खाण्यासाठी जन्म आपुला.....


 

जगायचे म्हंटले की खाणे आलेच... खाणे हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे😋. प्रत्येकाला कोणता ना कोणता पदार्थ आवडतच असतो. मग तो पुरणपोळी पासून पाणीपुरी पर्यंत तर तूपसाखर पोळी पासून ते पास्त्यापर्यंत आणि थालपीठापासून ते पिझ्झापर्यंत. 

माझा हा जेवण बनवण्याचा प्रवास माझ्या दृष्टीने भन्नाट आहे...😉. पाहिले पासून मी जेवण बनवण्यासाठी फारशी काही उत्सुक नव्हते. पण तरीही मी केलेला प्रामाणिक प्रयत्न आणि त्यातून झालेली माझी फजिती, गंमत हे मी पुढे सांगते आहे...


श्री गणेश अमृततुल्य पासून☕

मी ६ वीत असताना माझ्या बाबांनी मला चहा बनवायला शिकवला आणि मी रोज चहा बनवायला सुरुवात केली. पण काही दिवसातच बाबांनी चहा ,कॉफी घेणे बंद केले (अर्थात त्याला कारण वेगळे होते) 🙈 तर अशी माझी स्वयंपाक घराशी ओळख झाली. 


एक भन्नाट रेसिपी ( जी कोणाला जमेल का?🤣)

पुढे ८ वी मध्ये असताना आई घरात नाही म्हणजे मोकळे रान मग काय नवीन काही तरी बनवू म्हणून बटाटा पोहे भजी 🤭( बटाटा च्या दोन स्लाइस मध्ये पोहे भरून मला त्याची भजी तळायची होती.) आता आठवले की हसू येते😂. तर हा माझा प्रयोग अर्थातच फसला. मग मी पुढचे काही वर्ष स्वयंपाक घरापासून लांब राहणे पसंत केले.😩 


फोनवरची कढी 😆

माझ्या माहेरी समोर एक मारवाडी कुटुंब राहते. त्यात काही छोटी मुले आहेत त्यापैकी एक शुभ तो १ वर्षाचा झाला आणि त्याची आई त्याला भात खाऊ घालायची. मग त्याचे जेवण बरेचदा आमच्या अंगणातील ओट्यावर बसून व्ह्यायाचे. एकदा आईने कढी केली होती त्याला भातात घालून तो भात खाऊ घातला तो त्याला खूप आवडला. दुसऱ्या दिवशी स्वारी परत आमच्या कडे आज पण कढी हवी होती. पण गंमत अशी त्यावेळी आई घरी नव्हती. आली का पंचाईत! मग काय आईला फोन केला. मग आईने मला फोनवर कढी कशी करायची हे सांगायला सुरुवात केली ती सांगेल तसे मी करत गेले आणि कढी तयार झाली🤷 अशी मी फोन वर सांगितल्या प्रमाणे कढी बनवायला शिकले. 

त्यानंतर मला भाकरी, करंज्या करायला माझे आजीने शिकवले. ती खरच अन्नपूर्णा आहे.🙏 तिने काहीही बनवले तरी ते चविष्टच असते. मला तिच्या हातचे कढी गोळे, गव्हाचा चिक आणि ज्वारीचे धापोडे आवडतात😋 


चांगलेच बिघडलेले मंचूरियन 😏

मी एकदा मंचूरियन बनवायचा प्रयत्न केला. जो मला थोडा नीट जमला. माझ्या बाबांना ते खूप आवडले. मग काय अधून मधून मी हे करणे सुरू केले. लग्न झाल्यावर अहो पहिल्यांदा माझ्या माहेरी आले होते. बाबा म्हणाले मंचूरियन कर. मी मारे उत्साहात करायला गेले. पण गोळे काही होईना मग काय घाल मैदा आणि कर असे करून ते काही नीट जमेना. शेवटी ते बिघडलेच बाबांनी खाल्ले पण अहोंनी चेहरा असा केला की मी परत मंचूरियन करण्याचा प्रयोग केलाच नाही🤦. 


रिफाइंड तेलातील बेसनाचे लाडू😢

लग्ना नंतरची पाहिली दिवाळी. माझ्यात उत्साह संचारला. मग काय आईने मला बेसनाचे लाडू करायला शिकवले होते. त्यामुळे मी घरी सांगितले मी लाडू करणार. लक्ष्मी पूजनाच्या २ दिवस आधी मला सांगण्यात आले आज लाडू कर. ok म्हणून मी करायला घेतले. समान काढताना मला सांगण्यात आले लाडू तुपात नाही रिफाईंड तेलात करायचे झाले बाई आली का पंचाईत मला समजेना लाडू तेलात कसे करायचे. पण घबराट घाबरत घेतले भाजायला. बेसन भाजून झाले पण ते काही अळेना. मला तर रडू यायला लागले. वरून कोरडे पीठ भाजून घातले तरी लाडू काही होईनात🤣 अहोंनी शाल जोडा मारालाच एक पदार्थ केला तो ही बिघडलाच. ( पुण्यात पेठेत जन्म आणि राहणे मग काय शालजोडे येतच सतत अधेमधे) पण नंतर जबाबदारी अंगावर पडल्यावर बेसनाचे लाडू साजूप तुपात केले. मग ते कधीच बिघडले नाहीत🙃

 

मालपुवा🤦

गरोदर असताना मला मालपुवा खायची खूप इच्छा झाली. अहो आणि माझ्या भावाने सगळे पुणे पालथे घातले पण मालपुवा कुठे मिळेना... 

आता काय करायचे सगळे विचारात पडले. बाबांनी त्यांच्या मित्राला सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी माझी मालपुवा खायची इच्छा काकूने पूर्ण केले. अर्थात मी तो कधी बनवायचा प्रयत्न पण केलेला नाही.


फसलेले केक

कोरोनामुळे सगळे काही घरात करायचे या तत्वामुळे मी लॉकडाऊन मध्ये कस्टड केक करण्याचा घाट घातला. काय झाले मलाच समजले नाही पण केक काही नीट जमला नाही. पण तो खाल्ल्यापासून पोटदुखी मात्र माझ्या मागे लागली😩 त्यानंतर लेकाच्या वाढदिवसाला रवा केक करण्याचा प्रयत्न केला पण तो पण फसला. शेवटी कंटाळून मी प्रोफेशनल केक करायला शिकले. आता मात्र मी जरा बरे ( खाण्या योग्य) केक करते.🙂

इतक्या वर्षात बरे काही चुकले, कधी वैतागले पण आता मात्र नीट सगळं करायला शिकले 

पोळ्याचे पण तसेच चुकत, रडत ,चिडत शिकले😎

आता मागे वळून बघताना हसू येते, गंमत वाटते पण खरच सांगते हे सगळे करून समाधान वाटते. एखादी भाजी किंवा पदार्थ मस्त जमला की अहो म्हणतात बायको मस्त बेत जमेल आज, तर लेक म्हणतो आई एकदम भारी झाले आहे. बस अजुन काय हवे😀

 एक गोष्ट मात्र मनापासून सांगते मला अजूनही पुरणपोळी आणि भोपळ घारगे जमत नाहीत😆🙈 

बास आता मी इथेच थांबते अर्थात माझे हे प्रयोग इथून पुढेही असेच चालू राहतील हे नक्की🤗



©kkdhanshree

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद