मृगगड आणि पायमोडीची वाट

     एक आटपाट नगर होत अशी सुरुवात झाली की डोळ्यासमोर जसे गाव येते तसेच एक गाव - भेलिव.

     आजूबाजूने डोंगर रांगा, गावात जाणारा एकच गाडी रस्ता, छान मंदिर परिसर, त्याच्या बाजूला टुमदार घरे, घरांच्या मधून आखीव रेखीव गावातला रस्ता, गावकऱ्यांची सकाळची लगबग, एका घरातील नीटनेटकी खोली आणि खोलीत गरम गरम पोहे खाणारे मावळे..... अहाहा SSS.... अशी सुंदर आणि चविष्ट सुरुवात झाली मृग गडाच्या भ्रमंतीला! ही सुरुवात करून वाटाडे मामांना घेऊन गटाने मृग गडाकडे कूच केले. या गटाचे प्रताप भेलीव गावात पण बहुतेक पोहोचले असावेत कारण एक से भले दो म्हणत वाटाडे मामांनी - साठे मामांनी त्यांच्या साथीला - राहिलेले दोर कापायला - शेलार मामांनापण - बरोबर घेतले. 


 



      गडाच्या वाटेवर छान जंगल आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. गड चढताना काही गुहा दिसतात. त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण गुहा बघायला मिळाली. गुहेत जाण्यासाठी साधरण ३ फुटाचा बोगदा आहे. या बोगद्यातून आधी साधारण २० फूट सरळ, मग ५ फूट काटकोनात उजवीकडे, मग ३ फूट खाली आणि शेवटी ५ फूट डावीकडे गेले की आपण त्या छोट्या ४ फूट उंच आणि १० फूट लांब गुहेत पोहोचतो. एवढे कष्ट करून गुहेत गेल्यावर धूळ स्वरूप सोने आम्ही आमच्या श्वासात भरले आणि परत बाहेर आलो. ही गुहा बहुदा आयत्यावेळेस लपण्यासाठी वापरली जात असावी. गुहेचे 'Mission Possible' पूर्ण करून आम्ही गडाची मुख्य वाट धरली. 


 



      थोडे पुढें गेल्यावर मृग गडाची प्रसिद्ध चिमणी चढाई समोर दिसली. दोन दगडांमधून गेलेली एक वाट. पण पाय ठेवायला तशी जागा कमी. त्यामुळे थोडी बिकट. दोन्हीकडील दगडांवर हातांनी जोर देऊन ही वाट चढावी लागते. एका वेळेस एकच माणूस इथून जाऊ शकतो. सर्व मावळ्यांनी एक एक करून ही चढाई चढली. आता तिथे दोर लावल्यामुळे थोडे सोपे झाले आहे. शत्रूला कोंडीत पकडणे म्हणजे काय ते ही चिमणी चढाई बघून कळते. 

 



      चिमणी चढाई झाली आणि पुढे उजव्या बाजूला आणखीन एक गुहा होती. त्या गुहेत जाण्यासाठी कातळाच्या बाजूने पाय ठेवणे इतपत जागा असलेली एक वाट जात होती. डाव्या बाजूला कातळ आणि उजव्या बाजूला खोल दरी अशी ही वाट दहा-पंधरा फुटांची. पण त्यातही ती वाट उजवीकडील दरी बघत मावळ्यांनी मजेत पार केली. ही गुहा थोडी मोठी होती. बहुदा धान्य साठवण्यासाठी या गुहेचा वापर केला जात असावा. ही गुहा पाहून झाल्यावर मोर्चा बालेकिल्ल्याकडे वळला. वरती जाण्यासाठी कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत आणि शिवाय आता दोरही लावला आहे. 


 



      मुख्य गडावर गेल्यावर उजवीकडे एक देवीची मूर्ती ठेवलेली आहे आणि शंकराची एक दक्षिणमुखी पिंड ही आहे. त्यावर आडोसा म्हणून एक छोटा पत्रा लावलेला आहे. 

 



      गडावर आता जास्त अवशेष शिल्लक नाहीत. पाण्याची काही कोरडी पडलेली टाकी आहेत. ते बघून आम्ही गडाच्या पश्चिम टोकापर्यंत गेलो. वरतून भेलिव गाव आणि आजूबाजूचा रम्य परिसर खूप छान दिसत होता. एवढा गड चढल्यावर थोडी विश्रांती म्हणून एके ठिकाणी सावलीत आम्ही बसलो. तेथे काहीजणांनी गडाची माहिती वाचली. तसा हा गड घाट वाटांवर लक्ष ठेवण्यासाठीच असावा असा अंदाज आहे. त्याची माहिती खाली दिलेली आहे. ती जरूर वाचा. 


      थोडी विश्रांती झाल्यावर आम्ही गड उतरू लागलो. पण चिमणी पाशी खालून येणाऱ्यांची खूप गर्दी जमली होती. जर असेच थांबलो असतो तर अजून अर्धा एक तास थांबावे लागले असते. त्यामुळे मामांनी दुसरी वाट शोधून काढली. चिमणी परवडली अशी ही दुसरी वाट होती. ना पाय ठेवायला जागा ना हात ठेवायला जागा. तरीही सर्वांनी मामांन पाठोपाठ ही दुसरी चिमणी पण पार केली. 


      आता दुपार झाली होती. सूर्यही डोक्यावर आला होता. अशावेळी आम्ही पायमोडीची वाट चढायला घेतली. पायमोडी चा घाट म्हणजे बाकी घाटां सारखाच एक घाट, त्यात काय नवीन, आरामात चढू आणि वरती गेल्यावर जेवणावर ताव मारू असा विचार होता. पण घाट चढताना कळले की या घाटाला पायमोडीचा घाट का म्हणतात. एवढी ती सरळ चढण होती की दर दहा पावलांनी दम खायला थांबावे लागत होते. देवाची एकच कृपा की ही सर्व चढण दाट झाडी मधून जात होती. यात सर्वांचा चढाईचा वेग वेगळा वेगळा. त्यामुळे आपोआपच दोन गट पडले. पुढचा गट थोडा पुढे जाऊन मागच्या गटासाठी थांबत थांबत चढत होता तर मागच्या गटात काही जणांना त्रास होत असल्यामुळे ते हळूहळू चढत होते. मध्ये एक ओढा पण लागला त्याला पाणी नव्हते. इथे पावसाळ्यात पाण्याचा काय जोर असेल याचा अंदाज तिथल्या खडकांवरून येत होता. चढायला वेळ लागत होता. जेवणाची वेळ मागे पडून दुपारच्या चहाची वेळ जवळ येत होती. त्यामुळे शेवटी सर्वांनीच आडोशाला बसून डबे उघडले. तेवढीच पायांना थोडी विश्रांती. 


 


      

      अशा ठिकाणी मामांचे अनुभव ऐकणे हा एक वेगळाच अनुभव असतो. बरेच लोक मृग गड चढायला मामांना बरोबर नेतात. त्यावेळी मामा बऱ्याच सूचना देतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून काही जण अडचणीत सापडतात. कोणाला चक्करच येते तर कोणाचा पाय मुरागळून चालता येत नाही अशा बऱ्याच अडचणी येतात. त्यावेळी मामांनी कशी झोळी करून लोकांना खाली जायला मदत केली याचे वर्णन ऐकायला मिळते. तसेच भेलीव गावात जास्त रोजगार नाही. त्यामुळे दररोज पायमोडीची वाट चढून वरती लोणावळ्याला रू.१२ प्रती दिवस यासाठी कामाला जाणे आणि काम झाल्यावर परत घाट उतरून घरी येणे हा २५ वर्ष मागील नित्यक्रम ऐकून तर त्यांना नमस्कार करणेच बाकी होते. 


      मामांशी गप्पा मारता मारता डबे खाऊन झाल्या नंतर मात्र चांगलीच हुशारी आली आणि सर्वांनी चढायचा वेग वाढवला. पण असे करता करता मागचा गट बराच मागे पडत होता. ते वाट चुकण्याची शक्यताही होती. त्यामुळे चुना वापरून खुणा करणे, दगड एकमेकांवर रचणे अशा खुणा मार्गावर करण्याचा प्रयत्न होत होता. पण शेवटी एक मामा मागच्या गटाला आणायला परत थोडे मागे गेले आणि दुसरे मामा पुढच्या गटाला घेऊन वरपर्यंत चढत गेले. घाट पूर्ण चढून झाला असे वाटले तरी वरती गाडी जवळ जाण्यासाठी जवळजवळ पाऊण तास चालत जावे लागते. पुढचा गट साधारण पाच वाजता गाडीपाशी पोहोचला तेव्हा सूर्य घरी जायची तयारी करत होता. सर्वांनी मॅगी भजी चहा याची हीच उत्तम वेळ असे म्हणून सगळ्यावर आडवा हात मारला. मामांचे आभार मानून आणि हिशोब करून त्यांना मोकळे केले. त्यांना अंधार पडायच्या आधी परत खाली गावात पोहचायचे होते. अर्धा गट सुखरूप वरती पोहोचला आहे आणि बाकीचा गट जवळजवळ पोहोचतच आला आहे हे बघून सूर्यदेवाने देखील रजा घेतली. मागचा गट आस्ते कदम साडेसहा दरम्यान गाडी पाशी आला. त्यांच्याबरोबर भजी चहा याची आणखी एक फेरी झाली. पोटातला अग्नी थोडा शांत झाला आणि गार वारे, थंडी याची जाणीव शरीराला झाली. त्यामुळे सर्वांनीच गरम कपडे परिधान केले. दिवसभरात काय केले काय नाही याच्या चर्चा झडू लागल्या. पण वेळेचे भान ठेवून चर्चा तेथेच थांबवून सर्वांनीच गाडीत बसून परतीच्या वाटेकडे कूच केले. 


     असा हा सुंदर दिवस गरम पोहे खाऊन सुरू झाला आणि गरम भजी खाऊन संपला. कोणी विचारले की पोहे आणि भजी यांमधील अंतर काय तर उत्तर द्यायला विसरू नका की दोघांमधील अंतर म्हणजे एक गड आणि एक घाट. 




किल्ले मृगगड माहिती:


      पाली जवळील जांभूळपाड्यापाशी फल्याण गावात असलेला मृगगड हा किल्ला!


      मृगगड हा सुधागड तालुक्यांतील सह्याद्री च्या रांगेतील एक छोटेखानी किल्ला. तसा ह्या किल्याला फारसा इतिहास लाभला नाही पण ह्या सभोवताली लाभलेली भौगोलिक पार्श्वभूमी, तेथील जंगल हे वैशिट्य. 


      देशातून कोकणात वाहतुकीसाठी उतरणारे अनेक घाट महाराष्ट्रात इतिहासकालापासून अस्तित्वात आहेत. नाणेघाटासारख्या प्रसिद्ध घाटवाटेबरोबरच सवाष्णी, नाणदांड, बोराटय़ाची नाळ, कावळय़ा घाट या घाटांची नावंही चटकन डोळय़ांसमोर येतात. लोणावळय़ाच्या ‘टायगर्स लीप’ पॉइंटपासून एक सरळसोट घाट कोकणातल्या भेलीव गावात उतरतो. भेलीवमधले स्थानिक ग्रामस्थ जरी या घाटाला ‘पायमोडी’ घाट म्हणत असले तरी इतिहासात हा मार्ग ‘सव घाट’ म्हणून प्रसिद्ध आहे. या सव घाटावर बारीक नजर ठेवण्यासाठी मध्ययुगात एका लहानशा, पण भौगोलिकदृष्टय़ा महत्त्वाच्या किल्ल्याची निर्मिती झाली. पुण्या-मुंबईवरून एका दिवसात आणि कोणत्याही ऋतूत सहज भेट देता येईल असा एक सदाबहार किल्ला म्हणजेच रायगड जिल्हय़ातला ‘मृगगड’ ऊर्फ ‘भेलीवचा किल्ला’.


      ह्या किल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे फल्याण गावातून आणि दुसरे म्हणजे किल्याच्या दक्षिणेला असलेलं भेलीव गावातून. दुसरा मार्ग हा जास्त वापरला जातो. आपण मृगगडाला भेट देण्यासाठी खोपोली - जांभूळपाडा - भेलीव असे जाणार आहोत.  


      भेलीवकडे येतानाच आपल्याला पूर्वेकडे पसरलेली सहय़ाद्रीची अजस्र रांग दृष्टीस पडते आणि त्यापासून सुटावलेला बेलाग असा मोराडीचा सुळकाही दिसतो. भेलीवच्या मागेच मृगगडाचा तीनचार शिखरांचा छोटा डोंगर गा यलवाला कुशीत घेऊन उभा आहे. या शिखरांपैकी शेवटच्या दोन शिखरांच्या मधल्या घळीतून किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. मृगगडाची संपूर्ण पायवाट झाडीतून असल्यानं आणि मुख्य पायवाटेला अनेक ढोरवाटा फुटल्यानं पहिल्यांदा जात असल्यास गावातील माहीतगार व्यक्ती बरोबर असणं आवश्यक आहे. गावातून साधारणपणे पाऊण तासाची सोपी चढण संपते ती वर उल्लेख केलेल्या छोटय़ा घळीपाशी. या घळीतून वर जाताना एक सोपा कातळटप्पा पार करून पुढे डावीकडे कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरून आपला किल्ल्याच्या छोटय़ा पठारावर प्रवेश होतो. या पठारावरून दोन वाटा फुटतात. डावीकडची खोदीव पायऱ्यांची वाट आपल्याला सर्वोच्च माथ्यावर घेऊन जाते, तर उजवीकडची कातळात खोदलेली अतिशय अरुंद अशी वाट आपल्याला किल्ल्याच्या पोटातल्या खोदीव पण कोरडय़ा टाक्याकडे घेऊन जाते. ही वाट अत्यंत अरुंद आणि धोकादायक असून पावसाळय़ात या वाटेवरून जाण्याची जोखीम पत्करू नये. हे टाकं बघून आपण पुन्हा मागे पठारावर आलो की समोर कातळात खोदलेल्या भक्कम खोदीव पायऱ्यांवरून पंधरा मिनिटांत आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याच्या मुख्य माथ्यावर जातानाच उजवीकडे दगडावर दगड रचून बांधलेली तटबंदी आहे. मृगगडाचा मुख्य माथा तसा लहानच असून पुढे गेल्यावर उजवीकडे देवीची एक मूर्ती एक शिवलिंग आणि एक छोटी दगडी दीपमाळ आहे. गडाच्या उत्तरेकडे उधळ्या डोंगर दिसतो व पूर्वेला मोरडीचा सुळका आणि INS SHIVAJI आहे. अंबा नदीच्या मार्गात हा किल्ला येतो. दक्षिणेला तीन सुळके असलेलं घोडेजीन व त्याच्या अग्रभागी नेसणीची खिंड आहे.


      मृगगडाच्या या पहिल्या शिखरावर डावीकडे पाण्याची दोन खोदीव टाकी असून दोन्ही कोरडी आहेत.


      आता ही टाकी पाहिली की आपण किल्ल्याच्या मधल्या शिखराकडे जायला लागयचे.


      या वाटेनं जात असतानाच उजवीकडे एक छोटा उतार उतरून गेल्यावर कातळात खोदलेलं एक मोठं गुहावजा खांबटाकं असून त्यातही पाणी नाही. किल्ल्याच्या मुख्य शिखरावर आपण पोहोचलो की झाडींनी व्यापलेली काही जोती दिसतात. मृगगडाचा आकार तसा लहानच असल्यानं भेलीवमधून निघाल्यापासून दोन तासांत संपूर्ण किल्ला बघून होतो. या मुख्य शिखरावरून आपण एक छोटा उतार उतरलो की आपण किल्ल्याच्या सर्वात पश्चिमेकडच्या भागावर पोहोचलेलो असतो. या उताराच्या वाटेवरही उजवीकडे दोन कोरडी टाकी आहेत. गिर्यारोहकांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी. मृगगडावरील एकाही टाक्यात पाणी नसून भेलीवमधून निघतानाच पाण्याचा भरपूर साठा आपल्याजवळ ठेवावा. मृगगडाच्या या शेवटच्या टाक्यांपाशी आपली ही छोटीशी गडफेरी पूर्ण होते.


      गडाजवळ तिवरे गावात असलेल्या बाळाजी आवजी चिटणीस ह्यांची आहे. बाळाजी आवजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव होते.


©kkdhanashree

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद