कल्याण दरवाज्याने सिंहगडावर
तुम्हाला जरा काही क्षण वेळ आहे का? मला थोडी मदत हवी होती. चव्हाण यांच्या सचिनला दूषण देऊ की धन्यवाद देऊ याबद्दल विचारायचे होते.
तर झाले असे की....
आठवडाभर काम, तेच जीवनाचे रडगाणे आणि मग आलेला सुट्टीचा शनिवार...... सकाळी उशिरा उठून, छान पैकी आळस देउन आणि घरातील छोटे मोठे काम करण्याचा आव आणून झाल्यावर अतिशय उत्तम असा घरच्या घरी गरम गरम न्याहारी करताना वर्तमानपत्र वाचणे..... अहाहा.... काय ते सुख....
पण अहो या चव्हाणांच्या सचिनला हे सुख बघवले नाही. काय तर सिंहगड वर कल्याण दरवाजाने जायचे. आम्ही पण थोडे लगेच उसने अवसान आणून हो म्हणून बसलो. झाले.... त्या सचिनचा पहाटे झोपेतून उठवण्यासाठी फोन आला हो. आता करता काय, आवरले नी गेलो त्याच्या बरोबर. सकाळची वेळ, रिमझिम रिमझिम पाऊस आणि चांडाळ चौकडीची संगत. मग चांगलाच फड जमला. गाडीने जातांना निसर्ग काचेतून दिसत होता. जसे गडाच्या पायथ्याशी गाडीतून उतरलो या निसर्गात रममाण झालो. सगळीकडून ढग खाली आले होते.
सिंहगडावर जातांना नेहमी बरेच जण दिसतात पण या मार्गावर फक्त आम्ही, झाडी, ढग आणि पाऊस.... बास... या अशा मनाला प्रसन्न करणाऱ्या वातावरणात गड चढणे म्हणजे काय हे शब्दात लिहिणे मला तरी शक्यच नाही. पुढे वर गेल्यावर गरमा गरम भजी नाही खाल्ली तर पाप लागते म्हणतात. म्हणून भजी पण खाऊन घेतली. परत येताना अजून एका मित्राचा या नाटकात प्रवेश झाला..... जोराचा वारा.... गड उतरताना वारा आणि पावसाने माणूस देणार नाही एवढी साथ दिली. या निसर्गातून परत या सिमेंटच्या जंगलात येण्याचा विचार ही नको वाटत होता. खरंच निसर्गात जाऊन निसर्गाशी एकरूप होण्यासारखे सुख नाही.
बरं एवढे करून 11 च्या आत परत.
आता तुम्हीच सांगा या चव्हाणांच्या सचिनला दूषण देऊ की धन्यवाद.
केयूर कानडे
© kkdhanashree


Comments
Post a Comment