खेळ मांडियेला....

 वरूण देव आणि सूर्यदेव यांचा सोंगट्यांचा डाव चालूच होता. आता देवांचा डाव म्हणल्यावर तो थोडीच लगेच संपणार आहे. दोघेही त्वेषाने खेळत होते. डाव खरंच रंगात आला होता. पण अचानक काही शब्द त्यांच्या कानी पडले, "आम्ही पृथ्वीतलावर जो डाव मांडला आहे, त्यापुढे हा डाव काहीच नाही." वरूण देव आणि सूर्य देवांनी बघितले तर आदिशक्ती जिजाऊ तेथे आल्या होत्या. दोघांनीही जिजाऊंना विचारले, "का बरे, असा कोणता डाव तुम्ही मांडला आहे?" जिजाऊ म्हणाल्या " तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघा." दोघांनाही प्रश्न पडला की पृथ्वीतलावर हा डाव तरी कोठे मांडला आहे. जिजाऊ म्हणाल्या, "ते बघा प्रबोधिनीचे काही मावळे त्याच दिशेने जात आहेत. जा त्यांच्याबरोबर आणि बघून या. राजे शिवाजी देखील तिकडेच गेले आहेत."



असे म्हणल्यावर वरूण देव आणि सूर्यदेव ढगांच्या मागून लपतछपत या प्रबोधिनी गटाच्या मागे मागे जायला लागले. हा प्रबोधिनी गट करतो तरी काय ते बघायला लागले तेव्हा हा गट कुरवंडे गावात पोह्यांवर ताव मारत होता. दोघांच्याही तोंडाला पाणी सुटले. पण त्यांना जास्त उत्सुकता होती की पुढे काय डाव मांडला आहे. 


आता प्रबोधिनी गट पोहे खाऊन तयार झाला होता. कुरवंडे गाव, आजूबाजूचा सह्याद्री परिसर या भौगोलिक परिस्थितीची माहिती सर्वांनी घेतली. ही भौगोलिक परिस्थिती आपल्या दोघांमुळेच इथे तयार झालेली आहे असे म्हणून वरूण देव आणि सूर्यदेव यांनी स्वतःच्याच पाठीवर शाबासकी दिली. नंतर प्रबोधिनी गट नमस्ते करून नागफणीवर चढायला गेला. आता या नागफणीला जावे की न जावे याच्यावर दोन्ही देवांची चर्चा सुरू झाली. तेवढ्यात एका मावळ्याला चक्कर आली हे दोघांनी बघितले. ताबडतोब वरूण देवाने सूर्य देवाला ढगांमागे लपवले. गटातील अनुभवी व्यक्तींनी त्या मावळ्यावर प्रथमोपचार करून त्याला शुद्धीवर आणले. खरंच बिकट प्रसंग होता. पण समय सूचकतेचे भान ठेवून गटातील अनुभवी व्यक्तींनी अनुचित प्रकार घडू दिला नाही. तो मावळा विश्रांतीसाठी तेथेच बसला आणि बाकीच्या मावळ्यांनी नागफणीकडे कूच केले. नागफणीवर चढता चढता विविध रंगांची फुले बघून आपण फुलांच्या बागेतून चाललो आहोत असे वाटत होते. नागफणीवरुन या अवाढव्य सह्याद्री रांगेतील विसापूर, लोहगड पासून तुंग, तिकोना तसेच काही घाट वाटा असा बराच परिसर अतिशय उत्तम दिसत होता. मानवाने आपल्या सोयीसाठी या सह्याद्रीमध्ये जे खोदकाम सुरू केले आहे तेही दिसत होते. वारा तर भन्नाट वेगाने वाहत होता. या गटाबरोबर काही छोटे मावळे होते. ते तर सह्याद्रीचा सुंदर परिसर बघून अतिशय उल्हसित झाले होते. तेथून दिसणाऱ्या सह्याद्रीचे नजर सुख घेऊन मावळे परतीच्या वाटेला लागले.



नागफणी वरून सह्याद्रीचे दर्शन घेऊन सूर्यदेव आणि वरूण देव यांना थोडासा अंदाज येऊ लागला होता, पण तरीही नक्की डाव कोणता मांडला आहे ते कळत नव्हते. आता प्रबोधिनी गट नागफणीवरून असाच शेजारील सोंडेवरून खाली उतरायला लागला होता. सोंडेवरचा उतार खूपच जास्त होता. त्यामुळे बऱ्याच जणांची घसरगुंडीची हौस ही फिटली. इथे गटाचे दोन भाग झाले. एक गट पुढे गेला. तर एक गट हळूहळू मागून जाऊ लागला. देवांना हे कोडे उमगले नाही. तरीही ते त्यांच्या पाठोपाठ जातच राहिले. हळूहळू पुढील गट अंबा नदीपर्यंत पोहोचला देखील. मध्ये एक दोन ओढे लागले. बऱ्याच ठिकाणी अतिशय सुंदर फुले उमलली होती. हा काळच असा की आजूबाजूस सगळीकडे फुलांचा गालिचा अंथरला आहे असेच वाटते. त्या फुलांवरून कितीतरी फुलपाखरे अगदी मनसोक्त उडत होती आणि या निसर्गसौंदर्यात भरच घालत होती. मध्येच सारथी मामांनी एक हाताच्या पंजा एवढा खेकडाही पकडला. तो त्यांनी उचलून बाजूला केला. खेकडा अगदी निर्धास्तपणे व्यवस्थित शांतपणे चालत चालत बाजूला गेला. या निसर्गचक्रात फक्त मानवच नाही तर इतरही असंख्य प्राणी आहेत याची जाणीव येथे झाली. या विविध पशुपक्षांमुळे या निसर्गाला एक वेगळेच सौंदर्य लाभते. हा घाट उतरताना आजूबाजूस सर्व सह्याद्री हिरवा गार दिसत होता. अर्थात ही वरूण देव आणि सूर्यदेवाचीच कृपा. 



हळूहळू चालत चालत गट उंबरखिंडीच्या स्मारकापाशी येऊन पोहोचले आणि भ्रमंतीची सांगता होण्याची वेळ आली. सर्वांनी स्मारकाचे दर्शन घेऊन यथासांग पेटपुजा केली. पण तरी देखील सूर्यदेव आणि वरूण देव यांना डाव मात्र उमगला नव्हता. तिथेच प्रबोधिनीचे जाणकार मावळे कामास आले. गटातील प्रमुख इतिहास तज्ञांनी उंबरखिंडीचा इतिहास वर्णन करून सांगितला. ती वर्णन करून सांगण्याची पद्धतही अशी होती ती सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. नुसता इतिहासच नाही तर त्या इतिहासावर आधारित नाटिकेतील संवादरुपी एकपात्री प्रयोग देखील सुंदर जमला. हा सर्व इतिहास ऐकल्यावर उंबरखिंडीचा डाव कोणता, अर्धा गट मागे का राहिला, अर्धा गट पुढे का आला, या गटाने हीच भ्रमंती का योजिली या सर्व गोष्टी सूर्यदेव आणि वरूण देव यांना कळून चुकल्या. खरंच शिवरायांनी हा जो डाव मांडला आणि यशस्वीरित्या पार पाडला त्यापुढे आपला सोगट्यांचा डाव खूपच साधा आहे हे वरूण देव आणि सूर्यदेव एकमेकांना सांगू लागले. तेवढ्यात त्यांच्या कानावर पद्य ऐकू आले. प्रबोधिनीचे बाल मावळे खणखणीत आवाजात पद्य म्हणत होते आणि सर्व पालक त्यांना साथ देत होते. 



"हाच तो हिंदवी स्वराज्याचा डाव जो आम्ही 400 वर्षांपूर्वी मांडला आहे आणि तो अविरत अजूनही चालू आहे." असा आवाज देवांना त्यांच्या मागून ऐकू आला. बघतात तर काय..... मागून शिवराय या सर्वांवर देखरेख करत होते. पण देव त्यांच्याशी बोलणार इतक्यात शिवराय स्वराज्यावरील देखरेखीसाठी पुढील घाट वाटेला मार्गस्थ झाले होते. 


जय भवानी!

जय शिवाजी!

©kkdhanashree 

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद