निसर्ग देवाचा खेळ

      

         एकदा काय झाले, सूर्यदेव आणि वरूण देव हे दोघे मोबाईलवर इंटरनेट वापरून व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादीवर खूप मग्न झाले होते. हे भगवान विष्णूंनी बघितले आणि त्यांनी दोघांनाही सांगितले की तुम्ही जर हे सोडून पटाचा डाव खेळलात तर मीही त्या खेळात तुम्हाला सामील होईन. आता भगवान विष्णूंनी सांगितले म्हणल्यावर सूर्यदेव आणि वरूण देव पट खेळायला बसले. पटावर बऱ्याच सोंगट्या आणि काही फासे होते. दोघांनीही आलटून पालटून फासे टाकण्याचे आणि सोंगट्या हलविण्याचे ठरविले. असा हा खेळ सुरू झाला आणि पटावरील सोंगट्या हालायला लागल्या.


सोंगटी १ : सूर्य देवाने फासे टाकले आणि पहिली सोंगटी हलवली. चैत्र महिन्यात पृथ्वीवर भरपूर ऊन पाडले. लोकांना घामाच्या धारा येऊ लागल्या. सूर्यदेव नुसते तळपत होते आणि हसत होते.


सोंगटी २ : सूर्य देवांचा हा प्रताप पाहून वरूण देव गालातल्या गालात हसत होते. त्यांनी पण हळूच एक सोंगटी हलवली. ही सोंगटी कुठली तर नियोजन समितीची एक बैठक झाली आणि त्यात यावर्षी कोणते गड किल्ले किंवा घाटवाटा करायच्या हे ठरले.


सोंगटी ३ : आता पटावरील सोंगट्या पटापट हालायला लागल्या होत्या. आषाढ महिन्यात लिंग्या घाट कूर्डूगड आणि निसणीची वाट ही सोंगटी हलवायची असे ठरले. नियोजन समितीने पटापट सगळा आराखडा तयार केला आणि मावळ्यांना आवाहन केले तर असे वीस मावळे या मोहिमेत सामील झाले.


सोंगटी ४ : आषाढ दुर्गाष्टमीला ही सोंगटी हलली. एक मोठा रथ धामण ओहोळ या गावाच्या दिशेने निघाला.


सोंगटी ५ : आता वरूण देवाने आपले फासे टाकायला सुरुवात केली होती. पहाटे लवकर उठूनही सर्वांनाच बाहेरील निसर्ग पाहून खूप खूप आनंद झाला होता. त्यामुळे झोप कुठल्या कुठे पळाली.



सोंगटी ६ : ही सोंगटी न्याहरीची. या निसर्गाचा आनंद घ्यायचा तर थोडी पेट पूजा आवश्यकच होती. म्हणून मावळ्यांनी गरमागरम पोहे खाल्ले आणि एक सारथी मामा घेऊन लिंग्या घाटाची वाट पकडली. हा घाट म्हणजे आपण नुसता घाट उतरतो असे अजिबातच नव्हते. उजव्या बाजूला धबधबा होताच पण या घाटावरील वाटेवरून एवढे पाणी वाहत होते की जणू काही आपण धबधब्यातूनच खाली उतरत आहोत असेच वाटत होते. 


सोंगटी ७ : या सोंगटी ने निसर्गाचे रौद्ररूपही दाखवले. पाऊस एवढा जोरात पडत होता की पाच सहा फुटांवरचे देखील नीट दिसत नव्हते. धबधब्याचा आवाज तर एवढा जोरात होता की एकमेकांशी बोललेले ही नीट कळत नव्हते. लिंग्या घाटात पाणी एवढे जोरात येत होते की काही काही वेळा लोकांना मानव साखळी करून पाणी पार करावे लागत होते. या निसर्गापुढे मानव अगदी क्षुल्लक प्राणी आहे याची जाणीव होत होती. या घाटातच भगवान विष्णूंनी वामन अवतारात सर्वांना दर्शन दिले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 


सोंगटी ८ : ही सोंगटी हलली आणि तिने माणूस खेकडा कसा पकडतो हे दाखवून दिले.अरे हा बघ खेकडा असे म्हणे पर्यंत मामांनी तो एक वित मोठा खेकडा पकडला सुद्धा. पुढे अजून एक खेकडा दगडामागे लपत होता. तर मामांनी त्या दगडामागे हात घालून तो खेकडा पकडला आणि खिशात टाकला. असे काही खेकडे मामांनी त्यांच्या रात्रीच्या मेजवनीसाठी पकडले. 


सोंगटी ९ : या सोंगटीपुढे कुर्डूगड चढण्याचे आव्हान होते. चढाई सुरू करण्याआधी देवीचे दर्शन घेतले आणि कुर्डूगड चढण्यास सुरुवात केली. यावेळेस वरूण देवाने थोडी विश्रांती घेतली होती त्यामुळे आजूबाजूचा नजारा पाहण्यात एक वेगळीच मजा आली. वरती काळे ढग, त्यातून बरसणारा पाऊस, पावसाने घेतलेली थोडी विश्रांती, खाली हिरवे गार डोंगर, त्या डोंगरांमधून फेसाळणारे धबधबे, नदीपात्रात जाणारे ओहोळ, मध्येच कौलारू घरे हे सर्व दृश्य पाहून मन उल्हासित होत होते. 


सोंगटी १० : ही सोंगटी कातळ सौंदर्याची. कुर्डूगडावर निसर्गाने काही वेगळेच रूप धारण केलेले दिसले. एक नैसर्गिक मोठी गुहा पाहून सर्वजण थक्क झाले. नुसते एवढेच नाही तर या गुहेला वळसा घालून गेल्यावर एक कडा डोंगरापासून विलग झालेला आहे आणि त्या कड्यावर वरतून आणखीन एक कडा कोसळलेला आहे आणि एक मोठे नेढे तयार झाले आहे. या नेढ्यातून समोर बघितले की हिरवे गार डोंगर आणि भरपूर धबधबे असे दृश्य दिसते. या कुर्डूगडाच्या गुहेमध्येच भगवान विष्णूंनी कृष्णावतार धारण केला आणि सर्वांना हा भ्रमंतीचा डाव यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


सोंगटी ११ : या सोंगटीने काही वेगळीच वाट पकडली. गड बघून परत देवी मातेच्या मंदिरात आलो तर देवी माता ही प्रसन्न झाली आणि अचानक सर्वांना गरमागरम चहा मिळाला. चहाबरोबर थोडी पेट पूजा करून सर्वजण परतीच्या वाटेला लागले.


सोंगटी १२ : ही सोंगटी परतीच्या वाटेची. निसणीच्या वाटेला चढण थोडी जास्त आणि शिवाय मध्ये एक दोन पाण्याचे ओहोळ ही होते. पण तरीही मावळे न डगमगता न थांबता ही निसणीची वाट चढून परत धामण मोहोळ या गावी परतले.


सोंगटी १३ : आता मात्र या खेळात अन्नपूर्णा देवी देखील सामील झाली आणि सर्वांना कांदा भजी झुणका भाकर उसळ डाळ भात देऊन सर्वांना तृप्त आणि समाधानी केले. 


सोंगटी १४ : डाव रंगात आला होता पण आता सर्वांना परतीचे वेध लागले होते. सर्वांनीच आपल्या रथात परत जागा पटकावल्या आणि रथ पुण्याच्या दिशेने रवाना झाला.


सोंगटी १४ : श्री गणेश आणि सरस्वती देवी यांनीही या पटावर येऊन रथाचा आरसा कसा ठीक करावा याचे शिक्षण दिले आणि काही जणांना त्याच्यात तरबेजही केले.


संगती १६ : ही सोंगटी हलली ते सर्वांना एकत्र भ्रमंती करण्याविषयी काही नियमांची आठवण करून देण्यासाठी. सर्वांनी या भ्रमंतीत आपण काय दिले आणि काय मिळवले याची उजळणी मनातच केली.


सोंगटी १७ : या सोंगटी बरोबर रथ पुण्यात येऊन पोहोचला. खरंच या खेळात वेळ कसा गेला हे कोणालाच कळले नाही. 


तर असा हा खेळ सूर्यदेव आणि वरुण देव दोघेही खेळतच राहणार आहेत. या खेळात सामील होऊन त्याची गंमत अनुभवण्यात एक वेगळीच मजा आहे. ती मजा सर्वांनी जरूर घ्यावी.

©kkdhanashree 

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद