हंपी एक अद्भुत अनुभव ...भाग २

 आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी माल्यवंत रघुनाथ गुढी येथे गेलो. थोड्या उंचावर असणाऱ्या या राम मंदिरापर्यंत गाडी जाते. मंदिरामागे एक गुहा व बाजूला भरपूर मोठे मोठे दगड आहेत. आम्ही तिथेच एका दगडावर बसलो. गर्दी होती, पण सगळे निवांतपणे सूर्यास्त बघत होते. खरंतर मला सूर्योदय बघायला आवडते. कारण नवीन दिवसाची सुरुवात म्हणून. पण इथे आम्ही आलो सूर्यास्त पहायला. सूर्यास्ताबरोबर दिवसाचा एक ओझरता आढावा माझ्या मनात सुरू होता. आजच्या दिवसाने आपल्याला काय काय दिले? असा विचार माझ्या मनात तेव्हा सुरू होता....... महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आपण आनंदाने अभिमानाने पहात असतो. पण बाकी राज्यांमध्येही काही ना काही खास आहे हे मला इथे आल्यावर जाणवले. आपला इतिहास आपण शाळेत असताना शिकलो, किंवा शिकतो. पण त्या त्या जागी जाऊन तो आपण प्रत्यक्ष अनुभवला तर ते खरे शिकणे असे मला वाटते. हंपी या गावातील विविध पौराणिक व ऐतिहासिक गोष्टींशी माझी आज ओळख झाली. उत्खनन झाले म्हणजे फक्त गोष्टी शोधल्या असे नाही तर त्यापूर्वी जशा होत्या त्याप्रमाणे त्या त्या जागी पुनर्प्रस्थापित करणे म्हणजे उत्खनन म्हणता येईल. हे काम तसे अवघड आहे पण हंपीमध्ये आर्किऑलॉजी डिपार्टमेंटने हे काम उत्तम प्रकारे पार पाडले आहे. अजूनही काही ठिकाणी हंपीमध्ये उत्खननाचे काम सुरू आहे. हंपी एक अदभुत अनुभव आहे असे मला वाटते. मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतले. सीतेच्या अपहरणानंतर रामाने हनुमानाला तिचा शोध घेण्यासाठी पाठवले. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी हनुमानाची इथेच प्रतीक्षा केली होती. गाईडने सांगितल्याप्रमाणे २००८ सालापासून इथे  यामंदिरात अखंड तुलसीदास रामायणाचे २४ तास पारायण सुरू असते, विशेष वाटले. थोड्या वेळ ते ऐकून आम्ही परत जुन्या हंपीतील आमच्या राहण्याच्या ठिकाणाकडे परत निघालो.


दिवसाभराच्या आठवणीत रममाण होऊन आम्ही रूमवर येऊन फ्रेश झालो आणि जेवणासाठी मँगो ट्री मध्ये गेलो. आज मी या मँगो ट्री चे आतून निरीक्षण करत होते. जेवायची बैठक व्यवस्था परदेशी व भारतीय या दोन्ही प्रकारे केलेली होती. आम्ही दोन्ही दिवस भारतीय पद्धतीने जेवलो. छोटे छोटे दिवे प्रत्येक टेबलवर, वरून खालपर्यंत सोडलेले. मंद प्रकाशात सगळे शांतपणे जेवत होते. देशी व परदेशी दोन्ही पाहुण्यांना आकर्षित करणारी रचना त्यांनी केलेली दिसली. प्रत्येकाने आपआपले चप्पल बूट बाहेर काढूनच आत प्रवेश करण्याची असणारी सक्ती मला इथे आवडली. गरम गरम जेवणाचा आस्वाद घेत घेत आम्ही गप्पा मारत जेवलो.


दिवसाभराच्या दमणुकीने सगळेच साडेआठ पर्यंत झोपलो होतो. रात्री साडेअकरा वाजता एकदम आरडाओरडा ऐकू आला कोणाचे तरी बोलणे कानावर पडले मँगो ट्री ला आग लागली आहे. आम्ही दोघेही पटकन बाहेर आलो. माझे अहो बाहेर गेले २०० मीटरवर असणारे मँगो ट्री जळताना त्यांनी समोर पाहिले.  मी जरा भितभित एका बाजूने पाहिले. रात्रीच्या वातावरणात अग्नीचा तांडव आम्ही अनुभवात होतो🔥 विरूपाक्ष मंदिराच्या गोपूरा एवढ्या उंच अग्नीच्या ज्वाळा आम्ही पाहिल्या. पहिल्या सिलेंडरचा स्फोट झाला, मग त्या आगीच्या तांडवाने रौद्ररूप धारण केल्याचे लक्षात आले. थोड्यावेळाने दुसऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. सगळ्यांची पळापळ सुरू होती. आमच्या आजूबाजूचेही घाबरून उभे होते. हॉटेलच्या बाजूचे लोकं आमच्या बाजूला पळत येत होते. रडणे, ओरडणे, पळापळी यामुळे वातावरण भयावह झाले होते. दुसऱ्या सिलेंडरच्या स्फोटाने मुलांना जाग आली ते उठून रूमच्या बाहेर आले. मी त्यांना सांभाळून परत खोलीत आणले. पण एवढ्यात तिसऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. मग मात्र सगळ्यांचीच तंतरली. कोणी तरी काही तरी सांगत होते ,कोणी अजुन काही. आम्ही बॅग भरायची ठरवत होतो, इतक्यात कोणीतरी सांगितले फायर ब्रिगेडची गाडी होसपेटवरून आली आहे. आमचे दिवे गेलेले. मनात भीती दाटलेली हे सर्व सांगणेही कठीण आहे. त्यावेळीचे वर्णन करणे खरंतर अवघड आहे. थोड्यावेळात फायर ब्रिगेडने आग विझवली होती तरीपण सगळे आपला जीव मुठीत घेऊन बसले होते. फक्त समाधान या गोष्टीचे की जीवित हानी झाली नाही. फक्त हॉटेल जळाले. ८ सिलेंडर होते. त्यापैकी ५ बाहेर काढण्यात यश आले होते. त्यामुळे खूप मोठा अनर्थ टाळला होता. यात एक गोष्ट नक्की , वेळ कशीही आली तरी घाबरून न जाता त्याला तोंड द्यावे हे आम्ही अनुभवले. काहीजण घाबरून आत्ताच निघू असे म्हणाले, पण आम्ही डोकं शांत ठेवून परिस्थिती हाताळू असा विचार केला. पण एक खंत आहे, काही उत्साही लोकांनी फोटो काढून इंस्टाग्राम वर स्टोरी टाकली होती हे बघून खूप वाईट वाटले. रात्री दीडपर्यंत सगळं शांत झालं होतं. पर्सजवळ घेऊन (गरज पडल्यास लगेचच निघायची तयारी)  आम्ही झोपण्याचा प्रयत्न केला. खरंतर रात्रभर कोणीच स्थिर झोपू शकले नाही. पण म्हणतात ना शो मस्ट गो ऑन याप्रमाणे, अशी ही भयावह रात्र कधीही न विसरता येणारी तिथेच सोडून... दुसऱ्या दिवशीच्या दिनाकराच्या स्वागताला आम्ही सज्ज झालो होतो.....

हंपीतील दिवस दुसरा  

कालची रात्र मागे सारून आम्ही नवीन दिवसाचे स्वागत केले. पटपट सगळं आवरून रूम सोडली. बाहेर येऊन आम्ही समोर असणाऱ्या मँगो ट्री कडे एक नजर टाकली. काही परदेशी पाहुणे त्याचे फोटो काढण्यात गुंग होते. जमीनदोस्त झालेले ते हॉटेल पाहून मन हेलावले. पण थांबून कसे चालेल?  जुने हंपी परत आपले दिवसाचे कामकाज करण्यासाठी नव्याने तयार होऊन कार्यरत झालेले आम्ही त्या दिवशी सकाळी पाहिले. शांतपणे न्याहरी करून आम्ही पुढे अंजनेद्रीकडे मार्गस्थ झालो. अंजनेद्री हे ठिकाण म्हणजे कर्नाटकात येथे हनुमानाचा जन्म झाला म्हणून प्रसिद्ध आहे. ५७५ पायऱ्या असणारे हे उंचावर असलेले ठिकाण आहे. सभोवताली असणारा निसर्ग संपन्न परिसर, प्रत्येकालाच खुणावतो. हनुमानाची मोठी मूर्ती येथे असून एक पाण्यावर तरंगणारा दगड येथे ठेवलेला आम्हाला दिसला. तो पाहून आम्ही मारुती स्तोत्राचे पठण करून मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फिरलो. आजूबाजूला भरपूर माकडे दंगामस्ती करण्यात गुंग झाली होती. पण त्यांच्या दंगामस्ती माझ्या तोंडाचे पाणी ( भीतीमुळे) पळाले होते🤣 त्यानंतर आम्ही सनापुर किंवा सानापुर येथे कोऱ्याकल राईडसाठी गेलो. एक मोठी टोपली त्यात बसून आपण ही राईड पूर्ण करू शकतो. अर्थात नावाडी बरोबर असतोच. आम्ही तिथे पोहोचलो. किती मिनिटे तुम्हाला ही राईड करायची त्यावर पैसे ठरविले जातात. आम्ही दोन फॅमिली मिळून वीस मिनिटांची राईड केली. आमच्याबरोबर नवी मुंबईचे कुटुंब होते. आई, वडील आणि मुलगा असे आम्ही सात जणे मिळून कोऱ्याकल मध्ये बसलो. आमचा नावाडी शांतपणे आम्हाला माहिती देत होता. एकदम म्हणाला, फोन द्या फोटो काढतो. मग म्हणाला रील बनवतो. इन्स्टावर टाकायला 😱 हे ऐकून आम्ही उडालोच इन्स्टाग्राम वर त्याचे अकाउंट आहे आणि तो त्याने बनवलेले सगळे रिल्स त्यावर अपलोड करतो असतो. वा! जग खूपच पुढारलेले आहे. 😇 त्याने आम्हाला वेगवेगळ्या ॲक्शन सांगितल्या आणि एक जुने गाणे लावून "ओहो रे ताल मिले नदी के जल से....." त्या गाण्यावर आमच्या ॲक्शन करून घेत रील शूट केले. हे सगळं करून वीस मिनिटे कशी संपली हेच कळलं नाही. आम्ही छान एक चक्कर मारून परत किनाऱ्यावर आलो. हा अनुभव काहीतरी वेगळाच आहे. अर्थातच त्याला गूगल पे ने पैसे देऊन या राईडचा मनमुराद आनंद लुटून आम्ही किनाऱ्यावर येऊन थोडा वेळ फोटोसेशन करून आम्ही पुढे पंपा सरोवर पाहायला गेलो.


डोंगरातून वाहत येणारा झरा आणि त्यातून बनलेले हे सरोवर पूर्वीचा साज उतरवून त्याला आत्ता नवीन स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. हे पंपासरोवर पाहून समोरच असलेली वाली पर्वतातील शबरीची गुहा पाहायला आम्ही गेलो. रामासाठी रोज फळे आणून, त्याच्या स्वागतासाठी सज्ज राहणारी शबरी डोळ्यासमोर झरझर आली. रामभेटीसाठी कित्येक वर्ष आतुर असणारी, मुखात सतत रामनामाचा जप आणि प्रसन्नमूर्ती अशी ही शबरी. हीची गुहा छोटीच आहे पण तिथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटले. जरा वेळ तिथे थांबून आम्ही पुढे अनेगुंडीला गेलो. तिथे आम्हाला अनेगुंडीचा महाल बाहेरूनच पाहायला मिळाला. त्याचे बांधकाम सुरू असल्याने आत जाता आले नाही. तिथून आम्ही रामगुहा पहायला गेलो. जिथून रामाने वालीला बाण मारला ती जागा आणि त्याच्या शेजारीच असणारी गुहा जिथे राम-लक्ष्मण, सुग्रीव व बाकी सगळ्यांनी वालीला कसे मारायचे यावर चर्चा करून ठरविले अशी ही जागा पाहिली. तिथूनच आम्हाला तुंगभद्रा नदीत दिसणारी राजा कृष्णदेवराय यांची समाधी गाईडनी दाखवली. एवढा मोठा राजा बऱ्याच वेळा आक्रमण करणारा, आलेली आक्रमणे ताकतीने परतवून लावणारा हा राजा पण त्याचा अंत अत्यंत दुर्दैवी झाला आहे. त्या जागेवरूनच राजाच्या समाधीला शतशत नमन करून शेजारी असणाऱ्या दक्षिणकाशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो. तिथून पुढे कमलापूर मध्ये जेवण (डोसा, उत्तपा खाऊन) करून पुढे आम्ही लक्ष्मीनृसिंह मंदिर बघण्यासाठी आलो.

पूर्वीचे हे लक्ष्मीनृसिंह मंदिर पण परकीय आक्रमणात लक्ष्मीची मूर्ती काढून तिची विटंबना करून नृसिंहाची विटंबना केलेली आम्हाला दिसली. नंतर पुरातत्व खात्याने थोडी डागडुजी करून मूर्ती सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आताची मूर्ती पाहून त्याचे नाव उग्रनृसिंह असे पडले आहे. 22 फूट उंचीची ही मूर्ती शेषनागावर बसलेली आहे. या मंदिर शेजारी  बडवीलींग आहे म्हणजे शंकराचे शिवलिंग. बारा फूट उंचीचे हे शिवलिंग खाली तीन फूट पाण्यात आहे. बडवी म्हणजे कन्नड भाषेत गरीब स्त्री. एका गरीब स्त्रीच्या पैशातून बनवलेले हे शिवलिंग म्हणून याला बडवीलिंग असे म्हणतात. आत्ताचे त्याचे नाव जलकंठेश्वर. पाण्यात असल्यामुळे हे नाव पडले. त्यानंतर आम्ही कृष्ण मंदिर बघायला गेलो. कृष्णमंदिरचा परिसर म्हणजे पूर्वीचे हे गाव कृष्णपुरा. मंदिरासमोर त्याकाळी मसाल्यांचा बाजार भरत. स्वयंपाकात लागणारे तांदूळ, डाळ, मसाले येथे विकावयास येत असतात. कृष्ण मंदिरासमोरच एक हुंडी म्हणजे दक्षिणापेटी (डोनेशन बॉक्स ) ठेवलेली आम्हाला दिसली. या मंदिरातही खूप छान कोरीव काम केलेले दिसते राजा कृष्णदेवराय व त्यांच्या तीन पत्नींची चित्रे येथे कोरीव कामातून दाखवलेली आहेत तसेच राजाने ओरिसावर केलेले आक्रमणही येथे कोरीव कामातून दाखवलेले आहे पुढे आम्ही कडलेकालू गणेश मंदिर पाहिले. अत्यंत उंच अशी मूर्ती पण खंडित झाल्यामुळे तिची पूजा केली जात नाही. अशा कित्येक मूर्ती भग्न अवस्थेत सापडल्यामुळे त्यांची पूजा येथे केली जात नाही असे आम्हाला आमच्या गाईड कडून कळले. विरुपाक्ष मंदिरासमोर जरा लांब एका दगडात कोरून तयार केलेली नंदीची मूर्ती आम्ही पाहिली. उंच आणि भव्यदिव्य असलेली ही नंदीची मूर्ती पाहून आम्ही विरूपाक्ष मंदिरात आलो. तिथे जाऊन आम्हाला लक्ष्मी हत्तीण पहायची होती. लक्ष्मीला जर आपण पैसे दिले तर ती तिची सोंड डोक्यावर ठेवून आपल्याला आशीर्वाद देते असे म्हणतात. माझ्या लेकाने तिला पैसे दिले. तर तिने तिची सोंड डोक्यावर ठेवून त्याला आशीर्वाद दिला. खूप छान वाटले तिचा आशीर्वाद घेऊन आम्ही हंपी सोडले व आमच्या पुढील प्रवासासाठी हुबळीकडे प्रस्थान केले.... 

अशी ही हंपीची सहल कायम लक्षात राहील अशी झाली. उत्खनन म्हणजे काय हे समजून घेऊन, Archeology Department चे खरचं खूप कौतुक करावे वाटले. सोपे नसते कुठलेही काम करणे, ते पूर्णत्वास नेणे. पण येथे हे करीत आहेत. त्यांची मेहेनत दिसते आहे. 
तर बरीच लांबलेली ही कहाणी येथेच समाप्त 🙏 

टीप. हंपी करण्याआधी बदामी करावे. ते करून हंपी पहावे. 
तुंगभद्रा धरणही पहावे. 
सर्वात महत्वाचे परिस्थिती कोणतीही असूद्या डोके शांत ठेवून निर्णय घ्या. 
हंपीमध्ये कुठेही काढलेले तिकीट नीट सांभाळून ठेवा. बाकी ठिकाणी तेच तिकीट दाखवावे लागते.


©kkdhanashree


Comments

  1. सुंदर च तूझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये तू आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातेस.👍❤️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद