सफर कोकणची भाग -२

 


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व किनारा फिरून आलो म्हणजे जरा लांब जाऊन आलो. बरोबर ७.१५ वाजता आम्ही सावंत यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेलो. श्री व सौ सावंत आधीच तिथे जाऊन थांबले होते. काही वेळात एक काका तिथे आले आणि त्यांनी एक समोरच असलेल्या पिंजऱ्याचे कुलूप उघडून दार उघडले. आम्ही आतुरतेने आता ते काय करणार हे पाहत होतो. त्यांनी एक टब घेतला आणि तिथली एक टोपली उचलून त्यातून वाळू आणि त्यासोबत काहीतरी त्या टबमध्ये घेतले. ते बाहेर आले आणि त्यांनी आमच्या समोर तो टब घेतला आणि आम्ही अक्षरशः पाहत राहिलो. त्या टब मध्ये छोटीछोटी अशी ६ कासवाची पिल्ले होती😍 ती बघून काय प्रतिक्रिया द्यावे हेच समजेना...


काकांसोबत आम्ही समुद्राकडे निघालो. आणि आता सुरू झाला कासवांचा खरा जीवन प्रवास... 🐢लाटेजवळ काकांनी ती पिल्ले वाळूवर ठेवली. एक एक करून ती सगळी पुढे जाऊ लागली. हे सगळं बघताना अंगावर काटा आला होता. माणूस आपल्या बाळाला सर्व काही शिकवतो पण इथे आई २ महिने आधी अंडी घालून निघून जाते त्यांची काळजी हे काका घेतात.... त्यांना पक्षी, कुत्रे सगळ्यांपासून संरक्षण देतात. मग ती अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले ते समुद्रात सोडतात. पण दुर्दैव असे की १०० पैकी एकच कासव समुद्रात नीट पोहोचते कारण वाटेत मोठे मासे या कासवांना खातात.😔 हे ऐकून वाईट वाटले पण हेच सत्य आहे. ही छोटी छोटी पिल्लं पुढे पुढे जाण्यासाठी धडपडत होती. कासवाची चाल म्हणजे नक्की काय हे आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो. एक कासव जरा अधू होते. पण ते प्रयत्न करत होते. बराच प्रयत्न केल्यावर माझ्या लेकाने समुद्रात जरा आत जाऊन लाटेवर त्याला सोडले. लगेच पोहत पोहत ते आता गेले आणि दिसेनासे झाले. बाकीच्या पिल्लांना लाटेवर तरंगत जाऊन परत लाट यांना परतपरत किनाऱ्यावर आणून सोडत होती. सुरुवातीला एक,दोन वेळा असे झाले पण नंतर पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतात ही म्हण यांनी सार्थकी ठरवली.... हे सगळं पाहताना मनात असंख्य विचार येऊन गेले. पण शेवटी ती पिल्ले समुद्रात दिसेनाशी झाली तेव्हा हुश्श झाले. आज खऱ्या अर्थाने कोकण आणि कोकणातील लोक यांचा अनुभव घेतला. मला मनापासून श्री व सौ सावंत ( मुंबई) यांचे आभार मानायचे आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला हे बघणे शक्य झाले आणि ते काका जे या कासवांची आणि त्यांच्या पिल्लांची काळजी घेतात त्यांच्या साठी hats off! 🙏 मी यातून एक शिकले आयुष्यात कितीही संकटे आली तर जगण्याची जिद्द सोडायची नाही.

" ये मत कहो खुदासे मेरी मुश्किल बडी है,   

उन मुष्कीलोंसे केह दो मेरा खुदा बडा है"

यावेळेसची ही सहल कायम लक्षात राहील. दुसऱ्यादिवशी आम्ही चिपळूण मार्गे खेडला आलो. तिथून अर्थात गूगल मावशीच्या साहाय्याने  रसाळगड हा गिरिदुर्ग बघण्यासाठी गेलो. उंचावरचा हा गिरिदुर्ग अजुन बराच सुस्थित आहे. गाडी वरपर्यंत जाते. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर समोरच बजरंग बलीचे दर्शन होते. पाषाणात कोरलेली ही मूर्ती शेंदूर लावून ठेवलेली दिसली. अजुन थोडे वर चढून गेल्यावर ३ मोठ्या तोफा आपले स्वागत करतात. पुढे देवीचे प्रशस्त मंदिर दृष्टीस पडते. मंदिरात ठेवलेली देवीची पालखी अतिशय सुबक आणि देखणी आहे. गडावर १०-१२ लहान मोठ्या तोफा जतन करून ठेवलेल्या दिसल्या. असा हा रसाळ गड पाहून आम्ही आधी घरून नेलेल्या भेळेवर ताव मारायला आणि परतीच्या वाटेला लागलो आणि यथावकाश पुण्यात येऊन पोहोचलो. अशी ही कोकणातील अजुन एक ट्रीप लक्षात राहणारी झाली हे नक्की😄 

©kkdhanashree


Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद