ठरवलेला घनगड आणि अचानक झालेला तैलबैला

  रविवार, त्यात नोव्हेंबर महिना त्यामुळे अर्थातच गडकिल्ले भटकंती ही आलीच. नेहमी प्रमाणेच अचानक ठरवलेला प्लॅन. मग काय चलो घुमने...

आम्ही दोघे, आमचा लेक आणि भाचा असे नेहमीचेच मावळे. घनगड लोणावळ्यापासून साधारण 36 किलोमीटरवर आहे. रस्ता कसा आहे? हे माहीत नसल्यामुळे आम्ही लवकर निघालो. लोणावळ्याच्या पुढे कोरीगडकडे जाताना सूर्योदय झाला होता. पण सकाळी सकाळी हा भास्कर जरा लपंडाव खेळण्याच्या मूड मध्ये आहे असे आम्हाला जाणवले. जरा वेळ याचा लपंडाव आम्ही एन्जॉय केला आणि मग कोरीगडहून पुढे आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी निघालो. एक एक ठिकाण मागे सारून आम्ही घनगडाच्या फाट्याला वळलो आणि आमची गडबड झाली. रस्ता जाम बेकार.😱 आम्हाला आमची काळजी तर नवऱ्याला गाडीची काळजी.🤷 कोणाचे काय तर कोणाचे काय... 


सावकाश! एकदम सावकाश! गूगल मावशीने रस्ता दाखवल्याप्रमाणे आम्ही पायथ्याशी एकोले गावी पोहोचलो.  

आम्ही लगेचच गड चढायला सुरूवात केली 🏃 थोडे अंतर पार केले आणि एक घनेश्वर चे मंदिर लागले. अर्थात आम्ही सगळे लगेच घरून आणलेल्या पोह्यांची न्याहारी करायच्या तयारीनेच तिथे थांबलो आणि आधी तुटून पडलो. थंडीमुळे भूक जास्तच लागते ना.😂 पेटपुजा करून आम्ही पुढे निघालो. पावणे दोन वर्षाचा मुलगा त्याचे आई बाबा आणि मामासोबत गड पाहायला आला होता (अर्थात कधी वडिलांच्या पाठीवर तर कधी मामाच्या अशा पद्धतीने तो गड पाहत होता) बाप्पा जय करून झाले आणि त्याचे सारखे मम् दाखव, मला मम् दाखव सुरू होते. हे मम् काय आहे? असा आम्हाला प्रश्न पडला. विचारल्यावर समजेल पाणी बघायचे आहे.🙆 पुढे ते आणि आम्ही सोबतच गड चढलो.


गडावर जाण्याआधी एका बाजूला पायवाट जाते तिकडे छान दरी दिसते ती पाहून आम्ही दरवाज्यापाशी थांबलो जरा फोटो सेशन करून वर आलो. दरवाज्या समोरच एक गुहा दिसली ती छोटी आहे पण स्वच्छ दिसली. उजवीकडे वळलो. एका बाजूला एक कडा पडून त्याची एक छोटी गुहा इकडून तिकडे जायला तयार झालेली दिसली. अर्थात काही माकडेही दृष्टीस पडली. काल रात्री तिकडे मुक्कामी आलेले गावतील 4 जण दिसले. त्यांच्यासोबत जरा बोलून आम्ही दरवाज्याच्या दुसऱ्या बाजूला निघालो. तिथे एक बुरुज होता. आम्ही तिथे गेलो नाही कारण खालून येताना तिथे एक पाटी दिसली होती बुरुजावर कोणी जाऊ नये. कदाचित आता बुरुज तितका पक्का राहिला नसेल म्हणून असेल असे लक्षात आल्याने आम्ही तिथे न जाता पुढे आलो.


एका कड्याच्या बाजूला एक सरळ उंच शिडी आम्हाला दिसली. बाजूलाच कडेलोट होण्याची स्थितीत आणि अशी ही चढून आपल्याला वर जायचे आहे असे अहोंनी सांगितले. जरा पोटात गोळा आल्याचे जाणवले. पण आधी अहो मग बहादुर लेक, भाचा पुढे गेले मग जरा हिम्मत एकवटली आणि मी शिडी चढायला सुरुवात केले. शेवटी मात्र जाम भीती वाटली शिडी वरून पलीकडे जायला. पण हिम्मत करून गेले. तिथे प्लास्टिक रोप लावला आहे. खरे तर शिडी पर करून गेल्यावर तिथे एक पाऊल ठेवण्या पुरतीच जागा आहे. त्यामुळे तिथे असलेला दोर पकडून पुढे जाणे जास्त योग्य आहे. हा या गडावरचा सर्वात जास्त अवघड पॅच आहे.

 


वर २-३ पाण्याच्या टाक्या दिसल्या. पाणी बरेच नितळ वाटले. तिथून पुढे वर बालेकिल्ल्यात मी न जाणे पसंत केले. काही कारणाने मी गेले नाही पण अहो, मुलगा आणि भाचा वर गेले. मी खालीच थांबले. वर मोठे पठार आहे, एक झेंडा आणि काही बुरुज. वरून एका बाजूची दरी आणि जवळचे काही किल्ले छान दिसतात इति अहो. परत आम्ही ती शिडी उतरून एक दिव्य पार करून खाली उतरायला लागलो. आम्ही परत एकोले गावात येऊन पोहोचलो होते. अपेक्षेपेक्षा आम्ही खूपच लवकर खाली उतरलो होतो.


 मग काय नवरोबा लगेच म्हणाले आता चला तैलबैला ला जाऊयात. अरे पण तो केवढा आहे चढायला यावर उत्तर अग आपली पर्वती, बास एवढाच आहे. मग काय मुले तर तयारच होती. आम्ही घनगडचा अवघड रस्ता पार करून डावीकडे वळून तैलबैला कडे वळलो. मागच्या आठवड्यात नवरा दोन दिवस इकडेच ट्रेक करून आलेला त्यामुळे त्याला इथली जास्त माहिती. तैल बैला गावात सुरुवातीला पहिल्याच घरात आम्ही जेवणाचे सांगून पुढे. किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. गाडी पार्क करून आम्ही चढाईला सुरूवात केली. आम्ही साधारण अर्ध्या तासातच  वर आलो होतो. या अखंड चढाईत आम्हाला रातकिड्यांच्या आवाजाची साथ अखंड लाभली.


वरून विस्तीर्ण पठार दिसले. नोव्हेंबर महिना असल्याने गवत वळले होते. पण तरीही ते दृश्य विहंगम आहे असे नक्कीच वाटले. वर चढून आल्यावर तैलबैलाचे सुळके म्हणजे काय याचा अंदाज आला. प्रचंड मोठे असे हे दोन कडे आहेत. त्यांच्या कडे कडेने जायला यायला वाट आहे. दोन कड्यांमध्ये एक मंदिर आणि त्याला लागूनच एक पाण्याचे टाके आहे. येथील पाणी आम्ही आमच्या जवळच्या बाटलीत भरून घेतले. सुमधुर पाणी आहे हे आणि तितकेच थंडगार.  आम्ही येथे आलो तेव्हा पुण्यातील एका ग्रुपच्या वतीने रॉक क्लाइंबिंग सुरू होते. जरा वेळ ते बघून आम्ही परत यायला निघालो. काही वेळात आम्ही खाली आलो. जिथे आम्ही जेवायला सांगून आलो होतो तिथे आलो. चुलीवरच्या भाकरी, चवळीची उसळ, ठेचा, फ्लॉवर बटाटा रस्सा, आमटी, भात अशा एकदम रुचकर जेवणावर ताव मारायला. मनसोक्त जेवण करून आम्ही पुण्याची वाट धरली आणि 4 वाजेपर्यंत घरी सुखरूप येऊन पोहोचलो. अशी घनगड ची कहाणी सुफळ संपूर्ण.🙏 


©kkdhanashree

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद