मढेघाट धबधबा- निसर्गाची किमया

 पावसाळा म्हंटले की एक तर गडकिल्ले भटकंती नाहीतर धबधबा भेट हे नक्की ठरलेले.. कात्रज बोगदया आधी आम्हाला नभ उतरू आले असे फक्त शब्दात न म्हणता ते प्रत्यक्ष अनुभवणे म्हणजे काय हे जाणवले. पुढे नसरापूर फाट्याला वळून आम्ही वेल्ह्याला जायला निघालो. तसा भोर तालुका निसर्गाचे वरदान लाभलेला गड किल्ले असलेला आणि भात शेतीसाठी प्रचलित. याचा अनुभव आपण सतत घेत असतो असो... आम्ही पुढे पुढे जात होतो.  सकाळच्या शांत वातावरणात आम्ही वेल्ह्याला कधी येऊन पोहोचलो कळलेच नाही. इथून पुढे साधारण १७ कि. मी वर मढेघाट धबधबा आहे. रस्ता फारसा चांगला नाही असेच म्हणणे योग्य. गुंजवणे धरणाची भिंत आणि त्या मागे असणारे बॅकवॉटर अहाहा! पावसाळा जोरदार आहे हे यावेळी जाणवले. पुढे पुढे जाताना असंख्य छोटे मोठे धबधबे पाहत होतो. 


   खरचं निसर्गाचा वरदहस्त लाभलेली अशी ही आमची पुण्यभूमी 😊 पुण्याच्या आजूबाजूला किती तरी छान छान ठिकाणे बघण्यासारखी आहेत. सर्वत्र धुकेच धुके होते त्यादिवशी. वा! काय वर्णन करू, असे वाटत होते आपण कुठे तरी वेगळ्याच ठिकाणी आहोत. जिथे ढग उतरून खाली जमिनीवर आलेत आपल्या भोवती फक्त ढगच आहे आणि आपल्याला स्वर्गीय सुखाचा आनंद घेता येतो आहे अहाहा!  व्वा व्वा ,छानच! घाट चढताना आजूबाजूचे अक्षरशः काहीही दिसतच नव्हते. गाडीचे दिवे सुरू होते म्हणून समोरचा रस्ता जरा जरा समजत होता. सकाळी वेळ, शांत वातावरण, सोबतीला रिमझिम पडणारा पाऊस आणि भटकंतीचे प्रयोजन करून निघालेलो आम्ही. सततचा पाऊस म्हणजे नुसती चिकचिक हे नेहमी डोक्यात असते. पण त्यातही आपल्याला काहीतरी वेगळे पाहायचे असेल तर... खरचं निसर्गाचे सौंदर्य बघायचे असेल तर ते बघण्याचा सगळ्यात जास्त उत्तम काळ म्हणजे पावसाळा. निसर्ग आपल्याला पाऊस देतो, निसर्गच आपल्याला पाणी देते, आणि आत्मिक समाधान ही निसर्ग देतो. जेव्हा भान हरपयला लावणारा निसर्ग आपल्याला साद घालतो तेव्हा आपण पुढे जायचे आणि त्या निसर्गात रममाण व्ह्यायचे. अहाहा! काय वर्णू तो आनंद.... मनात आणि डोळ्यात साठवून ठेवावे अजून काय करावे...जे क्षण आपण डोळ्यात साठवतो ते आपल्याला त्या क्षणी कॅमेऱ्यात पण टिपता येतात असे नेहमी होत नाही. समोर दिसणारे डोंगर, गर्द हिरवी झाडी, झुडपे, पावसाची रिमझिम, हळूच अलगद खाली आलेले ढग, गडद धुकं बघा दिसते आहे का डोळ्यासमोर 😊 पण नेहमी कल्पनाच किती छान असते असे नाही तर प्रत्यक्ष अनुभव घेणेही तितकेच गरजेचे. आम्ही जाताना एक छोटा घाट लागला. चढून गेलो आणि एक छोटा धबधबा दिसला आम्ही जरा वेळ तिथे थांबून पुढे निघालो. 


     पुढे जाताना धुके आणि पाऊस सुरूच होते. काही अंतरावर आम्हाला एक मोठा धबधबा दिसला. काही जण थांबले होते. आम्ही पण त्या धबधब्याच्याजवळ गेलो. फोटो काढले स्वच्छ पडणारे पाणी पाहून खूप बरे वाटले. त्या पाण्यातून तळ अगदी सहज दिसत होता. खरंच ज्याचे आयुष्य या पाण्यासारखे नितळ आहे त्याला जीवन जगण्यातला खरा आनंद घेता येतो. जरावेळ भिजण्याचा आनंद घेऊन आम्ही पुढे निघालो. वाटेतले लहान मोठे धबधबे आम्हाला खुणावत होते. पण प्रत्येक ठिकाणी थांबणे शक्य नव्हते. पुढे गेल्यावर समोर एक खिंड दिसली आणि तिथे शेजारी एक पाटी दिसली सिंगापूर १० किमी. 😳 बघून आपण नक्की कुठे आलो आहे? असे झाले 😀 मग समजेल इथे एक गाव आहे सिंगापूर नावाचे😂 व्वा मस्त आपण एक दिवसात सिंगापूर ला जाऊन आलो...असे म्हणाला हरकत नाही😊

पुढे आम्ही मढेघाट इथे पोहोचलो. सुरुवातीपासूनच  सगळीकडे दाट धुके होते. गाडीचे दिवे सुरू असूनही आम्हाला खूप सावकाश पुढे पुढे जावे लागत होते. समोरचे काहीच दिसत नव्हते. इथे प्रत्येकाला एन्ट्री फी अगदी नाममात्र द्यावी लागते. ती देऊन आम्ही पुढे गेलो.( अर्थात तेवढेच पैसे जवळ होते) सुरुवातीला एके ठिकाणी गाडी पार्क करून आम्ही उतरून जाऊ असे ठरवले. या सगळ्यात एक गंमत झाली होती, माझे अहो घरून निघताना त्यांचा फोन आणि पाकीट घरीच विसरले होते😌 आणि जेव्हा हे लक्षात आले तेव्हा आम्ही पुणे सोडले होते, अर्थातच आमची काय हालत असेल तुम्ही समजू शकता🙆 गाडी पार्क करून आम्ही चालत निघालो. 

गर्द धुक्यातून वाट काढत पुढे जात होतो. काहीतरी वेगळा अनुभव होता हा. समोरचे काही दिसत नसताना वाट काढत पुढे जाणे.... खरचं आयुष्यात हेच तर बरेच वेळा करत असतो आपण😊. पुढे एक छोटे टेन्ट सारखे हॉटेल आम्हाला दिसले. आधी काहीतरी खाऊ. मग पुढे जाऊ असे ठरले. माझे अहो शांतपणे त्या मालकाला आमचा काय प्रॉब्लेम झालाय हे सांगत होते. माझा फोन जवळ होता पण रेंज प्रॉब्लेम मुळे काहीच करू शकत नव्हतो. पण त्यांनी आमची अडचण समजून आम्हाला हॉटस्पॉट ने नेट कनेक्शन दिले. आम्ही त्यांना काही पैसे ट्रान्स्फर केले आणि त्यांनी बिला व्यतिरिक्तचे पैसे आम्हाला देण्याचे कबूल केले. आम्ही वडापाव, भजी यावर मनसोक्त ताव मारायला. पावसात हे पदार्थ खाताना काय आनंद मिळतो व्वा! "पैसे येताना घेऊन जा,"असे त्यांनी सांगितले. धुक्यातून वाट काढत पुढे निघालो. आजूबाजूला काही दिसते आहे का हे बघत होतो. पाण्याचा खळखळाट कानावर पडला आणि आम्ही पावले पटपट उचलू लागलो. समोर गेलो आणि पाणी वाहताना दिसले. छोटे छोटे ओहोळ, धबधबे दिसले, मस्त वाटले. नक्की वाट कुठे आहे हे शोधत पुढे गेलो बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. जरा पुढे जाऊन जरावेळ पाण्यात पाय सोडून आम्ही निवांत बसलो. थंडगार वारे, थंडगार पाणी आणि संपूर्ण धुके वातावरण एकदम मस्तच जाणवत होते. मग जरा अजून पुढे गेलो. पुढे कड्याला जाऊन डोकावून पाहण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न सुरू होता पण धुक्यामुळे धबधबा काही दिसतच नव्हता. मग जरा वेळ तिथे थांबलो पण धुके काही कमी होईना. समोर काही लोक घोळक्याने थांबलेले दिसले. उत्सुकतेने काय सुरू आहे ते पाहिले तर ते सगळे  रॅपलिंग करण्यासाठी आले होते हे समजले. जरा इकडे तिकडे भटकून आम्ही पलीकडच्या बाजूला गेलो. अर्थात पाण्याचा प्रवाह🌊 जोरात असल्यामुळे मला ते ओलांडताना जरा कसरत करावी लागली. तिकडून आम्हाला धबधबा पाहायचा होता. खरचं तिकडून धबधबा आम्हाला बऱ्यापैकी दिसला आणि सगळ्या गर्द धुक्यात कड्यावरून कोसळणारे पांढरे स्वच्छ  पाणी पाहून मनाला जो आनंद मिळाला काय वर्णन करू त्याचे. अवर्णनीय....



 तोवर तिकडे रॅपलिंग सुरू झाले होते. एक ताई तिथून खाली उतरताना आम्ही पाहत होतो. ती अगदी सावकाश दिलेल्या सूचनांचे पालन करून सावकाश लक्ष केंद्रित करून उतरत होती. जरावेळ मनसोक्त धबधबा पाहून आम्ही परत निघालो. परत पाण्याचा प्रवाह ओलांडून पलीकडे जायचे होते😳 पण हळूहळू पाणी पार केले आणि आलो दुसऱ्या बाजूला. खरे तर एक वाट पलीकडून खाली जाते. धबधब्याचा आनंद जसा वरून पडताना घेता येतो तसा तो खाली पडताना, पाणी अंगावर झेलताना पण घेता येतो. पण आम्ही वरून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेऊन परत निघालो. येताना परत एक प्लेट मस्त गरमगरम भजी खाऊन आम्ही आमचे (जास्तीचे जे आम्ही आधी त्यांना ट्रान्स्फर केले होते ते) पैसे घेऊन निघालो. येताना बऱ्यापैकी धुके कमी झाले होते. त्यामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ बघता आला. एका ठिकाणी थांबलो जाताना काहीच दिसत नव्हते पण येताना धुके कमी झाले होते. दोन्ही बाजूला दरी आणि मधून जाणारा रस्ता व्वा काय विलोभनीय दृश्य होते ते. थंडगार वारे आणि खाली आलेले ढग पाहून आम्ही पुण्याकडे यायला निघालो. वाटेत एका झाडाखाली गाडी लावली आणि यथेच्छ जेवणावर ताव मारला. बाहेर पाऊस आणि घरून नेलेले जेवण 😋 अजून काय हवे. पुढे निघालो तर काही ठिकाणी भात लावणी सुरू होती. एके ठिकाणी थांबलो. भात लावणी जवळून पाहू म्हणून. माझा लेक आणि अहो यांनी लगेचच तिकडे कूच केली. त्या माणसांना विचारून तेही शेतात उतरून भात लावणीसाठी सज्ज झाले. एका रेषेत रोपे लावली जात होती. ५-१० रोपे लावून त्यांना एकदम भारी वाटले . खूप दिवसांपासूनची माझी इच्छा होती,  माझ्या लेकाला भात लावणी कशी करतात हे अनुभवायला मिळावी ती पूर्ण झाली. त्या भात लावणी करणाऱ्या माणसांनी पण त्याला तो आनंद घेऊ दिला. अगदी एक काका तर एका दादाला म्हणाले,"शिकवा रे त्याला भात लावणी करायला." काकू पण म्हणाल्या, "खरच शहरातल्या लोकांना काय माहित भात लावणी. आज त्याने अनुभव घेतला" वगैरे वगैरे बोलणे सुरू होते.. सगळे डोळ्यात आणि मनात साठवून आम्ही परतीच्या वाटेला लागलो आणि कोणताही अडथळा न येता सुखरूप पुण्यात येऊन पोहोचलो.

महत्वाचे सांगणे घरून निघताना फोन आणि पाकीट घेतले का हे आठवणीने सगळ्यांनी बघा 😀 


©kkdhanashree 


Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद