......पंचम......
पंचम दा नव्हे तर पाच गड दोन दिवसात असे मला म्हणायचे आहे. तर कोणते हे पाच गड तर चला बघूया.
"पुढच्या काही दिवसात सह्याद्रीत भ्रमंतीला जाऊ." "महाबळेश्वर बाजू करू" "लोणावळा उतरून तिकडे फिरू" "नको त्यापेक्षा पुण्याजवळ बघू" असे म्हणता म्हणता बोलणे पावसाळी बेडक्यांवर अडत होते. हल्ली पाऊस सुरू झाला की सगळी पावसाळी बेडके बाहेर पडतात... आपल्या सह्याद्रीचे लचके तोडायला. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन सह्याद्रीचे असे हाल काही बघवत नाहीत. त्यामुळे आमच्या मित्रांनी ठरवले की थोडी वेगळी वाट पाहूया.
गड किल्ले भ्रमंती म्हणली की आपल्याला पुणे, रायगड, नाशिक, ठाणे जिल्हा असा सह्याद्रीचा एक वेगळाच पट्टा आठवतो. सह्याद्री डोंगर रांग जेवढी मोठी तेवढीच अक्राळ विक्राळ पसरलेली. या सह्याद्रीत पाऊसही खूप पडतो पण या सह्याद्रीच्या डोंगररांगा कुठे ना कुठेतरी जाऊन संपतातच. तेथे पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो आणि पाऊस थोडा कमी पडतो. तर असाच माणआणि खटाव तालुका. हे दोन्ही तालुके सातारा जिल्ह्यात येतात. सातारा जिल्ह्यात एका बाजूला भरघोस पाऊस तर एका बाजूला दुष्काळग्रस्त भाग असे दोन्ही आपल्याला बघायला मिळतात. शेवटी माण आणि खटाव तालुक्यातील काही गड ठरले. तसे पाच गड होते ते एका दिवसातही करता येतात. पण आम्हा सहा मोठ्या टाळक्यांबरोबर सहा छोटी टाळकी सुद्धा होती. त्या छोट्या टाळक्यांसाठी आम्ही ठरवले की हे पाच गड दोन दिवसात करू. एकूण बारा टाळकी आणि तीन गाड्या. बेत ठरला.
पहाटे पहाटे साडेपाचला घरून निघालो आणि हडपसरला सगळे भेटलो. हडपसर वरून थेट लोणंदला नाश्त्यासाठी थांबलो. लोणंदला एसटी स्टँड जवळ गरमागरम अननसाचा शिरा अतिशय उत्तम मिळाला. तसंच छोट्यांनी पुरी भाजी, डोसा यावरही ताव मारला. हे झाल्यावर आम्ही तडक निघालो ते कल्याण गडावर. कल्याण गडावर गाडी जाते पण आम्ही खालीच गाडी लावून पायवाटेने जाण्याचे ठरवले. कल्याणगड खूप उंच नाही. पण तरी पायथ्यापासून साधारण तीनशे ते साडेतीनशे मीटर उंच आहे. चढता चढता आम्ही मुलांबरोबर बऱ्याच विषयांवर गप्पाही मारत होतो. वरती गेल्यावर एक छान तळे, गणेश मंदिर, हनुमान मंदिर बघितले. प्रमुख दरवाज्याला डावीकडे एक दत्त मंदिर म्हणून लिहिले होते आणि साधारण वीस पंचवीस पायऱ्या खाली जात होत्या. आम्ही सर्वजण वीस पंचवीस पायऱ्या उतरलो आणि बघतो तर काय समोर एक अंधारी गुहा. मग मोबाईलचा दिवा लावून त्या गुहेत शिरलो. बसत बसत गुहेत शिरून साधारण पाच फूट अंतर गेल्यावर एक माणूस उभा राहील एवढी उंच ती गुहा होती. नंतर साधारण दीडशे ते दोनशे फूट चालल्यावर प्रसन्न दत्ताची प्रसन्न मूर्ती समोर दिसली. या गुहेत ही सुंदर मूर्ती पाहून मन शांत झाले. या गुहेत उजवीकडे थोडे पाणी होते. तेही आम्ही बाटलीत भरून घेतले. या पाण्याचा गोडवा काही निराळाच. दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही गड उतरलो. उतरताना आम्हाला जवळच तीन पवनचक्क्या दिसल्या. तशा या भागात बऱ्याच पवन चक्क्या आहेत पण या तीन पवनचक्क्या खूपच जवळून बघता आल्या. गडावर एवढे वारे होते की त्या पवनचक्क्या चांगल्या जोरात फिरत होत्या. त्या छान वाऱ्यात आमचे फोटो सेशनही छान झाले.
पुढचा गड वर्धनगड करण्याचे ठरले आणि थेट वर्धन गडावर स्वारी केली. वर्धन गडावर जाण्याकरता सुरुवातीला थोड्या पायऱ्या आहेत. पण नंतर साधारण पायवाटच आहे. वर्धनगडही खूप उंच नाही. साधारण अडीचशे तीनशे मीटर उंच आहे. गडाचा महादरवाजा नवीनच बांधून दुरुस्त केलेला आहे. वर्धन गडावर देवीचे, शंकराचे मंदिर आहे. दर्शन घेऊन आम्ही गड फिरायला निघालो. या गडावरही छान वारा होता. गडावरून खालील रस्ता दिसत होता. तो रस्ता विमानतळावरील धावपट्टीचाच आहे असा भास होत होता. गडावरील तटबंदी छान ठेवली आहे. गडावर मनसोक्त फिरून आम्ही खाली यायला निघालो तर आमची वाट मेंढ्यांनी अडवली. म्हणत होत्या आता इथेच थांबा. त्या सिमेंट च्या जंगलात जाऊ नका. आम्हीही त्यांना समजावले की आम्ही सिमेंटच्या जंगलात नाही तर महिमानगडावर जात आहोत तेव्हा कुठे त्या बाजूला झाल्या. 😃
वर्धनगड झाल्यावर पोटात कावळे कोकलू लागले होते. मग काय आम्ही पुसगांव येथे एका हॉटेलमध्ये जेवणावर आडवा हात मारला. शिवाय आम्ही आधी ठरवले होते की रात्रीही बाहेरच जेवू. पण ती म्हणतात ना चांगल्या भाषेत कंड. तर ही कंड जागी झाली आणि तेथेच बाजारपेठेत आम्ही बरोबर शिधा घेतला तो रात्री जेवण तयार करण्यासाठी. एवढे करून आम्ही निघालो ते पुढच्या गडाकडे. पुढचा गड होता महिमानगड. हा गडही साधारण अडीचशे मीटर उंच. खाली गाड्या लावल्या, खाली देवीचे दर्शन घेतले आणि वरती चढायला निघालो. आता एवढा वेळ पावसाने तर दडीच मारली होती. पण तरी महिमानगड चढता चढता थोडी भुरभुर आलीच आणि आमचा पावसाळी भ्रमंतीचा बेत सार्थकी लागला. महिमानगड चढून झाल्यावर दिसते ती एक तुटलेली कमान. ही कमान बघता बघता आम्ही तेथेच गप्पा मारत बसलो की या कमानीलाही केवढे मोठे दगड लावले होते. भले गड छोटाच पण या कमानीचे दगडही वरती आणून कोरून ते व्यवस्थित लावणे आणि ते पण कोणतेही यंत्राचा वापर न करता!!! काय अनोखी माणसे होती. असो तर पुढे आम्ही गड बघायला निघालो. पुढे एक हनुमानाचे मंदिर आहे आणि एक दुसरे प्रार्थना स्थळ आहे. तुम्हाला अंदाज आलाच असेल की हनुमानाच्या मंदिराचे छत उडाले होते आणि असो...... गडावर थोडी तटबंदी शिल्लक आहे. गड बघून आणि येथेही वाऱ्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन आम्ही गड उतरलो. क्रमशः
केयूर कानडे
©kkdhanashree
.



Comments
Post a Comment