भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
भ्रमंती रसिकहो ही कथा आहे वरूण देवाच्या रुद्रावतराची, मावळ्यांच्या एका सोप्प्या धाडसाची आणि वरूण देवाच्या पाठिंब्याची....
या कथेत नेहमी प्रमाणे प्रबोधिनीचे काही मावळे आहेत. या मावळ्यांनी वरूण देवाकडील नाण्याची एक बाजू लींग्या घाटात बघितली. आता यांना नाण्याची दुसरी बाजू बघायची होती. त्यासाठी नियोजन गटाने प्रचंड मेहनत घेऊन आणि तपश्चर्या करून वरूण देवाची परवानगी घेतली. हे कार्य आषाढ महिन्यातच करण्याचे योजिले. मात्र वरूण देवाने एक अट घातली...... ती अशी की...... सर्वांना ही मोहीम सोप्पी आहे असे सांगायचे.....आणि स्वामींकडून एक मंत्र दिला 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे".... नियोजन समितीला काही बोध होईना...आता देवाजीच्या आले मना....तर नियोजन समितीने ही अट मान्य केली आणि मोहिमेचा श्रीगणेशा केला.
मोहिमेत मावळ्यांची संख्या बघता दोन रथ घ्यावे लागले. हे रथ आषाढ कृष्ण अमावस्येला...हो अमावस्येलाच... रणभूमीवर एक सोप्पा पराक्रम गाजवण्यासाठी निघाले. वरूण देवांनी आपल्याकडील नाणे थोडे तिरके करायला सुरुवात केली. हे बघून सूर्य देव ढगांच्या मागे दडी मारून बसले ते दिवसभर बाहेर आलेच नाहीत. त्यामुळे त्यांनी एक सोप्पी भ्रमंती बघायची संधी मात्र दवडली.
पराक्रम गाजवायचा म्हणजे थोडी पेट पूजा आलीच. रथ केळदला पोहोचले आणि समोर आले पोहे. आता वरूण देवाने दिलेला स्वामींच्या मंत्राचा पहिला अनुभव इथे आला. त्या पोह्यात काही पुणेकरांना मिरच्या बघून थोडी धस्तीच वाटली पण स्वामींचा मंत्र आठवला ...' भिऊ नकोस.....'... मिरच्या केल्या बाजूला आणि पोहे झाले गट्टम्. पेट पूजा झाल्यावर ओळख झाली गणती झाली आणि मावळे रणभूमीकडे दोन सारथी मामा घेऊन झेपावले.
रणभूमीवर वरूण देवता भलताच खेळ खेळत होती. वरून रपरप पाऊस तर पडत होताच पण त्या सोबतीला ढगही धरणी मातेला आलिंगन द्यायला आले होते. त्यामुळे हळूहळू अंदाज घेऊन सर्वजण पुढे चालले होते. थोड्या वेळाने मढे घाट उतरण्यास सुरुवात केली. या मढे घाटातही इतके पाणी येत होते की पडून कपाळमोक्ष न होण्यासाठी एक एक पाऊल जपून टाकावे लागत होते. थोडे पुढे गेल्यावर मढे घाटाचा तो धबधबा बघितला आणि सर्वांना धडकीच भरली. वरूण देवाने नाणे उलटे करण्यास सुरुवात केली होती याची प्रचिती आली. त्या पाण्याचा प्रवाह, त्या पाण्याचा जोर काही वेगळाच होता. इथेही परत वरूण देवाने दिलेला स्वामींचा मंत्र आठवला......' भिऊ नकोस.....' आणि रथ पुढे नेले.
रणभूमीवर काय नव्हते.... तलवारी होत्या भाले होते बंदुका होत्या.... फक्त त्याचे रूप वेगळे होते. त्याचे रूप फक्त एकच ..... ते म्हणजे धो धो धो धो पाणी. याच पाण्याच्या वर्षावातून मावळे मार्गक्रमण करत होते. वरूण देवाने नाणे इतके उलटे केले होते की निसर्गदेवताही त्यापुढे नतमस्तक झाली होती. आजूबाजूचे काही दिसतच नव्हते. पण वरूण देवता आणि निसर्गदेवता यांची काहीतरी मांडवली झाली असेल म्हणून थोडा वेळ का होईना निसर्गदेवतेने मावळ्यांना दर्शन दिले. हिरवेगार डोंगर, छोटे छोटे धबधबे, ओहोळ, ओढे मावळ्यांना बघायला मिळाले.
मढे घाट उतरला, लढाईतील पहिला टप्पा जिंकला म्हणून मावळे थोडे आनंदातच होते पण समोर आला एक ओढा. पुढे जायचे तर हा ओढा ओलांडायला हवा पण हा ओढा कसला... अहो... त्याचे पाणी इतके जोरात होते की इंद्राचा ऐरावतही त्यातून वाचू शकला नसता. त्यालाही ओढ्याने स्वतःबरोबर पुढे नेले असते. इथेही वरूण देवाने दिलेला स्वामींचा मंत्र आठवला......' भिऊ नकोस.....' आणि मावळ्यांनी ओढा पार करायचा चंग बांधला. मानवी साखळी तयार केली. स्वामींचा मंत्र म्हणला आणि एक एक करून ओढा पार केला. तसा हा पराक्रम सोप्पाच पण हा पराक्रम करूनही मावळ्यांना स्फुरण चढले आणि जिजाऊ शिवाजी आणि महादेव यांच्या गर्जनेने आसमंत दणाणून निघाला.
घोषणा देताना काहींची भावना - मला पावसाळा खूप आवडतो कारण पावसात भिजताना डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत - तर काहींची भावना - कोकणात पाणी कमी पडू नये म्हणून अश्रूंना मोकळी वाट करून दिली - अशी असावी.
लढाई जवळ जवळ जिंकलीच होती पण तरीही उरलेली लढाई जिंकण्यासाठी उत्तेजक द्रव्य आणि थोडे सटर फटर खाऊन वाटचाल पुढे चालू ठेवली. या वाटचालीत उपांडे घाट आडवा उभा होता. मावळ्यांनी बाह्या सरसावल्या, वरूण देवाने दिलेला स्वामींचा मंत्र आठवला......' भिऊ नकोस.....' आणि शेवटचा जोराचा धक्का देऊन ह घाट ही लीलया पार केला आणि परत केळद ला पोहोचले.
आता लढाई संपली असे वाटत असतांनाच परत सर्वांना मंत्र आठवावा लागला. कारण जेवणाची सोय केळद नाही तर वेल्हेला होती. मग काय सर्वांनी रथ काढले आणि निघाले वेल्ह्याला. तिथे पोटातील आगीचा डोंब कमी होत गेला आणि सर्वांनाच सोप्पी मोहीम आणि मंत्र याचा अर्थ कळायला लागला. यावर मात्र मराठी माणूस खडबडून जागा झाला आणि त्याचे आद्य कर्तव्य निभवण्यास त्याने सुरुवात केली.... कोणते कर्तव्य..... वरूण देवाने नाण्याची दुसरी बाजू किती प्रमाणात दाखवली यावर 'चर्चा.'
पण ही चर्चा फार काळ झाली नाही याचे कारण विशेष होते. वेल्ह्यात प्रबोधिनीचे प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्राला मावळ्यांनी भेट दिली. त्यांचे कार्य समजून घेतले. ते करत असलेले कार्य बघून सर्वांनाच त्यांचे कौतुक वाटले. त्यांना शुभेच्छा देऊन सर्वजण एक वेगळा अनुभव घेऊन सुखरूप स्वगृही परतले.
वरूण देवाकडील नाण्याची दुसरी बाजू आपल्याला दिसली का नाही दिसली, दिसली तर ती किती प्रमाणात दिसली हे सर्वांनी स्वतःचे स्वतःच ठरवावे हे उत्तम.
©kkdhanashree
Comments
Post a Comment