शिवजयंती जलदुर्गावर साजरी!

 


यावर्षी शिवजयंतीला एका जलदुर्गावर जाण्याचा योग आला किंवा असे म्हणता येईल शिवजयंतीच्या दिवशी जलदुर्ग भेट. 

शिवजयंतीला गिरिदुर्ग बघणे बऱ्याच जणांचे हमखास होते पण जलदुर्ग बघणे क्वचित होते. ७ जलदुर्ग महाराष्ट्रात आहेत त्यापैकी शिवाजी महाराजांनी ५ जलदुर्ग बांधलेले आहेत. त्यापैकी एक पद्मदुर्ग. जंजिरा जेव्हा पाहिला होता तेव्हा पद्मदुर्ग शेजारीच आहे हे माहीत नव्हते. (अर्थात त्याबाबत ज्ञान जरा कमीच आहे😉)

यावेळी राजेश दादांचा मेसेज आला यावेळेस पद्मदुर्ग च्या ट्रेकचे आयोजन केले आहे. लगेचच जाणे नक्की केले. गिरीदुर्ग फिरणे होते त्यामुळे काठिण्य पातळीची जरा कल्पना होती.पण पद्मदुर्ग बाबत फारसे माहीत नव्हते. जंजिऱ्याला बोटीने जायचे माहीत होते त्यामुळे पद्मदुर्ग ला बोटीने जायचे एवढेच (अपूर्ण) ज्ञान होते. पण किती वेळ लागतो, कोणत्या वेळी जायचे (भरती - ओहोटी) वगैरे प्रश्न होतेच. पण उत्तम नियोजन करून राजेश दादांसोबत आम्ही १६ मावळे जलदुर्ग सफारीला शनिवारी रात्रीच निघालो. मग काय रोह्याला मुक्काम करून प्रभातवेळी आगे कूच केली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात स्वादिष्ट न्याहरीचा आस्वाद घेऊन आम्ही किनाऱ्यावर आलो. मुरुड गावातून आम्ही बोटीने जाणार होतो. तिथून साधारण १५-२० मिनिटात आम्ही गडावर पोहोचलो. गड तसा लहानसा आहे. चहूबाजूंनी समुद्राने वेढलेला. एका मोठ्या बेसोल्ट कातळात बांधलेला असा जलदुर्ग म्हणजे पद्मदुर्ग. एकीकडे सिद्धी जोहर बरोबर लढाई करत करत बांधलेला हा गड. या गडाला २ दरवाजे आहेत. तिथे गेल्यावर आधी शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा केला.



त्यानंतर सर्वांनी सचिन दादांनी सांगितलेली गडाची माहिती ऐकली आणि दादांसोबत गड फिरून बघितला. यावेळी दादांना कोणी कोणी काही प्रश्न विचारले. दादांनी त्याची उत्तरे अतिशय अभ्यासपूर्ण दिली. त्यापैकी एक - तोफा उडवताना वापरण्यात येणारे दोन गोळे एक दगडी तर एक मेटल याबाबत आणि ते कसे तोफेतून उडवले जात, तोफा कोणकोणत्या प्रकारच्या होत्या हे सांगितले. खरे तर ते सांगतानाच ते दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले होते. या दुर्गावर एकूण ९० तोफा आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर संपूर्ण गड पाहून आम्ही किनाऱ्याकडे परत निघालो.


परत येऊन आम्ही पुढचा गिरिदुर्ग जो तीन बाजूंनी पाण्यात तर एक बाजू जमिनीवर असलेला असा कोर्लईगड पाहण्यासाठी निघालो. कोर्लई गावातून जाणारी वाट आणि त्यातून पुढे पुढे जाणारे आम्ही. भर दुपारी आम्ही गड चढायला सुरुवात केली. गड तसा फार उंच नाही. पुण्यातील पर्वती एवढा असलेला हा गड पण गडावरील चर्च, एक गोड पाण्याचे टाके, काही शिलालेख सुस्थितीत आहेत. हा गड बोटीच्या आकाराचा आहे. इथे असलेले शिलालेख फारशी भाषेत आहेत. आपल्या मराठी भाषेत बरेच शब्द फारशी भाषेतील आहेत. आपण ते सर्रास उच्चरतो. जे सहज आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. सचिन दादांनी जेव्हा हे सांगितले तेव्हा खूप नवल वाटले. 


त्यानंतर चौलला जाऊन आम्ही मिष्टान्नासह जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण घरगुती आणि अप्रतिम चवीचे होते. त्यानंतर आम्ही मल्लेश्र्वर आणि रामेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथून मोलोजी आंग्रे यांची समाधी बघितली. अशा रीतीने आमची शिवजयंती आम्ही गड आणि दुर्ग भेटीने साजरी केली. अचानक आलेला भेटीचा योग खरचं सुखावह होता. सहसा पुण्यातील लाल महालासमोरील शिवजयंतीची मिरवणूक बघताना फक्त बघणे व्ह्यायचे पण आज दोन गडांना भेट देऊन ती साजरी झाली यातील आनंद वेगळा आहे. 

उत्तम नियोजन, भरपूर माहिती आणि साथीला असणारे मावळे. या ट्रेक मध्ये खूप मज्जा आली. माझ्या ज्ञानात भर पडली. हा ट्रेक नक्की लक्षात राहील

©kkdhanashree

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद