आणि योग जुळून आला....😊
एखादी गोष्ट जर अनपेक्षितरित्या मिळाली तर😀...
दिवस पहिला -
योग जुळून आला की सगळं काही छान पार पडते तसेच काहीसे आमचे झाले. कानडे, जुवेकर आणि जोशी या तीन परिवारांचा सुट्टीला जायचा योग आला. सगळे एकत्रित करायचे ठरले आणि ठिकाण ठरले गणपतीपुळे, रत्नागिरी आणि परिसर. बरोबर काय काय घ्यायचे, रूम्सचे बुकिंग, कशानंतर काय पहायचे? पासून ते वगैरे वगैरे पर्यंत सगळे काही ठरले आणि जमून आले. तो अब बस्स निकल पडो! म्हणत आम्ही ६ मेचा मुहूर्त गाठला....
वेळ संध्याकाळी ४ वाजताची. ठिकाण गणपतीपुळे. MTDC ची उत्तम व्यवस्था अजुन काय हवे सुट्टीचा आनंद घ्यायला ......
भल्या पहाटे म्हणजे ५.३० ला घर सोडले ५.४५ ला पुणे सोडले. यावेळी जरा वेगळ्या वाटेने म्हणून कऱ्हाडमार्गे जाऊ ठरले. रस्ता तसा चांगला आहे पण निघायला जरा उशीर झाल्यामुळे जाम ट्रॅफिक लागले. निघताना कानडे आणि जोशी एकत्र निघाले जुवेकर नंतर येणार असे ठरले. पहिला थांबा विरंगुळा हॉटेलमध्ये घायचे ठरले. अर्थात सुट्टीमुळे तिथे खूप गर्दी होती. मुलांना सँडविच हवे होते पण डोसा खाऊन समाधान मानावे लागले. मिसळ तर प्रचंड तिखट होती....😲आमचा चहा तर आदल्या दिवशी केलेला आणि आम्हाला परत गरम करून दिलेला असा होता. पुढे कऱ्हाडमधून वळून कोकरुड फाट्याने आम्ही रत्नागिरीच्या रस्त्याला वळलो. गर्दी, ट्रॅफिक कमी झाले आणि आम्हाला हुश्श झाले. आंबा घाट लागला तसे आम्ही जरावेळ तिथे थांबून फोटो सेशन, थंडगार सरबताचा आनंद घेतला. तिथून पुढे रत्नागिरीत आलो.. जरा पेटपुजा करून पहिली धडक मारली ती थिबा पॅलेसला.... जरा उत्सुकता काय आहे हे थिबा प्रकरण... तर थिबा राजाला ब्रह्मदेशाहून इंग्रजांनी कैद करून इकडे आणले. इथे इंग्रजांनी राजासाठी बांधलेला राजवाडा आहे. आता तो संग्रहालय म्हणून सर्वांना बघायला खुला केला आहे. त्यानंतर रत्नागिरी म्हंटले की आधी बाळ गंगाधर टिळक डोळ्यांसमोर येतात. त्यामुळे त्यांचे स्मारक पाहणे आलेच. टिळक स्मारक बघितले.... आणि गणपतीपुळे कडे प्रस्थान केले....
"भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली....."
खरंच गणपतीपुळेकडे जातानाचा रस्ता बऱ्याच वेळा समुद्रदर्शन देत असतो. सुरूचे बन, त्यातून डोकावणारा समुद्र आणि सोबतीला असलेला सूर्य खूप छान वाटत होते. आम्ही गणपतीपुळेला आलो. MTDC चा मोठा परिसर जरा नजरेखालून घातला आणि आम्ही रूमकडे जायला वळलो. जरावेळ आराम करून आम्ही संध्याकाळी लगेचच समुद्रवर गेलो. मुलांनी पाण्यात खेळायची मज्जा घेतली आणि मला सूर्यास्त बघण्याची संधी मिळाली.
दिवस दुसरा
सकाळी ६ वाजता किनाऱ्यावर प्रभात फेरी मारली. गारवारा आणि समुद्राचे विहंगमदृश्य 🤩अहाहा! अवर्णनीय. त्यानंतर आम्ही गणपतीपूळेच्या श्रीगणेशाचे दर्शन घेतले. भरपूर गर्दीमुळे जरा वेळ लागला. मनाला भुरळ घालणारी मूर्ती. एकीकडे भक्तांची गर्दी, तर एकीकडे अभिषेक सुरू यासगळ्या गोंधळात पोलिस काकू "चला लवकर घ्या दर्शन" , म्हणून प्रत्येकाला एक क्षण मुर्तीपुढे उभे राहू देत होत्या. पण तरी दर्शन घेऊन आम्ही सभा मंडपातून परत एकदा दर्शन घेतले. आपले चित्त प्रसन्न करणारा हा नवसाचा बाप्पा 🙏🙇 काय वर्णावा याचा महिमा....
वेळ सकाळी ११ची. केशवसुतस्मारक आणि त्यातील कवितांचा संग्रह पाहून... एक तुतारी द्या मज आणून.... म्हणत म्हणतच आम्ही मालगुंडहून पुढे कोळीसरेला जायला निघालो.
"हम जो चलने लागे चलने लागे है ये रस्ते....मंजिल से बेहेतर लगने लगे हैं ये रस्ते...... "
रस्ता अगदी छोटा एकेरी वाहतूकीचा म्हणा ना... दोन गाड्या आम्ही ७ जण ( ४ मोठे ,३ लहान) एकापाठोपाठ आम्ही जात होतो. टिपिकल कोकण! मग काय डोंगर उतारावर वाड्या, घरे, आंब्याच्या बागा, फणसाची झाडे. नीरव शांतता पण त्यात जरा खोडा घालायला रात किड्यांचा आवाज... आणि साथीला मस्त हिंदी गाणी. कल्पना करा कसले भारी वाटत असेल..... ४ बाजूंनी असलेले डोंगर आणि मध्यभागी वसलेले कोळीसरेचे लक्ष्मी केशव मंदिर... अप्रतिम मूर्ती, एक अखंड वाहणारा झरा, शांत परिसर, मंदिरात सुरू असलेली आरती. तिथले गुरुजी अगदी उत्साहाने आम्हाला त्या मूर्तीमध्ये कोरलेल्या दशावतार, लक्ष्मी, जय-विजय हे दाखवत होते. त्यात ज्यांची पूजा होती ते ओळखीचेच निघाले. आरती करून शेजारी असलेले मारुती आणि रत्नेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही परत कोकणातील रस्ते, वाडी, आंब्यांच्या बागा बघत बघत परत मालगुंडला निघालो.
मालगुंडमध्ये स्वाद या हॉटेल किंवा खानावळ यात मोडणाऱ्या ठिकाणी जेवण केले. चवदार असे जेवण. अजूनही जेवणाचा स्वाद जीभेवर रेंगाळत आहे....
वेळ दुपारी- ४ ची...
आम्ही गणपतीपुळ्यात असलेले मॅजिक गार्डन पाहायला गेलो. काही वेगवेगळ्या गोष्टी तिथे पहिल्या. मुलांना तिथे खूपच मज्जा आली. फुफुफु हा नवीन शब्द शिकून आम्ही तिथून निघालो....खूप धम्माल करून प्राचीन कोकण बघायचे होते पण वेळ संपली म्हणून बघता आले नाही. आम्ही पुळ्याच्या समुद्रकिनारी येऊन सूर्यास्त पहिला. भरपूर गर्दी असणारा हा किनारा पण तसा बराच स्वच्छ असल्याचे जाणवले. लोकांची खूप गर्दी जिथे, प्रचंड कचरा असणार तिथे असे इथे दिसले नाही. हा दिवस सगळ्याच गोष्टींसाठी लक्षात राहणार हे नक्की😀
दिवस तिसरा
सकाळी समुद्र किनाऱ्यावर एक चक्कर मारली. अगदी सकाळी ६ वाजल्या पासूनच लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली दिसली. दर्शन घेऊन लोक समुद्राच्या पाण्यात खेळण्याचा आनंद घेताना दिसले. मुलांनीही वाळूत मनसोक्त खेळून घेतले. सकाळी लवकर निघायचं म्हणून आम्ही न्याहारी करायला कॅन्टीन मध्ये गेलो. तर चतुर्थी म्हणून साबुदाणा खिचडी मिळेल असे समजले.मग काय लगेच 3 डिश खिचडीची ऑर्डर दिली. ऑर्डर यायला खूप वेळ लागला आणि खिचडी आली. जरा चेहऱ्यावर आपसूक हसू आले. चला आता खिचडी खाऊ 😊पण एक घास घेतला आणि सगळेच चिडले. साबुदाणा फक्त भिजवून लगेचच केलेली खिचडी समोर आणून ठेवलेली 😡 ( अशीही खिचडी बनवता येते याचा इथे साक्षात्कार झाला🙆) एकदम वाईट अनुभव. शेवटी पोहे खाऊन आम्ही निघालो. गणपतीपुळेहून निघालो. पुढे रत्नागिरीमार्गे अर्थात गूगल मावशी दाखवेल त्या रस्त्याने( अगदी रत्नागिरीच्या छोट्या छोट्या गल्ली बोळातून) कशीबशी वाट काढून आम्ही पुढे पावसकडे निघालो. तिथे पोहोचलो आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या आश्रमात गेलो. आरतीची वेळ झाली होती. मग आरती केली आणि त्यानंतरचा खिचडीचा प्रसाद घेतला. मन खूप शांत झाले. तिथले पावित्र्य जाणवले.पावसजवळ असणारी दोन - तीन देवस्थानांचे रवळनाथ, जाखादेवी असे दर्शन घेतले. पुढे गणेशगुळेला गेलो. एका होमस्टेमध्ये आम्ही राहिलो. (अर्थात ऑनलाईन फोन नंबर मिळाल्याने आधीच बुकिंग केले होते) जेवण केले. जरावेळ किनाऱ्यावर फिरून आलो.
संध्याकाळी तिथून जवळच असणारा पूर्णगड बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. संध्याकाळची शांत वेळ आणि जलदुर्ग म्हणजे पूर्णगड हे समीकरण जमले. पूर्णगडच्या पायथ्याशी एक छान मंदिर आहे. जुने असे हे मंदिर शंकराचे आणि रामाचे आहे. शेजारून जाणाऱ्या पायवाटेने पूर्णगडावर आपण पोहोचतो. एक मारुतीचे मंदिर आणि लगेचच पूर्णगडाचे महाद्वार आपल्याला दिसते. गड स्वच्छ आहे तसेच बरेचसे नवीन बांधकाम करून जतन करण्याचा प्रयत्न नक्की कळून येतो. भक्कम तटबंदी आणि सुस्थितीत असणारे बुरुज दिसले. दरवाज्याच्या अगदी समरोच्या बाजूला एक दरवाजा आहे तिथून खाली उतरून समोर समुद्राचे विहंगमदृश्य दिसते. दरवाज्याच्या आतील बाजूस भिंतीवर छान फूले कोरून ठेवली दिसतात. एक तुळशी वृंदावन दिसले, अगदी त्यात लावलेली तुळस ही दिसली. दोन खोल्या दिसल्या. एकूणच किल्ले भेट छान झाली. संपूर्ण तटबंदीवरुन आम्ही चक्कर मारून खाली आलो. जरावेळ तिथेच बसून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. रात्री आइसक्रीम खायचे म्हणून पावसहून मागवले. पण जेव्हा ते आले तेव्हा आम्ही झोपलेलो होतो🤣 कारण रात्री १०.३० नंतर आइसक्रीम आणले तो पर्यंत झोप आवरेना मग काय झोपलो...
दिवस चौथा
रात्री भरपूर पाऊस झाला. तरी सकाळी वातावरण एकदम सुंदर होते. सूर्योदयाच्यावेळी आम्ही दोघे किनाऱ्यावर भटकायला गेलो होतो. अगदी 2-4 जण सोडले तर शांत किनारा आणि आम्ही. सकाळच्या शांततेत ऐकू येणारी समुद्राची गाज.....
समोरच एक ओंडका समुद्रातून वाहून आलेला पहिला. जरा वेळ मन तिथेच रेंगाळले.... जरावेळ तिथेच बसून समोर समद्राचे रूप डोळ्यात साठवून घ्यायचा प्रयत्न केला...
आहे मी अफाट, आहे मी ललाट
सर्व सामावून घेण्यास आहे मी तयार,
मन मोठे माझे, उदर ही मोठेच,
सर्वांना घेतो मी माझ्यात ,जग माझे मोठे,
दिसतो शांत जरी मी, आतून अशांत मी,
मनाला भुरळ घालून, देतो फक्त आनंद मी...
समुद्रात खेळण्याचा मनमुराद आनंद घेते आम्ही निघालो. तिथून निघून आम्ही गणेशगुळेच्या गणरायाचे दर्शन घेतले. शांत आणि प्रसन्न मूर्ती, गणपती स्तोत्राचे पठण करून आजूबाजूचा निसर्ग पाहून आम्ही निघतच होतो की समोर एक जुनी विहीर दिसली. ती पाहून आम्ही पुण्याला यायला निघालो. वाटेत मलकापूरच्या आधी एका शेतात थांबून थोडी पेटपूजा केली. कऱ्हाड ते सातारा खूप पाऊस लागला. पण त्यामुळे उन्हाचा त्रास काही झाला नाही. संध्याकाळी ६.३० पर्यंत वाई फाट्याला आत वळून Mapro गाठले. मस्त क्लासिक सँडविचचा आनंद घेतला आणि पुण्यात सुखरूप येऊन पोहोचलो.
४ दिवसांची सहल सुफळ संपूर्ण झाली👐
या सहलीत एक अनुभव - आमची एक पिशवी ज्यात आम्ही आमच्या टोप्या आणि ३ पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या ती पिशवी चक्क आमच्या बाल्कनीतून चोरीला गेली 🤦. आपले सामान सहलीत नीट सांभाळून ठेवा🤣
©kkdhanashree






Comments
Post a Comment