आपण हे बघितले का?

 

स्वतःची कामे सोडून सर्वांसाठी एक भटकंती आयोजित करणे हे तुम्ही कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


अनोळखी भागात फिरण्यासाठी ओळखीच्यांची मदत घेऊन एक डोंगर यात्रा यशस्वीरित्या पूर्ण करणे हे कुठे बघितले आहे का?

हो अंधारबन ट्रेक मध्ये.


आयत्या वेळेस काय सांगता, आता नाही जमणार. त्यापेक्षा तुम्हाला घेऊन आम्ही पुढे जातो असे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


बोंबलत फिरण्याचा मक्ता काय फक्त पुरुषांकडे आहे का, स्त्रिया ही काही कमी नाही असे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


भ्रमंतीची सुरुवात अनोळखी म्हणून आणि भ्रमंतीच्या शेवटी अगदी बऱ्याच दिवसांपासून ओळख आहे असे वागणे हे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


एरवी त्या कॉम्प्युटर समोर बसून डोळे फाडणारा पण विचारले तर वाटाड्या म्हणून १६ किलोमीटर सहज चालणारा असा वाटाड्या बघितला आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


पुण्यात हिवाळ्यात भ्रमंती आणि ती पण एसी बस मध्ये हे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


आपल्या सह्याद्री मित्राला भेटण्यासाठी पावसाळाच पाहिजे, हिवाळ्यात काय जायचे असे न बोलता हिवाळ्यातही त्या मित्राला घट्ट मिठी मारायला जाणे हे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


समोरचा माणूस पाहून स्वतःचे रंग बदलतो असा माणूस तुम्ही पाहिला असेल पण माणूस कुठलाही असो फक्त ऋतूप्रमाणे रंग बदलणारा सह्याद्री बघितला आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


सूर्यदेवतेलाही जमिनीला स्पर्श करण्यासाठी झाडांची परवानगी घ्यावी लागते असे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


भले स्वतःला दोन किलोमीटर पायपीट करून कळशीभर पाणी आणावे लागले तरी चालेल पण दारात आलेल्या वाटसरूस दोन बाटल्या पाणी असेच देणे हे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


एकीकडे एसी मध्ये बसण्याची सोय पण जागा नाही... ना हॉटेलमध्ये ना हॉटेलवाल्यांच्या मनात .... त्यामुळे तुच्छतेची वागणूक हे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


तर दुसरीकडे परिस्थिती कशीही असली तरी अगत्याने सर्वांचे स्वागत, आलेल्या वाटसरुस पोटभर आणि मन समाधानी होईपर्यंत उत्तम असे जेवण हे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


शहरातील हजारो रुपयांची ती मोठी बादशाही थाळी च्या थोबाडीत मारेल अशी झुणका भाकर भात उसळ याची थाळी कुठे बघितली आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


जेवता जेवता मनमोकळेपणे बोलत आपले अनुभव दुसऱ्यांना सांगणे आणि दुसऱ्यांचे ऐकणे हे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


दुखापत झाली तर आपल्या सवंगड्याला मधेच सोडून न जाता त्याला बरोबरच घेऊन जाणे हे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


अपॉइंटमेंट न घेता कोणतीही फी न घेता डॉक्टरांनी रुग्णावर लगेच उपचार करणे हे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


आपल्या बरोबरील अनोळखी व्यक्तींची जबाबदारी आपलीच आहे असे समजून आपल्या पिशवीत गॅस आणि शेगडी १६ किलोमीटर वाहवणे आणि त्यावर चहा करण्याची तयारी असणे हे कुठे बघितले आहे का?

हो, अंधारबन ट्रेक मध्ये.


अजूनही लिहिण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्या पुढच्या वेळेसाठी राखीव ठेवून इथेच निरोप घेतो. 

धन्यवाद!

केयूर कानडे

©kkdhanashree 

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद