कोकण आणि समुद्र आणि फक्त कोकण आणि फक्त समुद्र❤️🏝️🏖️🌅

 दर वेळेस काय कोकणात जायचे? तोच तो समुद्र काय पाहायचा..... जेव्हा हा डायलॉग मी ऐकला तेव्हा मला वाटले कोकणापेक्षा उत्तम जागा आहे का खरे सुख, खरा आनंद अनुभवायला?

  जगाच्या पाठीवर कुठेही जा. समुद्र तो समुद्रच राहणार, पण त्याचे सौंदर्य मात्र प्रत्येकाच्या दृष्टीवर अवलंबून असणार हे नक्की. 

नमस्कार मी धनश्री आणि हा माझा नवीन ब्लॉग. दर सुट्टीत भ्रमंती करायचीच हा ठरलेला अलिखित नियम आहे आमचा. तो या सुट्टीतही आम्ही पाळलाच.🚙⛱️🏝️

मग काय लागली सुट्टी, बॅग भरा आणि निघा. पण एक गंमत, सरळ वाटेने न जाता जरा आडवाटेने निसर्ग अनुभवू, म्हणून या वेळच्या भटकंतीची सुरुवातच केली माणगडने.


हा रांगडा गडी रायगडाच्या अगदी जवळ उभा असलेला. आपल्या रायगडाचा उपदुर्गच म्हणा ना त्याला. अतिशय सुंदर असा हा गड दिसताक्षणी नक्की किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही बरं का. जेमतेम पर्वती चढू.. असे वाटते पण...इतकाच वाटलेला हा गड त्याहून थोडा मोठाच आहे ना. पायथ्याशी गाडी लावून आम्ही गड चढून वर गेलो. आमच्या शिवाय गडावर कोणीही नव्हते.वर गेल्यावर देवीचे मंदिर लागले. नुकत्याच आलेल्या आजारपणामुळे मला पुढे चढून जाणे शक्य झाले नाही हे जाणवले. पण नवरा आणि मुलगा मात्र वर चढून संपूर्ण गड बघून आले महादरवाजा, छोटे हौद आणि काही अवशेष गडावर आहेत. विशेष म्हणजे थोडाही कचरा गडावर नाहीये आणि खरंच ते आल्यानंतर त्यांनी गडावरचे फोटो दाखवले. अहाहा! काय निसर्ग लयलूट करतो हे तेव्हा दिसले. आजूबाजूचा निसर्ग, सगळीकडे संपूर्ण हिरवाई, धुक्यामुळे उतरून आलेले ढग आणि सुस्थितीत किल्ल्यावर असलेले बरेचसे अवशेष यामुळे गड अप्रतिम आहे यात वादच नाही. 🤩


साधारण पाऊण तासात संपूर्ण गड बघून आम्ही खाली उतरून आलेलो होतो. तिथून पुढे आम्ही निजामपूर, माणगावमार्गे     कोकणात निघालो. पुढे गोवा हायवेला लागल्यानंतर महाडकडे जाताना कोकण रेल्वेचा मार्ग आपल्या बाजूने जातो. सहज म्हणून गाडीतून बाहेर बघताना असे लक्षात आले एक मालगाडी शेजारून जाते आहे. तुम्ही म्हणाल मालगाडी... त्यात काय नवल? पण त्या मालगाडीवर खूप सारे ट्रक दिसले आणि मुख्य म्हणजे ट्रकमध्ये बसलेले ड्रायव्हर आणि क्लिनर असल्याचे आम्हाला दिसले. हे दृश्य आम्ही पहिल्यांदाच पाहिले. जवळपास एक चाळीस ते पन्नास ट्रक आम्ही त्या गाडीवर पाहिले.😳


पुढे स्टेशन आल्यामुळे ती गाडी थांबली. आम्ही मात्र पुढे महाड दिशेने जात राहिलो. यावेळेस कोकणात जाताना महाडच्या जवळून जाणारा रस्ता निवडून आम्ही कोकणात प्रवेश केला. अर्थातच पावसाची कृपादुष्टी या वेळेस भरपूर असल्यामुळे आणि निसर्गदेवता प्रसन्न असल्यामुळे अतिशय सुंदर सुंदर दृश्य  आम्हाला आमच्या नजरेत साठवून घेता आली. वळणावळणाचा रस्ता आजूबाजूची झाड आणि टुमदार कोकणातली घर याचा मनमुराद आनंद घेत, आम्ही आमचे ठरलेले ठिकाण कोळथरेकडे निघालो. जाताना मधे दापोलीला थांबून श्रेयस या व्हेज रेस्टॉरंटमध्ये जेवण, सोलकढी आणि कोथिंबीर वडीचा आस्वाद घेऊन 😋आम्ही पुढे निघालो. कोळथरेला पोहोचल्यानंतर अर्थात रूमवर सामान ठेवून आधी समुद्र किती जवळ आहे हे बघायला लगेच निघालो. कारण आलो तेव्हाच समुद्राची गाज कानावर पडली होती. रूम मधून बाहेर पडल्या पडल्याच आम्हाला समोरच समुद्रदेवतेचे दर्शन झाले.

 


कोळथरे हे छोटेसे टुमदार गाव. समुद्र किनारी वसलेले. टिपिकल कोकणातील घरे, छोटेसे रस्ते आणि नारळीपोफळीच्या बागा असलेले गाव. एकदम शांत आहे.  बऱ्यापैकी स्वच्छ असणारा आणि भरपूर शंख शिंपले असलेला असा हा समुद्रकिनारा बघताक्षणी डोळ्यात भरला. एका बाजूला काही पक्षी समुद्र काठी बसून मासे पकडत होते. मध्येच उडून समुद्रात काही अंतरावर जाऊन बसत. परत किनारी येत असे सुरू असल्याचे दिसले. किनाऱ्यावर निवांत खुर्चीवर, झोक्यावर बसून आम्ही बराच वेळ समुद्राकडेच पाहत होतो.  मन शांत करण्यासाठी हा देखावा अतिशय उत्तम आहे असे माझे स्पष्ट मत आहे. मनातले विचार असो किंवा डोक्यातले विचार असो बस ते दृश्य पाहता पाहता कधी निघून जातात आणि मन खूप शांत होतं हे आपल्यालाच कळत नाही. डोळ्यासमोर हे दृश्य आणा तर, नारळीपोफळीच्या बागा त्यात खुर्च्या जवळच बांधलेले झोके यावर बसून शांतपणे समोरचा नजारा बघणे. खरचं हे शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे असे हे निसर्ग संपन्न कोकण आम्हाला नेहमीच बोलवत असते. वर्षातून एकदा तरी कोकणात जाऊन यावं हा आमचा गेले कित्येक वर्ष असलेला नित्यक्रम. आम्ही शक्यतोवर न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत नाहीतर दिवाळीच्या सुट्टीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तसं पाहायला गेलं तर दापोलीच्या आजूबाजूचा सगळा परिसर, सगळी ठिकाणं आमची पाहून झालेली आहेत. पण तरीही त्यातल्या त्यात पुण्याहून जवळ असल्यामुळे दापोलीच्या आजूबाजूला राहणे, आम्हाला जास्त सोयीचे वाटते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कोळेश्वराचे दर्शन घेतले. जवळच दुर्गा माता मंदिर आणि विशेष म्हणजे इथे श्री कृष्ण आणि बलरामाचे सपत्नीक असे मंदिर आहे तेथेही ही जाऊन आम्ही दर्शन घेतले.🙏




श्री कृष्णाचे दर्शन नेहमी कुठे ना कुठे होते. पण बलरामासमवेत आणि दोघांच्या मूर्ती सपत्नीक असलेल्या अशा ठिकाणी आम्ही प्रथमच गेलो. तिथून पुढे जवळच असलेल्या बुरोंडी येथील श्री परशुरामांच्या मंदिरात जाऊन आलो. दुपारी जेवण करून जरावेळ आराम करून आम्ही समुद्र किनारी बसलो होते. सूर्यास्त व्ह्यायाला वेळ होता, पण सहज समोर पाहिले तर काही शेळ्या घेऊन चाललेला एक माणूस दिसला. त्याच्या हातात एक शेळीचे करडू होते. सकाळी तो माणूस जेव्हा शेळ्या घेऊन गेला तेव्हा त्याच्या हातात काहीच नव्हते. पण आत्ता दिसले म्हणून सहज विचारले किती महिन्यांचे आहे पिल्लू? तर त्याने सांगितले ५-१० मिनिटांचे आहे. आत्ताच झाले. आम्ही पाहतच राहिलो.😍 


काही वेळ तिथे थांबून आम्ही किनाऱ्यावर पायी पायी फिरत असताना पलीकडे कोणते गाव आहे आणि तिथे समोर एक मंदिर आहे ते पाहूयात म्हणून गेलो. ओहोटी असल्यामुळे आम्ही मधली खाडी सहज चालत चालत घोट्याच्यावर पाणी असलेले सहज पार करून पलीकडे गेलो. समोरच दिसणाऱ्या मंदिरात गेलो. प्रवेश करताच समोर संगमरवरी दगडाची श्री गणेशाची मूर्ती दृष्टीस पडली. तर तिच्या डाव्याबाजूला एक मूर्ती दिसली. चौकशी केली तर ती पात्रादेवी असून कोळथरेचेच जागृत देवस्थान असल्याचे समजले. कोळथरे अल्याड पल्याड हे कळले. दर्शन घेऊन आम्ही जवळच्या खडकावर बसून तिथून परत निघालो. काही कुत्री खाडीच्या पाण्यात खेळताना दिसली. शेळ्या गावाकडे जाताना दिसल्या. काही गायी समद्राकाठी निवांत बसल्या होत्या. काही माणसे समुद्रात खेळताना दिसली. तर सूर्य आपल्या घरी निघालेला दिसला. आम्ही आमच्या राहत्या ठिकाणी येऊन पोहोचलो. खरचं तो दिवस खूप आनंद देऊन गेला.
आल्यापासून समुद्रात खेळण्याची संधी मात्र माझ्या लेकाने सोडली नव्हती. 🏊मनमुरादपणे त्याने त्याचा आनंद त्यातून मिळवलाच. या दोन दिवसात आम्ही खूपशी ठिकाण न पाहता फक्त एक दोनच ठिकाण पाहिली.  जास्तीत जास्त वेळ आम्हाला समुद्रकाठी काढता येईल तो जास्तीत जास्त वेळ काढण्याचा आम्ही प्रयत्न केला.कोकण म्हंटले की आले कोकम सरबत आणि दुसरा म्हणजे उकडीचे मोदक. यांचा स्वाद घेतल्याशिवाय आपली सफर संपूर्ण होतच नाही ना राव. 



तिसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही पुण्याकडे यायला निघालो. ठरलेल्या प्लॅनमध्ये थोडासा बदल करत आम्ही लवकर निघण्याचे ठरवले. आम्ही कोळथरेचा छोटासा घाट चढून बुरोंडीच्या रस्त्याला लागलो आणि अचानक समोर एक प्राणी दिसला बघताक्षणी मी म्हटलं हा तर कोल्हा आहे. गाडी थांबवली तर अक्षरशः गाडी पासून दोन फुटावर असलेला कोल्हा.😲 आम्ही खूप जवळून पहिल्यांदाच पाहिला आणि याच आनंदात आम्ही पुढे निघालो. पुढेही एका वळणावर वळताना एक रस्ता रिसॉर्टकडे वर जाणार होता. तिथेही एक कोल्हा शांतपणे बसून आमच्याकडे पहात होता. आम्ही त्याच्याजवळ जाण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यानी काही दाद दिली नाही तर तो लांब पळाला. मग तिथून आम्ही निघालो आणि पुढे वरंधामार्गे यायचे या दृष्टीने महाडकडे वळून भोरच्या रस्त्याला लागलो. अचानक ठरल्यामुळे आम्ही शिवथरघळ करून पुढे पुणे गाठू असं ठरवलं असल्याने आम्ही शिवथरघळीकडे जायला वळलो.



खूप वर्षांपूर्वी पाहिलेली शिवथरघळ फारशी आठवणीत नसलेली, पण तिथला धबधबा मात्र आठवत होता. अगदी घळीच्या पायथ्याशी गाडी जाते. उतरून समोर काहीच पायऱ्या चढून आपण शिवथरघळीत प्रवेश करतो. सुरुवातीला स्वागतालाच माकड थांबलेलीच होती. आम्ही गेलो तेव्हा जवळजवळ बारा वाजलेले होते आणि नैवेद्य दाखवून तिथे खिचडीचा प्रसाद सगळ्यांना मिळणार होता. आम्ही अगदी वेळेत पोहोचल्यावर तिथे जाऊन आम्ही श्री रामदास स्वामी आणि श्री कल्याण स्वामी यांचे दर्शन घेतले. पूर्ण गुहा फिरून बघितली आणि परत सभागृहमध्ये येऊन बसलो. एक दहा मिनिटात सगळ्यांना खिचडी आणि त्याबरोबर लोणचे असा प्रसाद सगळ्यांना वाटण्यात आला. समोरच दोन आजी ताक घेऊन बसल्या होत्या. गरम गरम खिचडी🍲 (ती इतकी भक्तिभावाने करतात की त्याची चव पुढे कित्येक दिवस जिभेवर रेंगाळत राहते) आम्हाला आवडलीच पण त्याबरोबर ताकही उत्तम मिळाले. तिथला प्रसाद घेऊन आम्ही परतीच्या वाटेला निघालो. वरंधा घाटामार्गे भोरकडे येताना निरा देवघर धरण आपली सोबत करत असते. त्याचे विस्तीर्ण स्वरूपात पसरलेले बॅक वॉटर किती बघू आणि किती नाही असे मला झाले. यावेळी निसर्गाचे हे सोज्वळ रूप पाहून भान हरपून गेले होते हे नक्की. 


प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या ट्रिपमध्ये वेगवेगळ्या अनुभव येतच असतात आणि ते सगळे गाठीशी बांधून आपण पुढच्या ट्रीपचा प्लॅनिंग करायला तयार झालेला असतो हे नक्की. असेच आमचे नेहमी होते. तुमचे होते का हो असे?🤗


© kkdhanashree 

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद