हंपी एक अद्भुत अनुभव ...भाग १

 


हंपी

कर्नाटक राज्यातील एक गाव. तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले, पुरातत्त्व खात्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले, पौराणिक व ऐतिहासिक या दोन्ही गोष्टींवर आधारलेले. पुराणातील किष्किंधा तर इतिहासातील विजयनगर अशी याची ख्याती... याहून वेगळी ती काय ओळख हवी...😊

विजयनगर म्हणजे आत्ताचे होसपेट. हे गाव कर्नाटक राज्यातील बेल्लारी या जिल्ह्यातील एक. इथून हंपी १२ किमी वर आहे. हंपीला येथून जाणे येणे करणे सर्वात सोयीचे. यावर्षी काहीतरी वेगळे म्हणून आम्ही हंपीला भेट द्यायचे ठरवले. मुलाला आत्ता अभ्यासक्रमात हडप्पा व वैदिक संस्कृती आहे. यामुळे आम्ही हंपी हे ठिकाण ठरवले. उत्खनन केले म्हणजे नक्की काय केले हे आम्हाला पाहायचे होते. हंपी हे आत्ता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखले जाते. विजयनगर हे साम्राज्य होते. हंपी म्हणजे पूर्वीचे पंपापुर. पंपा म्हणजे देवी पार्वती. पंपापुर याचा अपभ्रंश म्हणजे हंपी. 



सकाळी लवकर पुण्यातून निघालो. लांबचा पल्ला गाठायचा म्हणून न्याहारी व दुपारचे जेवण सोबत घेतले. सकाळची प्रसन्न, शांत वेळ. रस्त्याने गर्दीही तशी कमीच होती. एका गतीने आम्ही साताऱ्याच्या पुढे गेलो. जरा एका झाडाखाली गाडी थांबवून, गाडीतच न्याहारी करायचा विचार केला. सकाळी सकाळी घरी मस्त दडपे पोहे बनवले होते. आल्हाददायक वातावरणात, घरून नेलेल्या दडप्या पोह्यांवर ताव मारून आम्ही न्याहरीचा आस्वाद घेतला, मग पुढे निघालो. कोल्हापूर, निपाणी, बेळगाव रस्ता सगळाच चांगला आहे. बेळगाव पासून पुढचे रस्ते तर एकदम झ्याक!👌 आहेत. बेळगाव नंतर ही हुबळीहून बायपासमार्गे होसपेटला निघालो. रस्त्यात जेवायला चांगली जागा आम्ही शोधत होतो. एके ठिकाणी दिसली. एका शेतातील झाडाखाली आम्ही सावली पाहून जेवण केले. चटई अंथरली. पोळी, फ्लॉवरची भाजी, पुलाव, लाडू मस्त बेत जमला होता. खरेतर प्रवास करताना जरा जास्तच भूक लागते असे वाटले. म्हणून लवकरच आम्ही आमचे दुपारचे जेवण केले. पुढे होसपेटला जाताना रस्त्याने दुतर्फा कापूस, ऊस यांची शेती आहे. ऊसाची शेती पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळते पण कापूस नाही. त्यामुळे मऊ मऊ, पांढरा शुभ्र कापूस हातात घेऊन पाहण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. जरावेळ थांबून आम्ही पुढे निघालो. होसपेट ओलांडून आम्ही हंपीकडे जायला निघालो. वाटेत एका जुन्या कमानीने आमचे स्वागत केले. सकाळी ५.१५ वाजता पुण्याहून निघालेलो आम्ही, गुगल मावशीच्या सहाय्याने ५.१५ ला व्यवस्थित हंपिला पोहोचलो. 

आम्ही जुन्या हंपीमध्ये राहणार होतो. तिथे पोहोचून आम्ही सामान ठेवून , फ्रेश होऊन सूर्यास्त पाहायला विरूपाक्ष मंदिराच्या जवळील असणाऱ्या हेमकुटा या भरपूर मंदिरांच्या टेकडीकडे गेलो. कन्नड भाषेत हेम म्हणजे सोने. जाताना आमचा रस्ता जरा चुकलाच आणि या गडबडीत आमचा सूर्यास्त चुकला. पण तरीही तेथील आजूबाजूचे सौंदर्य बघितले. छोटी छोटी देवळे, मोठे मोठे वेगवेगळ्या आकारातील दगड आणि आजूबाजूला असणारे बरेचसे महाराष्ट्रीयन लोक यांच्याबरोबर आम्ही तेथील परिसर बघितला. छोटी छोटी मंदिरे बघितली. अंधार पडला तसे खाली आलोजुन्या हंपी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या मँगो ट्री या रेस्टॉरंट मध्ये आम्ही जेवायला गेलो.  दाक्षिणात्य थाळीचा अंदाज न आल्यामुळे आम्ही जेवण जरा जास्तच मागवले 😅 जेवण करून आम्ही रूमवर परत आलो. दिवसभराचा प्रवास, सकाळी लवकर उठलेले सगळेजण त्यामुळे रात्री ८ वाजताच आम्ही झोपेच्या आधीन झालो. दुसरा दिवस अर्थातच आमचा खूप लवकर सुरू झाला. आम्ही लवकर सगळं आवरून, न्याहरी करून विरुपाक्ष मंदिरात गेलो. तेथे आमचे गाईड कृष्णाजी येणार होते. पुढचे दोन दिवस संपूर्ण ते आम्हाला हंपी आणि आजूबाजूचा परिसर दाखवणार होते. कर्नाटक शासनाकडून काही गाईड्स आरक्षित (alot) केले आहेत. आमचे गाईड त्यापैकी एक. (गाईड ची नावे ऑनलाईन उपलब्ध आहेत) सर्वप्रथम त्यांनी आम्हाला विरुपाक्ष मंदिराबाहेरील सर्वात मोठी बाजारपेठ दाखवली. जिथे हिऱ्यांचा व्यापार होत असे. ही त्याकाळी दागिन्यांची मोठी बाजारपेठ  होती. रस्त्याच्या दुतर्फा असणारी ही भली मोठी बाजारपेठ आणि कृष्णाजींनी केलेले त्याचे वर्णन त्यामुळे त्याकाळी ती कशी असेल हे सहज डोळ्यांसमोर आले अगदी हिऱ्यांसहित.😍 ही सर्व कल्पना करतच आम्ही विरूपाक्ष मंदिरात प्रवेश केला. हंपी मध्ये खूप माकडे, वानरे आहेत. ठीक ठिकाणी असणाऱ्या वानर, माकडांना पाहून हीच खरी किष्किंधा नगरी हे समजते 😂 इथे मंदिरात एक लक्ष्मी नावाची हत्तीण आहे. पण आम्ही गेलो तेव्हा सकाळी ती स्नानासाठी तुंगभद्रा नदीवर गेली होती. मंदिरात गेल्यावर जर तुम्हाला गर्भगृहात जाऊन भगवान शंकरांचे (विरूपाक्ष) दर्शन घ्यायचे असल्यास तिथे शुल्क भरून ती पावती पुजाऱ्यांना द्यावी लागते, तरच तुम्हाला प्रवेश मिळतो. विरूपाक्ष म्हणजे भगवान शंकर. जिथे भगवान शंकरांनी त्यांचा तिसरा डोळा उघडून कामदहन केले अशीही जागा. आम्ही दर्शन घेतले व मंदिराच्या उजव्या बाजूच्या एका कोपऱ्यात गेलो. एका छोट्या छिद्रातून थोडा प्रकाश आत येत होता तर समोरील भिंतीवर एक सावली आम्हाला दिसली. कृष्णाजी सांगत होते व आम्ही सगळे ती पहात होतो आम्ही तीन परिवार त्यावेळी कृष्णाजींबरोबर होतो त्यापैकी दोन परिवार पुण्याचे तर एक मुंबईचे होते. समोरील भिंतीवरील आकृती पाहून हे काय आहे? असे आम्ही कृष्णाजींना विचारले त्यांनी सांगितले ही गोपूराची आकृती आहे पण उलटी आहे. याचे वैशिष्ट्य हे भिंतीवरील छिद्र. हे इतक्या परफेक्ट जागी आहे त्यामुळे सूर्यनारायणाचे उत्तरायण असो वा दक्षिणायन ३६५ दिवस ही आकृती आहे तिथेच राहते. जराही इकडे तिकडे सरकत नाही. त्यानंतर आम्ही मंदिराच्या सभामंडपात केलेले कोरीव व रंगकाम पाहिले. भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केल्याची आख्यायिका येथे चितारलेली दिसते. तसेच विष्णूचे दशावतारही दिसतात. हा सर्व इतिहास जाणून घेत आम्ही पुढे विठ्ठल मंदिराकडे निघालो..


विठ्ठलापुरा या भागात असणारे हे विठ्ठल मंदिर. येथेही शुल्क भरून आता प्रवेश मिळतो. आणि हीच पावती पुढे काही ठिकाणी दाखवावी लागते. काही काळ आपले म्हणजे महाराष्ट्राचे आद्यदैवत असणारे पंढरपुरातले विठ्ठलरुक्मिणी हंपी येथील विठ्ठलापूर येथे वास्तव्यास होते. तिथे गेल्यावर हे नीट समजले. कृष्णाजींच्या सांगण्यावरून, " कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू" या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या गाण्याचा निश्चित अर्थ तिथे गेल्यावर उलगडला. विठ्ठल मंदिरात सुरुवातीलाच असलेला गरुडरथ दृष्टीस पडतो. दक्षिण भारतात द्राविडी स्थापत्यकला जास्त वापरून कलाकृती बनवल्या गेल्या आहेत. स्थापत्य कलेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे गरुड रथ. भारत सरकारनेही त्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला ५०/- रुपयांच्या नोटेवर स्थान दिले आहे. हेही तितकेच महत्त्वाचे आहे. येथे माणूस रुपी गरुड व रथरुपी मंदिर बघायला मिळते. रथाच्या समोरील बाजूस संगीतीय मंदिर बांधण्यात आले आहे. संगीतीय मंदिरात वेगवेगळे खांब वाजवून सुमधुर संगीत ऐकायला मिळते. हे आता बंद केले आहे. स्थापत्य कलेचा हा एक अविष्कार! गर्भगृहात जिथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती ती जागा आम्ही बघितली. मंदिरात बनवलेली शिल्पे वेगवेगळी आहेत. त्यापैकी एका शिल्पात सहा आकार (सिक्स इन वन) एका शिल्पात दोन आकार असे येथे बघायला मिळाले. मंदिराबाहेर त्याकाळी खूप मोठा घोडेबाजार भरायचा त्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. हंपीमध्ये त्याकाळी शैव व वैष्णव या दोन्हींना मानणारे लोक होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शिव आणि विष्णू असे दोघेही शेजारी शेजारी पहावयाला मिळतात.तिथून पुढे आम्ही राणीचे न्हाणीघर (क्वीन्स बाथ) बघण्यासाठी गेलो. खास उन्हाळ्यासाठी राजा कृष्णदेवराय यांनी हे राणीसाठी बांधून घेतले होते. त्यात २४ घुमट व त्यांच्या छताला असणारे अप्रतिम कोरीव काम आपले मन मोहून टाकतात. दुपारचे जेवण करून आम्ही हंपी म्युझियम पाहिले. उत्खननात सापडलेल्या, मिळालेल्या बऱ्याचशा गोष्टी येथे ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर आम्ही हजारारामा मंदिर पहायला गेलो. कन्नड भाषेत हजारा म्हणजे व्हरंडा. घराच्या व्हरंड्यात असलेले मंदिर. राजा कृष्णदेवराय यांच्या राजवाड्यातील व्हरंड्यात असलेले हे राम मंदिर. त्याकाळी सगळ्यांची दिवसाची सुरुवात या हजारारामाच्या दर्शनाने होत असत. या मंदिरातील कोरीव कामाला तोड नाही संपूर्ण रामायण या मंदिराच्या भिंतीवर कोरलेले दिसते. चेहऱ्यावरील हावभाव हे अप्रतिम आहेत यावरूनच कोरीव काम सुरेख आहे हे समजते. यामंदिरासमोर त्याकाळी पान सुपारी बाजार भरायचा , इती कृष्णाजी. हंपीमध्ये विविध राजवटींनी हल्ले केले आणि येथे असणाऱ्या काही मंदिरातील मूर्ती भग्न करून नाश केल्यामुळे हंपीमध्ये बरीशी मंदिरे मूर्तीविनाच आहेत. हजाराराम मंदिर पाहून आम्ही पुढे कमलभवन पहायला आलो. या एकाच परिसरात कमलभवन, जलभवन व इंद्रभवन आहेत. त्यापैकी इंद्रभवनाचे काहीच अवशेष आता नाहीत, जलभवनाचा फक्त पाया दिसतो , तर कमलभवन बऱ्यापैकी सुस्थितीत आहे कमलभवन उन्हाळ्यात थंड राहण्याकरता केलेली रचना येथे बघायला मिळाली शिवाय येथे पंचकोनी , चौकोनी , त्रिकोणी टेहाळणी बुरुज असलेले दिसले. टेहाळणी बुरुज म्हणजे वॉचिंग टॉवर्स. तिथे शेजारीच अंबरखाना आहे. विजयनगर साम्राज्यात ९०० हत्ती होते त्यापैकी ११ हत्ती येथे असत. कर्नाटकात दसरा हा सण खूप महत्त्वाचा. या सणाला या ११ हत्तींची मिरवणूक निघत. त्यापैकी एका हत्तीवर देवी भुवनेश्वरीची प्रतिमा ठेवून तिची संपूर्ण नगरभर मिरवणूक काढली जात. त्या हत्तींसाठी बांधलेला हा अंबरखाना. हत्ती व त्यांचे माहुत यांना राहण्यासाठी ची ही जागा. त्यानंतर आम्ही राजा कृष्णदेवराय यांचा राजवाडा त्यातील दरबार, त्यांचा महाल, गुप्त खोली , बँक, पुष्करणी पाहिली. पुष्करणीची बांधणी अलौकिक आहे. विषम संख्येने बांधलेली अशी ही पुष्करणी नयनरम्य आहे. या पुष्करणीचे पाणी तिथे असणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या अभिषेकाकरिता वापरत असत. येथेच आम्हाला त्याकाळी असणारी पाणीपुरवठा रचना म्हणजेच पाईपलाईन पहायला मिळाली. तसेच सैनिकांसाठी ठेवलेली दगडी ताटे ही इथे ठेवलेली आम्ही बघितली.


क्रमशः


©kkdhanashree





Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद