एका मेजवानीची भ्रमंती
ठरले ठरले ठरले . . . . .
मेजवानी करायचे ठरले.. कधी? केंव्हा? कुठे?..
सांगतो SS , सांगतो SS
बरेच दिवस झाले . . . . . . खरे तर वर्षे झाली .. नाही उलटली . . . . .एक तप लवकरच होईल. श्री. अमित यांची 'डेला रिसॉर्ट' ची मेजवानी 'pending ' होती. शेवटी नियोजन समितीने एक विशेष बैठक घेतली आणि त्यात मिलिंदने पुढाकार घेऊन पुढच्या रविवारी या मेजवानीचा घाट घातला. जे जे फुकट ते ते पौष्टिक असे कोणीतरी म्हणले आहे त्यामुळे इथे पुढाकार(?) असे कोणीतरी कुजबुजले. यात कोणी म्हणले आहे असे ऐकल्यावर लगेच मिलिंद आणि गणेशने काही पुस्तकातले संदर्भ देऊन हे कोणी म्हणले आहे हे सांगितले. पण बाकीच्या सभासदांनी कोणी का म्हणेना असा सूर लावला त्यामुळे गाडी परत मेजवानी कडे वळली. या वर्षभरात बरेच घाट चढले आणि उतरले. त्याची सांगता आपण या मेजवानीचा घाट घालून करू असा प्रस्ताव नेहमीप्रमाणे मिलिंदने मांडला आणि त्याला साहजिकच सर्व नियोजन समितीने मूक अनुमोदन दिले.
तारीख ठरली, वार ठरला. श्री. अमित यांना कळल्यावर ते गालातल्या गालात हसले. हसले म्हणजे फसले असा अर्थ पकडून मुख्य गटावर संदेश गेला.श्री. अमित यांची मेजवानी असे वाचून बऱ्याच जणांनी एप्रिल फूल म्हणून दुर्लक्ष केले. त्यामुळे परत नेहमीचीच टाळकी हा मेजवानीचा घाट चढणार असे दिसले. पण नियोजन समितीने माघार घेतली नाही. सचिन ने नेहमी प्रमाणे प्रवासाच्या नियोजनाची जबाबदारी प्रफुल्लीत चेहऱ्याने स्वीकारली. गाडी कोणती, किती वाजता येणार, वाहक कोण याची इतम्भूत माहिती सचिन ने मनापासून गटावर टाकली.
रविवार उजाडला. गाडी पुण्याहून निघाली आणि श्री. अमित यांना घेऊन ' डेला रिसॉर्ट ' कडे निघाली. गाडीत एक महाविद्यालयीन वाटावी अशी प्रज्ञा नामक व्यक्तीची बरीच चुळबुळ चालू होती. ती वेळेत येऊन देखील आपल्यामुळे बाकीच्यांना उशीर तर नाही झाला याच विचारात अडकलेली. तिला सुजाता ताई आणि राजेंद्र दादा समजावत होते कि उशीर झाला तरी धीर सोडायचा नाही. कोणतीही मोहीम अर्धवट सोडायची नाही. नेटाने पूर्ण करायचीच.
गाडीने वेग पकडला होता. अमोल वाहकाला गाडी चालवण्यासाठी द्या म्हणून सांगत होता. पण वाहकाने भलताच वेग पकडला असल्याने अमोल ला गाडी चालवायला काही मिळाली नाही. गाडी थांबवून गाडीतून उतरणे अशक्य होते. हि संधी साधून संदीप दादा उभे राहिले आणि ' डेला रिसॉर्ट ' वर मागील महिन्यात जी मेजवानी झाली त्यात किती कोणी किती गुलाबजाम फस्त केले ते सांगू लागले. पण मिलिंद ने गुलाबजाम च्या आकड्यांवर संशय व्यक्त केला आणि चर्चा रंगली. पण तेवढ्यात गाडी रिसॉर्ट ला पोहोचली आणि ती चर्चा तिथेच थांबली.
मेजवानी म्हणल्यावर गाडीतून उतरण्याची गटाला घाई झाली होती. गाडीतून उतरताना केदार महाजनीचा पाय मुरगळा. पण तरीही त्याने मेजवानी न चुकवण्यासाठी जीवावर उदार होऊन गाडीच्या पायऱ्या उतरल्या. इथेच अचला ताईंनी सूत्रे हातात घेतली आणि मृणालिनी ताई, सुखद ताई आणि धनश्रीच्या मदतीने गटाला रस्त्याच्या मध्ये उभे न राहता बाजूला उभे राहण्यासाठी जागा करून दिली. कर्नल आठल्ये यांनी सर्वांची गणती आणि ओळख करून घेतली. ओळख झाल्यावर अचानक एक कुणाल नामक उपटसुम्भ पुढे आला आणि मेजवानीत आपल्याला खाताना आणि खाणे झाल्यावर कोणताही त्रास होऊ नये आणि सर्वांनी जास्तीत जास्त खाऊन खूप मोठे बिल करून मेजवानीचा आस्वाद घ्यावा यासाठी पोटाचे व्यायाम घेऊ लागला. यात सर्वांनाच स्वतःचा फायदा दिसल्याने सर्वानी त्याचे अनुकरण केले.
सर्व जण रिसॉर्ट मध्ये दाखल झाले. आता 'मेनू ' बघून 'ऑर्डर ' करायची. पण गणेशला हे मान्य नव्हते. त्याने पिशवीतून एक छोटी शेगडी काढली आणि सर्वांसाठी सूप तयार केले. त्याने मागील वर्षी ५० दिवसात ५० वेगवेगळे सूप प्यायलायची गोष्ट अतिशय रंगवून सांगितली. सर्वांनीच त्याचे कौतुक केले. हे सर्व चालू असतांना सिद्धेश ने मात्र गपचूप मेनू कार्ड पाठ केले. रिसॉर्ट मध्ये आचारी कोण आहे हे शोधून काढले आणि कोण कोणते पदार्थ घ्यावेत याची नोंदही केली. अस्मदिकांनी देखील आपला खारीचा वाट उचलला आणि या सर्व पदार्थांची लिहून आणलेली माहिती बाकीच्यांना वाचायला दिली.
जेवणातील पदार्थ उत्तम होते. त्याचे रसभरीत वर्णन सगळेच करू लागले. तेवढ्यात एक अतिशय तिखट पदार्थ मासवडी आणि भाकरी टेबलवर आली. हे खाण्याचे धाडस करायचे कि नाही असा विचार चालू होता. रिसॉर्ट मधील सेवक वर्ग पण शंका घेत होता. पण मंदार ने मात्र आपल्या धाडसी वृत्तीचे दर्शन इथे घडवले आणि सरळ खायला सुरवात केली. मग काय बाकीच्यांनीही बाह्य सरसावल्या आणि मासवाडी फस्त केली. काहींचे जेवण लवकर झाले. पण काहींना वेळ लागत होता. श्री. अमित यांनी ताटातील संपवले नाही तर माझी कविता ऐकावी लागेल असे सांगितले. त्यामुळे सर्वांनीच स्वतः चे ताट पूर्ण संपविले. योगिनीताई, प्रिया ताई, गिरीश दादा, सुनीताताई तसेच अतुल, ऋषी, केदार यांनी मेजवानीचे छायाचित्रण केले.
नवीन पिढी हल्ली आपण किती खाल्ले हे कसे मोजते याची सविस्तर माहिती मयुरेश ने दिली आणि आजच्या मेजवानीच्या fat , protien इ. याचा एक आलेख लगेच तयार करून दाखवला. रिसॉर्ट ने सर्व पदार्थांचे दर योग्य लावले आहेत ना, बेरीज बरोबर केली आहे ना हे सर्व अजय ने सनदी लेखापालाच्या चष्म्यातून पडताळले आणि श्री. अमित यांना 'ग्रीन सिग्नल' दिला. श्री. अमित यांनी पण लगेच बिलाचे पैसे देण्यासाठी खिशात हात घातला आणि तेवढ्यात . . . . . . . . . .
तेवढ्यात काय झाले हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे.. . . . . त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची ठेवू आणि पुढच्या मेजवानीला अर्थात भटकंतीला लवकरच भेटू.!!!
©kkdhanashree
Comments
Post a Comment