ढाकोबा दुर्ग आणि आईसक्रीम

        आईस्क्रीम हा असा एक पदार्थ आहे की जो दोन प्रकारचा असू शकतो. एक चांगला आणि दुसरा खूप चांगला...... असं कोण म्हणतं?.... असं आसमादिकच म्हणतात. आणि तिखट खाऊन पोटात जाळ झाला असेल तर त्यानंतरचे आईस्क्रीम हे तर आपल्या पोटासाठी आणि जिभेसाठी स्वर्गसुखच. हेच स्वर्गसुख पालक भ्रमंती गटाच्या नवीन मोहिमेच्या सुरुवातीलाच अनुभवले आणि पुढील पूर्ण मोहीम आईस्क्रीम मय होऊन गेली. 

        तर झाले असे की पालक गट यावेळेस ढाकोबा दुर्ग अशा मोहिमेसाठी निघाला. सकाळी जाता जाता जुन्नरला न्याहारी केली आणि न्याहारीत झणझणीत मिसळ मिळाली. अस्मादिकांचा आणि तिखटाचा ३६ चा आकडा आहे हे बघून देवानेच तेथे आईस्क्रीमही उपलब्ध करून दिले होते. आता देवानेच आईस्क्रीम दिल्यावर नाही तरी कसे म्हणायचे.... लगेच खाऊन घेतले. 

        न्याहारी करून गट ढाकोबाच्या पायथ्याला म्हणजेच आंबोली गावात पोहोचला. हे आंबोली गाव आपण नेहमी पुस्तकात वाचतो ना अगदी तसेच. तिन्ही बाजूंनी हिरवेगार डोंगर, डोंगरांच्या पायथ्यापाशी वाऱ्यावर डोलणारे शेत आणि तेथेच थोडी कौलारू घरे. असे हे टुमदार गाव जसे की अतिशय छान सजवलेल्या चांदीच्या ताटलीत घरी केलेले आईस्क्रीमच जणू. नुसते बघूनच मनाला आणि पोटाला शांती मिळते. 

        गावात पहिले नमस्ते झाले आणि गट ढाकोबाच्या चालू लागला. ढाकोबावर जाऊन जे आईस्क्रीम मिळणार होते ते आईस्क्रीम तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीची वाट ही ओढ्याच्या बाजूने जात होती. अतिशय नितळ स्वच्छ पाणी. याच ओढ्याच्या बाजू बाजूने गट पुढे गेला. पुढे छोटासा धबधबा होता. पण आता काही दिवस पाऊस नसल्यामुळे धबधब्याचे पाणी थोडे कमी झाले होते. तरीही त्या पाण्यात पाय भिजविण्याची हौस भागवून गट पुढे निघाला. 

        आता थोडा चढ सुरू झाला होता. पण सकाळच्या आल्हाददायक वातावरणामुळे तो चढ अंगावर येतोय असा भासलाच नाही. वाटही झाडी झाडीतूनच जात होती. त्यामुळे चढतानाही मजा येत होती. चढताना नुसते मागे बघितले तरीही ते आंबोली गाव या तीन डोंगरांच्या मध्ये छान वसलेले दिसत होते. जणूकाही आईच्या कुशीत एखादे बाळ असते अगदी तसेच. 

        ढाकोबा निम्मा चढून झाला होता. बघावे तिकडे हिरवेगार डोंगर, मधून वाहणारे पाणी, खाली टुमदार गाव इतका नयनरम्य परिसर बघून पुण्यापासून एवढ्या लांब आल्याचे फळ मिळाले असे वाटत होते. पण हे ही नसे थोडके की काय तर निसर्गाचा आणखीन एक चमत्कार, एक नैसर्गिक ऐस पैस गुहा बघायला मिळाली. आणि नुसती गुहा नाही हो. त्या गुहेवरून पावसाचे पाणी खाली पडत होते आणि एक धबधबा तयार झाला होता. येथे रात्री राहायलाच आलो असतो तर किती मजा आली असती असा विचार येऊन गेला. चढ चढून आल्यामुळे लोकांना घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच जणांनी या धबधब्याच्या पाण्यात हातपाय धुवून घेतले. 

        गुहा आणि ढाकोबा शिखर यामध्ये एक छोटेसे पठार लागते. या पठारावर धरणीमाता विविध रंगांच्या फुलांची साडी नेसून आमचे स्वागत करत होती. संपूर्ण पठार विविध रंगांची आतषबाजी करत होते. हा निसर्ग अनुभवून गटाने शेवटचा टप्पा लीलया पार केला आणि ढाकोबा शिखरावर झेंडा रोवला. गट वर पोहोचला आणि निसर्गाने तयार केलेले सह्याद्री नामक आईस्क्रीम समोर दिसले. त्यात आंबा, पिस्ता, केशर, पेरू आणि कित्येक प्रकार गड, कडे, घाट स्वरूपात मांडलेले दिसले. काय खाऊ..... काय बघू असे झाले. गटातील अनुभवी लोकांनी लगेचच सर्व गड अचूक ओळखले. जीवधन, गोरक्ष, मच्छिंद्र, सिद्ध आणि बरेच.... काही गड फक्त दिशा बघून मन:चक्षुने बघितले. 

        ढाकोबा सर करून गटाने दुर्ग किल्याची वाट धरली. या वाटेतही पठारावर विविध रंगांची फुले होतीच पण त्याबरोबर मोठ मोठे दगडही होते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर ढाकेश्वराचे दर्शन घेतले. विठोबा झाला आणि गटाचे थोडा पोटोबा पण उरकून घेतला. दुर्गकडे जाण्यासाठी थोडी ऊर्जा मिळाली. गट मार्गक्रमासाठी परत सज्ज झाला. 

        कपमध्ये लाकडी चमच्याने आईस्क्रीम निम्मे खाल्ले की त्या आईस्क्रीम गोळ्याला खाच खळगे पडतात तसेच रांजण खळगे वाटेत बघायला मिळाले. त्या विविध खळगे असलेल्या दगडांवरून पाणी छान वाहत होते. निसर्गाचे हे वेगळेच रूप पाहून गट लवकरच दुर्ग पायथाशी पोहोचला. 

        पाण्याने भरलेला बंधारा, त्याच्या मधोमध एक विहिर आणि बाजूला भरपूर सोनकी (सोन्यासारखी पिवळी फुले) याने दुर्ग गडाचा पायथा सजवून ठेवला होता. दुर्ग पासून थोडाच पुढे कोकणकडा आहे. त्या सोनकीच्या बाजू बाजूने जात गटाने कोकणकड्याचे दर्शन घेतले. ढाकोबा प्रमाणेच या कोकण कड्यावरून भरपूर मोठा प्रदेश दिसतो. साधारण दीड ते दोन हजार फूट उंच असा हा कोकणकडा या सर्व प्रदेशावर नजर ठेवून आहे. खाली दोन तीन तळी आणि घनदाट झाडी दिसते. या कोकण कड्याचे पर्यटन स्थळ म्हणून विकसन करताना त्याला कठडे पण लावले आहेत. या कोकण कड्यावरून आपल्या सह्याद्रीचे दर्शन घेऊन गट दुर्गगडावर पोहोचला.

        दुर्ग गड हा छोटाच गड आहे. सुरुवातीला देवीचे मंदिर आणि थोडे चढून गेल्यावर गडावर भरपूर असे खडक. असे म्हणतात की ते खडक पांडवांनी येथे एक वास्तू उभारण्यासाठी आणले होते. या दुर्गगडावरून सभोवतालचा रम्य परिसर बघता येतो. ते बघून गट खाली उतरला. नेहमीप्रमाणे  प्रार्थना म्हणून गटाने पुण्याकडे कूच केले. पुण्याकडे परत येताना जुन्नर येथे मोऱ्यांकडेच गेलो आणि इडली वडा सांबार यावर ताव मारला. आणि......... हो... भ्रमंतीची सांगता परत एक आईस्क्रीम खाऊन झाली. अशी ही आईस्क्रीम मय भ्रमंती नेहमीच लक्षात राहील. भेटूया पुढच्या भ्रमंतीला. 


शुभ दीपावली!

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद