..... पंचम..... भाग - २
पुढचा मुक्काम आम्ही वारू गडाच्या पायथ्याशी करणार होतो. शिधा बरोबर घेतला होता. आम्ही महिमान गडाकडून गेलो त्यामुळे जवळजवळ निम्मा गड हा गाडीने चढला. नाहीतर फलटणच्या बाजूने जाधव वाडा येथून गड चढता येतो. बालेकिल्ल्याच्या पायथ्याला भैरवनाथाचे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि हे मंदिर अतिशय स्वच्छ ठेवले आहे. एक गणपतीचे मंदिरही आहे. भाविकांसाठी भरपूर जागा आहे. पाण्याची टाकी आहे. आजूबाजूला भरपूर मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत वानरही भरपूर आहेत .ते तुमची साथ अवश्य देतात. आम्ही गणेश मंदिरात पथाऱ्या टाकल्या. हातपाय धुवून देवाचे दर्शन घेतले आणि पहिला कार्यक्रम हा जेवण शिजवण्याचा करायला घेतला. सर्वप्रथम सर्वांना ताजे होण्यासाठी चहा झाला. त्यानंतर दूध भुकटीचे दूध तयार होते. शिवाय बाजारातून खिरीचे साहित्य घेतले होते. मग काय छान खीर तयार केली.
नंतर भाज्या चिरून छान पुलाव तयार केला. कांदे चिरून कांदा भजी तयार झाली. सिंहगडावरची खेकडा भजी आणि आम्ही तयार केलेली भजी यात काहीच फरक नाही बर का..... इकडे आम्ही जेवण तयार करत होतो तर काहीजण पाणी भरून ठेवत होते. मुलांनी आणलेले तंबू व्यवस्थित लावण्याचे काम केले. हे सर्व करताना संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ झाली. त्यामुळे आपसूकच शुभंकरोतीही म्हणले आणि इतर स्तोत्रेही . जेवण तयार झाल्यावर सर्वांनीच जेवणावर आडवा हात मारला आणि दिवसभराचा शिणवटा घालवण्यासाठी मस्त ताणून दिली.
दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे जाग आली तर झुंजूमुंजू लागले होते. आम्ही दोघे तिघेजण गडावर थोडी चक्कर मारून आलो. रविवारचा वार होता त्यामुळे खालील जाधववाड्यातून गाववाले वरती चक्कर मारण्यासाठी येत होते. आम्ही पण सकाळचे सगळे विधी उरकून बालेकिल्ला चढायला सुरुवात केली. वरती गडावर एक मोठी विहीर आहे. भैरवनाथाचे मंदिरही आहे. तटबंदी छान बांधली आहे आणि शिवाय त्याला रंगही छान दिला आहे. वरती चढताना पायवाट घसरडी होती त्यामुळे उतरताना थोडे दुसऱ्या वाटेने उतरलो. त्या वाटे पुढेच एक बारव दिसते, अतिशय सुंदर बांधलेली. त्यात पाणीही होते. तेथे थोडे फोटो काढून पुढे निघालो. गडाला एक छान फेरफटका मारला आणि परत सर्वांनाच उत्साह देणारा चहा तयार झाला. चहा घेऊन निघालो ते पुढचा शेवटचा गड तो म्हणजे संतोषगडाकडे.
संतोषगडही साधारण तीनशे साडेतीनशे मीटर उंच. या गडावर "बा रायगड" या संस्थेचे काही मावळे थोडी डागडुजी करताना दिसले. गडावर पोहोचलो तेच भन्नाट वाऱ्याने स्वागत केले. गडावर गेलो तर मोहनजोदडो प्रमाणे जुन्या बांधकामाचे अवशेष दिसतात. तटबंदी छान आहे. शिवाय काही काही बुरुजांच्या खाली भुयारांसारखे रस्तेही आहेत. एक देवीचे छान मंदिर आहे. सर्वच गडांवरून आजूबाजूला हिरवी शाल पांघरलेला निसर्ग खूप छान दिसतो. हे सर्व पाहून आम्ही गड उतरलो. एवढा गड बघून झाल्यावर जेवण फलटण जवळ केले.
हे सर्व गड नेहमीच्या गडांपेक्षा छोटे आणि सह्याद्रीच्या मुख्य धारे पासून लांब असले तरीही आपल्या हिंदवी स्वराज्याचे संरक्षण करण्यात आणि ते वाढवण्यात या गडांचाही मोलाचा वाटा आहे असे इतिहासातून दिसते.
असे हे पाच गडांची भ्रमंती करून पंचम दांचे "रीम झिम गिरे सावन" म्हणत आम्ही संध्याकाळी "सातच्या आत" सुखरुप घरी परतलो.
केयूर कानडे
©kkdhanashree





Comments
Post a Comment