्य मंदिरात आत मध्ये कोणीही जाऊ शकत नाही.
आत मध्ये कोणतीही मूर्ती नाही, तर दगड आणि वाळू ह्यांनी ते पूर्ण गच्च भरून त्याचे चारही दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत. पण त्याकाळी केलेली एक सुंदर रथाची कलाकृती ज्यामध्ये सात घोडे होते त्यातले चारच घोडे त्यातल्या त्यात सुस्थितीत असलेले आम्हाला दिसले या रथाच्या बाजूने बारा चाके आहेत. या चाकांमध्ये दिवसाच्या वेळेचे गणित लपलेले आहे. बरोबर सूर्य जसा जसा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तसं तसं या चाकावर वेळ दिसते नक्की किती वाजले आहेत. याची कल्पना येते. आजूबाजूला केलेले कोरीव काम अप्रतिम आहे. नक्कीच बघण्यासारखे हे ठिकाण आहे.
तिथून पुढे आम्ही जगन्नाथ पुरीला जायला निघालो. कोणार्क सूर्य मंदिरापासून पुरी साधारण ३० ते ३५ किलोमीटरवर आहे हा संपूर्ण रस्ता समुद्र काठून जातो. संध्याकाळची शांत वेळ सूर्य अस्ताला निघालेला आणि प्रवास करताना डाव्या बाजूला असणारा समुद्र अप्रतिम दृश्य दिसत होते. अर्ध्या तासातच आम्ही जगन्नाथ पुरीला पोहोचलो. गुंडीचा माता मंदिराच्या समोरच असणारी गुंडीचा धर्म शाळेमध्ये आम्ही थांबायची व्यवस्था आधीच ऑनलाईन पद्धतीने केलेली होती. रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि लगेचच जेवणासाठी बाहेर पडलो. गर्दी अफाट वाढलेली होती त्यामुळेच पोलिसांनी सरळ मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केलेला होता त्यामुळे गर्दी अजूनच वाढलेली होती. अर्थातच आम्हाला बराच लांबून वळसा घालून मंदिरापर्यंत जाता आले. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अलीकडेच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केले. जेवण चांगले मिळाले. जेवण झाल्यावर आता मंदिरात दर्शनाला जावे का न जावे या द्विधा मनःस्थितीत असताना आम्ही जाऊन बघून येऊ असे म्हणून मंदिराकडे निघालो. आमच्या चपला आणि मोबाईल फोन एके ठिकाणी जमा करून आम्ही मंदिरात जाण्याच्या रांगेत जाऊन थांबलो. हळूहळू हळू पुढे सरकत सरकत आम्ही जवळपास रात्री साडेआठला रांगेत लागलेलो ,पावणे बारा वाजता देवाच्या दर्शनाला मंदिरात प्रवेश करून मूर्ती समोर उभे राहिलो. एका क्षणापेक्षाही कमी वेळेत आमचे दर्शन झाले. यावेळेस आलेला आमचा अनुभव. सहसा आपण आपले नातेवाईक, जवळचे मित्रमंडळी यांना देण्यासाठी मंदिरात गेलेलो असतो तेव्हा प्रसाद घेतो तो देवाच्या तिथे देऊन तो परत घेऊन आपण घरी नेतो आणि सगळ्यांना वाटतो तसेच मीही केले मंदिरा बाहेर मिळणारा लाह्यांचा प्रसाद घेऊन मंदिरात गेलो तेव्हा माझ्या अहोंनी तो प्रसाद समोरच्या पुजाऱ्यांकडे दिला प्रसाद दिल्यानंतर पुजाऱ्यांनी त्या प्रसादाला थोडा प्रसाद तिथे काढून ठेवला आणि उरलेला प्रसाद देण्यासाठी हात वर केला तेव्हा त्यांनी खुणेने माझ्या अहोंना विचारले पैसे कुठे आहेत अहोंनी त्यांना सांगितले खुणेनीच त्या हुंडी मध्ये टाकले आहेत.असं सांगितल्यानंतर त्यांनी तिथूनच प्रसाद देण्यासाठी खुणेने नाही सांगितले. त्याला समजेना काय झाले. जेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांनी सांगितले पैसे द्या तर हा प्रसाद तुम्हाला परत मिळेल. धक्कादायक असणारा हा प्रकार पाहून काय बोलावे समजलेच नाही . शेवटी त्याने त्याच्याजवळ असणारी दोनशे रुपयांची नोट त्यांना दिली तेव्हाच त्यांनी आम्हाला प्रसाद परत दिला. या सगळ्या गडबडीत त्याच्या कडे असणारी आमची चप्पल आणि मोबाईल ठेवल्याची पावती गहाळ झाली. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आणि चप्पल घेण्यासाठी गेलो. तेव्हा लक्षात आले की पावती हरवली आहे. मग तिथून पुढे मला पोलिस स्टेशन गाठावे लागले. त्याच्या कडे जाऊन तिथे असणारा फॉर्म भरून द्यावा लागला मग तिथून शिक्का घेऊन तो चप्पल स्टँड वर जमा करावा लागला त्यानंतर आम्हाला फोन्स आणि चप्पल परत मिळाल्या. या सगळ्यात १२.३० वाजून गेले होते. तिथून आम्ही आमच्या धर्मशाळेत परत आलो. यावर काही न बोलण उत्तम.
डे फाइव
आदल्या दिवशी दर्शन झाल्यामुळे सकाळी न्याहारी करून आम्ही भुवनेश्वरला परत येण्यासाठी निघालो. भुवनेश्वरला परत आल्यानंतर जेवण करून आम्ही तिथे असणाऱ्या नंदन कानन या प्राणी संग्रहालयाला भेट द्यायला गेलो. सुरुवातीला वेगवेगळे माकडांचे प्रकार, मग सरपटणारे प्राणी असे सगळे बघून पुढे एसी बसने जंगल सफारी करायला निघालो . पहिली सफारी आमची वाघाची होती आत गेल्यानंतर पहिल्या चार-पाच मिनिटातच मला वाघ दिसला तिथून बाहेर पडून दुसरी सफारी अस्वलाची होती. तिकडे गेलो. आत प्रवेश केल्यानंतर एक दोन तीन मिनिटातच आम्हाला दोन अस्वले दिसली. तिथून बाहेर येऊन मग गवत चरणारे प्राणी हे पाहण्यासाठी आम्ही तिसऱ्या सफारी ला गेलो. हे सर्व लागोपाठ करता येते आणि एकाच बस मधून आपल्याला फिरवले जाते. हे झाल्यानंतर बाहेर आलो तिथून आम्हाला आमच्या गाईडने काळा वाघ, पांढरा वाघ आणि आपला नेहमीचा पिवळा वाघ. बिबट्या असे दाखवले त्यानंतर सिंह पाहिले आणि सगळ्यात मोठा आकर्षण आम्ही तिथे दोन जिराफ पहिले, पानघोडा पहिला असे वेगवेगळे प्राणी पाहून त्याची वेळ बरोबर पाच वाजता संपते तेव्हाच आम्ही त्या संग्रहालयाच्या बाहेर पडलो.
डे सिक्स
आज आम्हाला निघायची गडबड हो. ती पण आमची गाडी दुपारी असल्यामुळे सकाळचा थोडा वेळ आमच्याकडे होता. त्यावेळीही आपण काहीतरी पाहूयात या दृष्टीने आम्ही बाहेर पडलो.
तिथून आम्ही ब्रह्मेश्वर मंदिर भास्करेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिर अशी तीन ठिकाण केली. समोरच तीन पाट्या दिसल्या. त्यावर लिहिले होते भरतेश्वर, लक्ष्मणेश्वर आणि शत्रुघ्नेश्वर असे लिहिलेले होते. पाट्यांवरूनच लक्षात आले आत मध्ये मंदिरा या तिघांच्याही मूर्ती आहे. पण वेळेअभावी आम्हाला आत जाता आले नाही. आम्ही तिथूनच हॉटेलवर परत आलो. आमचे सामान वगैरे घेऊन आम्ही जेवण करून परतीच्या मार्गाला लागण्यासाठी रेल्वे स्टेशनवर येऊन साडेतीन वाजता ची आमची कोणार्क एक्सप्रेस ही गाडी पकडली आणि पुण्याकडे यायला निघालो.
अशा रीतीने आम्ही आमची पूर्व भारतातील सफर करून म्हणजेच ओरिसा राज्याची छोटीशी पण मोठी अशी सहल. ही सहल अपेक्षेपेक्षा खूप छान पूर्ण झाली. चांगले वाईट अनुभव हे येतातच. पण ते पुढच्या सहलीसाठी उपयोगी पडतात. अशी ही आमची सहल पूर्ण करून पुण्यात बरोबर सातव्या दिवशी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी येऊन व्यवस्थित पोहोचलो धन्यवाद!
©kkdhanashree















Comments
Post a Comment