सुधागडचे भ्रमंतीवर्णन....
केळीचे पान त्यात वाढलेले चारच जिन्नस. अतिशय उत्तम चव असणारे सुग्रास जेवण. लोणचे, मुगाची उसळ, बटाटा भाजी, गरम गरम तांदळाच्या भाकरी, गरम भात, आमटी आणि ताक! बास, अजुन काय हवे? वरून पाऊस अधेमधे सुरूच होता.
निमित्त होते ते ट्रेकिंगचे. पावसाळा सुरू होऊन २ महिने होत आले, पण ट्रेकिंगचा काही मुहूर्त लागेना. १४ ऑगस्टला jpp च्या किल्ले भ्रमंती वर मिलिंद दादांचा मेसेज आला आणि आपण जायचे हे नक्की ठरवले. यावेळी जरा सोपी ( दादांच्या भाषेत सोपी बरं का...😃) अशी चढाई असलेला सुधागड नक्की झाला. यावेळी google बाबाची मदत घेतलीच नाही. पूर्णपणे तिथे जाऊन गड पाहुयात या निर्णयाने रविवारी सकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी बस देवेश कर्वेनगरपासून निघाली. आम्ही २३ मावळे गड सर करायला निघालो. सकाळची मन प्रसन्न करणारी वेळ. त्यात लोणावळा मार्गे आम्ही खोपोलीहून पालीला जाणार होतो तिथून पुढे सुधागड. रस्त्यातील धबधबे, बोगदे आणि सर्वत्र हिरवा शालू ल्यायलेली धरित्री...... अहाहा!!
कल्पना करून पोट भरणार नाही त्यासाठी असा आनंद घ्यायला जायलाच हवे...🤩 नाही का....
आम्ही खोपोलीला उतरून पालीकडे जायला वळलो. एका ठिकाणी थांबून चहा घेऊन लगेच पुढे निघालो. वातावरण एवढे छान होते त्यात अजुन भर म्हणून चहा हवाच ना☕
पुढे मिलिंद दादांनी आम्हाला रस्त्यातील काही भागांची, गड किल्ल्यांची माहिती सांगितली तसेच थोरात दादांनी पण थोडी माहिती सांगितली. ज्ञानात भर पडली. सुधागडच्या पायथ्याशी पोहोचलो. न्याहारी करून गड चढायला निघालो. एक मामा आम्हाला वाटाड्या म्हणून लाभले. दिवसातून दोन वेळा गड चढतो उतरतो म्हणाले.😲 दोन वेळा बापरे! 🙆असे मला तरी झाले. मी एकदा चढून उतरले की बास 🙈
पुढे सुरुवातीची चढण चढून आम्ही पहिल्या शिडीपाशी आलो. मग तिथे आमचे पहिले नमस्ते झाले. पहिल्या पायरीवर वंदन करून ( थोरात दादांनी सांगितले की गडाला वंदन करून चढायची परवानगी मागायची म्हणून...) आम्ही शिडी चढायला सुरुवात केली. छोटीच शिडी कम लोखंडी जिना आहे तो. पहिली शिडी चढताना सगळे एकदम चढायला गेले आणि शिडी लागली डुगडुगायला. आईग्ग! मला तर दिवसा तारेच दिसले🌟 क्षणभर चढू का नको या विचारात जाऊ दे चढू या म्हणून गेले चढून. जरा पुढे चढण चढून गेल्यावर दुसरी शिडी आधीपेक्षा ही जरा मोठी दिसली. झाले दिव्यच आहे हे असे वाटले. पण हिम्मत करून हळूहळू चढले. पुढे जरा चढून गेल्यावर पायऱ्या आहेत जरा सुस्थितीत, म्हणाव्या तर जरा चढल्यावर नक्की कुठल्या दगडावर पाय ठेवून चढावे अशा काहीशा. पण तरी बऱ्याच बऱ्या. चढत चढत वर जाऊन थांबलो.
मुंबईचा एक ग्रुप आला होता. समोर पाटी होती चिलखती बुरुज... त्या ग्रुपमध्ये काही हिंदी बोलणारे होते. एक जण लांबूनच पाटी वाचत चालला होता. चीSSS... लSSS... खत बुरुज. त्याचे वाचणे बघून आधी हसू आले पण नंतर राग पण आला 😠काय हे? म्हणून. पुढचे संभाषण ऐकून कुठे तरी पळून जावे असे वाटले. एक जण सांगत होता "ये पत्थर काटके रॉक बनायला है"😱🤦
हाय रे माझ्या कर्मा काय हे? अरे आपला इतिहास एवढा छान आहे आणि हे लोक काय करत आहेत असे मला झाले. शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकवा तो शुद्ध मराठीतूनच..... असे मला तरी वाटते.....असो, पुढे आम्ही किल्ल्यावर पोहोचलो.
विस्तीर्ण असे पठार वर आहे. छोटे धबधबे दिसले. श्रावण महिन्यामध्ये ऊन सावलीचा खेळही पाहायला मिळत होता.
नभ उतरू आले.... याचाही अनुभव घेता आला. तैलबैला, घनगड या धुक्यातून अधेमधे डोकावताना दिसत होते. तिथे जवळच एक महादेवाचे मंदिर आणि बाजूला तळे दिसले. जरा फोटोसेशन करून आम्ही पुढे निघालो. विस्तीर्ण अशा पठारावरून चालताना मजा वाटत होती. जिथे जेवायची व्यवस्था केली होती तिथे आमच्या सॅक ठेवून आम्ही देवीच्या मंदिराकडे प्रस्थान केले. मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला टकमक टोक आहे. आम्ही भोराई देवीच्या मंदिराकडे गेलो. मागच्या वर्षी जीर्णोद्धार केलेले हे मंदिर, अतिशय सुबक जुने सागाच्या लाकडाचे खांब, वरचे छत नवीन केलेले आणि खाली सर्वत्र नवीन म्याटिन लावून घेतलेले दिसले. गाभाऱ्यात सर्वत्र स्वच्छ्ता होती. पूजा केलेली दिसत होती. मूर्ती च्या चेहेऱ्यावरचे भाव अतिशय शांत आणि विलोभनीय आहेत. दर्शन घेताना मन शांत तर झालेच पण प्रसन्न पण वाटले. सर्वांनी दर्शन घेतले.
जरावेळ थांबून तिथून पुढे महाद्वारकडे सगळे निघालो.
"जवळच आहे, अगदी जवळच आहे" असे ऐकत ऐकत आम्ही खाली उतरत होतो. पाऊस झाल्यामुळे निसरडी झालेली वाट. पायऱ्या होत्या पण दगडांवर शेवाळे साचलेले. कशी बशी वाट काढत आम्ही खाली उतरत होतो. त्यातही काही जणांचा पाय घसरला आणि जरा ते आपटले🙆 पण कोणाला फारसे लागले नाही. मग एकमेकांना सावकाश चला असे सांगत सांगतच पुढे उतरू लागलो. उतरून जरा खाली वाकून पाहिले तिथे भव्य दिव्य असे महाद्वार अर्थात नवीन बसवलेला दरवाजा दृष्टीस पडला. तिथे उतरताना शेजारच्या भिंतींवर शेवाळे दिसले पण ते दृश्य खूप अप्रतिम होते. डोळ्यात साठवून ठेवावे असे.
सगळे महाद्वाराजपाशी जमले. तिथे आमचा एक ग्रुप फोटो काढला. जरावेळ तिथे थांबून परत गडावर चढाई केली. वर आलो तसे काही जण चोर वाट बघायला गेले तर काही जण जेवणाकडे वळले. जेवणाच्या इथे सगळी तयारी झालेली होती. येतील तसे सगळे जेवायला बसत होते. सुग्रास जेवण झाले. 'अन्नदाता सुखी भव ' म्हणून जरा १०-१५ मिनिटे विश्रांती घेऊन आम्ही गड उतरायला सुरुवात केली. जेवढा वेळ गड चढायला लागतो त्यापेक्षा कमी वेळ उतरायला... येतानाही एकदम येणारी पावसाची सर आणि तिचा आनंद घेणारे आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. खाली येताना ३-४वेळा पावसाची सर आली. ५-७ मिनिटे आम्हाला ओलेचिंब करून गेली. आजूबाजूचा निसर्ग पाहत आम्ही उतरत होतो. आम्ही सगळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात जिथे गाडी पार्क केली होती तिथे पोहोचलो. टप्प्या टप्प्याने सगळे खाली उतरले.
चहापान झाले आणि प्रबोधिनीची प्रार्थना आणि नमस्ते झाले. आम्ही परतीच्या वाटेला लागलो. येताना एक उत्सुकता होती तर परतताना एक समाधान. जाताना आम्ही लोणावळा मार्गे गेलो होतो तर येताना आम्ही ताम्हिणी मार्गे परत येण्याचे ठरवले. google बाबाने ३ तास पुणे दाखवले मनात म्हंटले झाले घरी जायला चांगलाच उशीर होणार. पण मनातले विचार बाजूला ठेवून बाहेरचे नयनरम्य दृश्य अर्थात निसर्ग सौंदर्य पाहण्यात मी गुंतले. ताम्हिणी घाटाकडे जाताना असंख्य धबधबे दिसले. खूप छान वाटत होते. संध्याकाळची वेळ होत आलेली आणि मस्त वातावरणात आम्ही ताम्हिणी चढलो. येताना पण बरेच धबधबे दिसले. आजचा दिवस खरचं छान गेला. सगळ्यांसोबत दिवसभर खूप मज्जा केली. नवीन ओळखी झाल्या. मस्त वाटले🤗 साधारण ९ च्या सुमारास कर्वेनगर मध्ये आलो. सकाळी लवकर निघालेले सगळे अर्थात पेंगुळलेले होते पण तरी अधे मधे गप्पा या सुरूच होत्या. खाली उतरल्यावर सगळ्यांना परत भेटू म्हणून आम्ही आमच्या घरच्या वाटेला वळलो. एक छान दिवसाच्या आठवणी घेऊनच.....
© kkdhanashree








Comments
Post a Comment