जय सोमनाथ! 🙏 जय गिरनारी! 🙏

 काय सांगता! दहा हजार पायऱ्या😱 बापरे!🙆 माझ्या तर विचारांच्या पलीकडे आहेत आणि... आणि काय सिंह परिवाराचे दर्शन 😲 हे तर अजिबात शक्य नाहीये. 


अहो थांबा! थांबा! खरं तेच सांगते आहे. जे आहे तेच. तर निमित्त होते यावर्षी दिवाळीतली छोटीशी पण जरा लांबची अशी सहल गुजरातची. थोडा विचार केला, गुजरात मध्ये काय काय बघण्यासारखे आहे. साधारण एका बाजूला येणारे किती ठिकाणं आपण पाहू शकतो. मग लक्षात आलं सोमनाथ, गिर आणि गिरनार हे तिन्ही कव्हर होऊ शकतात. मग काय ठरलं. मित्रांना सांगितल. दोन कुटुंब आम्हाला जॉईन झाले. कुठे, कधी, कसं हे सगळे ठरलं. बुकिंग झालं आणि निघालो.



सुरुवात सोमनाथाच्या दर्शनाने केली. मन शांत, प्रसन्न करणारी मोठी पिंड आहे. एकदम सुरेख. नवीन सोमनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन तर घेतलं, पण त्याचबरोबर जुन्या अहिल्यादेवी होळकरांनी स्थापन केलेल्या सोमनाथचेही दर्शन घेतले. बाजूलाच अथांग सागर आहे जो डोळ्यात जेवढा साठवता येईल तेवढा साठवून घेतला. आजूबाजूला छोटी छोटी बरीच ठिकाणं भेट देण्यासारखी आहेत. त्यांनाही जरा भेट दिलीच पण त्यातल्या त्यात लक्षात राहिलेली त्रिवेणी संगम आणि भालका तीर्थ. कृष्णाला जिथे बाण लागला असे ते भालका तीर्थ आणि त्रिवेणी संगम म्हणजे हिरण, कपिला आणि सरस्वती या नद्यांचा संगम. एक दिवसात सोमनाथ आणि आजूबाजूचा परिसर सहज पाहून झाला. 


पुढचा टप्पा आला गीरचा. अभयारण्य नावातच सगळं आलं. जरा भितभित जिप्सी मध्ये प्रवेश केला. ओपन जिप्सी.... आला एखादा प्राणी समोर तर आपली मज्जा.😆 हा विचार डोक्यात. त्यात आत जंगलात शिरल्यावर एके ठिकाणी सिंहाच्या पाऊलखुणा दिसल्या. अरे देवा! आता 😱 अशी हालत माझी झाली. सकाळची निरव शांतता. थंडीचे दिवस. सूर्योदयापूर्वीचे वातावरण. कल्पना करून तर बघा. 🤭

आपली एकमेव गाडी त्या रस्त्यावर. दूर दूर पर्यंत फारसे कोणी नाही. अंधारात चमकणारे प्राण्याचे डोळे. 🙈 बास बास खूप झाले वर्णन. 😰

 आम्हाला ससन गिर या अभयारण्यात तीन प्रकारचे घुबड, नीलगाय , काळवीट, हरीण, सांबर, मोर, लांडोर, माकड, मगर आणि सगळ्यात महत्त्वाचं तीन सिंहीणी आणि त्यांचे नऊ छावे असे दिसले. आपण मागतो एक डोळा देव देतो दोन असेच काहीसे झाले. पुढे गेल्यावर आम्हाला साक्षात सिंहाराजांचेही दर्शन झाले. त्याचे तर वर्णन करणं अतिशय कठीणच आहे.


दुसऱ्या दिवशी देवालीया पार्क हे ठिकाणही explore करायला आम्ही गेलो. काही ठराविक भागापुरता मर्यादित असलेले हे ठिकाण. याठिकाणी आम्हाला सिंह, सिंहीण, गिधाड, नीलगाय, हरीण, सांबर, मोर , बिबट्या बघायला मिळाले. छोटीच पण छान झाली ही सफारी. 
 


      तिथून थेट गिरनार गाठले. आता खरी मज्जा होती. हेच तर आम्हाला करायचे होते. याच साठी केला होता अट्टाहास. 
अंदाज घ्यायला एक पायथ्याशी चक्कर मारली. 
पण खर सांगू काही समजले नाही🤷 फक्त डोक्यात दहा हजार पायऱ्या एकदम फिट बसल्या होत्या. आधी एक ,दोन वर्ष चालढकल केली होती खरी. पण आता समोर आहे म्हंटल्यावर मनाची चलबिचल झाली. तरी मनाचा हिय्या करून सकाळी ४.४५ ला चढायला सुरुवात केली. पहिला पाच हजार पायऱ्यांचा टप्पा पार केल्यावर हुश्श! झाले. पण पुढच्या टप्पा जरा कठीण आणि चढ्या पायऱ्यांचा आहे. काही चढत काही उतरत परत काही चढत, परत काही उतरत शेवटी दत्तशिखराच्या पायऱ्या चढल्या. बरोबर ९ वाजता जेमतेम १०-१५ पायऱ्या चढताना अचानक आरतीचे स्वर कानावर आले आणि काय सांगू काय वाटले. ज्यासाठी आलो ते ठिकाण समोर पाहून भान हरपले. दत्त दिगंबरांची मूर्ती अजून डोळ्यासमोर आहे. अंतरंग उजळून निघाले. अहाहा! काय वर्णन करू त्याचे.... धन्य झाले. धन्य झाले. 
जय गिरनारी 🙏🙇
जय सोमनाथ 🙏🙇

©kkdhanashree 


Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद