सफर कोकणाची भाग -१
वसंत विहार, गुहागर येथील आमचे राहण्याचे ठिकाण. नयनरम्य परिसर, समुद्राचा तालबद्ध संगीतमय आवाज. नारळी,सुपारीची वाडी आणि शांत निवांत वातावरण, सुग्रास, चविष्ट जेवण.... बस अजून काय हवे रिलॅक्स व्हायला....
नमस्कार माझा पुढचा ब्लॉग सफर कोकणाची.
मे महिना म्हंटले की कोकण आठवते. मग काय 2-3 दिवसाचे नियोजन करून बुकिंग करायचे आणि एका सकाळी लवकर पुण्यातून निघून निसर्गाच्या लयलुटीचा आनंद घेत पोहोचायचे कोकणात. यावेळी आम्ही गुहागर आणि जवळ पासची ठिकाणे पहायचे ठरवले. ताम्हिणी घाटातून जाताना भरपूर वानरे, माकडे,त्यांच्या टोळ्या पाहत आम्ही पुढे जात होतो. न्याहारी अर्थात सोबत घेतली होती. एके ठिकाणी थांबून आधी समोर उभ्या असणाऱ्या गोमातेला गोग्रास घातला आणि मग न्याहारी केली😁 पुढे फार कुठे न थांबता आम्ही लवकर चिपळूणला आलो. मधल्या वाटेत आम्हाला २ वेळा कोकण रेल्वेचे दर्शन झाले 🚂🚃🚃 चिपळूण पासून पुढे आम्हाला गूगल मावशीने बरोबर आमच्या नियोजित स्थळी गुहागर मध्ये पोहचवले 🚙 12.30 वाजता आम्ही वसंत विहारच्या समोर होतो. मस्तपैकी चविष्ट अशा जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला. संध्याकाळी 🌊🏖️ समुद्रकाठी फिरणे, पाण्यात खेळणे, सूर्यास्त पाहणे आणि सूर्यास्त होताना त्याची लालसर दिसणारी किरणे जेव्हा ओल्या वाळूवर पडतात तेव्हा ती वाळूही आपल्याला लालसर भासते. अविस्मरणीय नजरा होता तो...
दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही लवकर आवरून तवसाळ जेट्टीला जायला निघालो. 🛳️ फेरी बोटीने जयगडकडे निघालो. दाभोळ ते धोपवे इथे जी फेरी बोट आहे त्यामानाने तवसाळ ते जयगड फेरी बोट तशी लहान आहे. अधलामधला वार असल्यामुळे गर्दी तशी कमीच होती. खाडी ओलांडताना समोर काही घरे दिसली अगदी खाडीला लागून बांधलेली आहेत. ती बघून क्षणभर पोटापाण्यासाठी माणसं काय काय करतात हा विचार चटकन मनात डोकावला. आजूबाजूला बघताना खूप मोठमोठी जहाजे तिथे पहायला मिळाली. जेट्टी ते जयगड साधारण अंतर ४ किमी आहे. जयगडला मी जवळपास १४ वर्षांनी जात होते त्यामुळे मनात जरा शंका होती तेव्हा जयगड तेव्हा चांगल्या स्थिती होता आता कसा असेल?🤔 पण आहे तसाच तो इतक्या वर्षांनी पहिला त्यामुळे मला खूप समाधान वाटते😇 आम्ही अख्खी तटबंदी फिरून आलो. जयगड हा अभ्येद्य असा जलदुर्ग आहे. हा १३ व्या शतकात बांधला गेला असावा. किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगलीच भक्कम आहे. किल्ल्याच्या सभोवती १३-१४ फूट खंदक खोदलेले आहे. असा हा जलदुर्ग पाहून आम्ही परत जेट्टीला आलो. तिथून आम्ही हेदवीच्या दशभुज लक्ष्मी गणेशाच्या दर्शनाला गेलो. दुपारचे रखरख ऊन बाहेर जाणवत होते पण मंदिर परीसर अतिशय शांत आणि आल्हाददायक जाणवत होता. श्रींची मूर्ती संगमरवरी दगडात तयार केलेली असून त्यावरचे हावभाव अतिशय प्रसन्न असे भासतात. या मूर्तीच्या हातात विविध आभूषणे आहेत. श्रींचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो समोर एक झाड दिसले जवळ जाऊन पाहिले तर एक फुल दृष्टीस पडले. त्याच्या भोवती पाकळ्या आणि आत श्री शंकराची पिंड दिसली. माझ्या लेकाने लगेच म्हंटले, "आई पिंडफुल". हे फुल इथे गणपतीला वाहतात असे समजले.
श्री गजाननाचे आशीर्वाद घेऊन तिथूनच जवळ असलेले ठिकाण बामणघळ इथे गेलो. खरे तर रस्तावर काही ठिकाणी मार्गदर्शक फलक आहेत त्यांच्या आणि अर्थात गूगल मावशीच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचता येते. ( कोकणात फक्त दोन नेटवर्क नीट कार्यरत आहेत एक म्हणजे jio आणि दुसरे BSNL) नक्की बामणघळ काय आहे याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच होती. तिथे पोहोचल्यावर समोर फक्त खडकाळ भाग दिसला अरे म्हणजे नक्की काय? पाणी खडकावर कसे आदळते हे बघायचे आहे का? 🤔 असा विचार करत आम्ही पुढे गेलो थोडे जरा चढून एका खडकावर गेलो आणि बघितले तर अदभूत असे काहीतरी आहे हे जाणवले. जवळ जाऊन पाहिले तर समुद्राचे पाणी खडकांवर आदळूनमध्ये एक मोठी फट तयार झाली आहे आणि भरतीच्या वेळी जोरात आलेलं पाणी, खालून त्या फटीतून वर येताना होणारा आवाज आणि ते नयनरम्य दृश्य काय वर्णन करू त्याचे. अहाहा! एकदा तरी तिथे सर्वांनी जावे असे मला वाटले. निसर्गाची किमया नक्कीच निराळी असते हे जाणवते. काहीवेळ आम्ही तिथे बसून निसर्गाची किमया पाहत होतो. हे करताना अजुन थोडे उंच अजून अजून थोडे उंच पाणी पहायला मिळू दे रे देवा हे आमचे सुरूच होते. हे सगळे मनात, डोळ्यात साठवून आम्ही पुढे वेळणेश्वराच्या दर्शनाला निघालो. वेळणेश्वराच्या मंदिरात गणपती, काळभैरव, वेळणेश्वर, लक्ष्मीकेशव, परशुराम असे सर्वांची मंदिर आहे. सुबक असे बांधलेले मंदिर लक्षवेधी आहे. सुरुवातीलाच प्रवेश करताना असलेली दीपमाळ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आहे. तिथून आम्ही गुहागरला परत आलो. इथे आम्ही व्याडेश्वराचे दर्शन घेतले. मोठा सभामंडप आणि त्याला शोभेल असा गाभारा मन प्रसन्न करून जाणार आहे. व्याडेश्वराला अभिषेक सुरू होता ते पाहून मनस्वी आनंद झाला. मनोमन त्याला प्रार्थना करून आम्ही वसंत विहारला परत आलो. जरा विश्रांती घेऊन आम्ही गुहागरला मिळणाऱ्या लाल, गोड, रसदार अशा कलिंगडाचा फडशा पाडला. त्यानंतर गुहागरच्या दुर्गामाता आणि अष्टवणे गणेशाला जायला निघालो. दुर्गादेवीच्या मंदिराचा परिसर मोठा असून तिथे गोशाळा, वेदपाठशाळा आणि धर्मशाळा ही आहेत. देवीचे रूप विलोभनीय असून मूर्ती क्षणात मनात घर करून जाणारी आहे. मातेचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. एक वानरांची टोळी आम्हाला दिसली. झाडावरून कौलारू छतावर टणाटण उद्या मारून ते इकडून तिकडे जात होते. एवढे ऊन जाणवत असूनही त्यांचा खेळ सुरूच होता. रस्ता नीट न समजल्यामुळे आम्ही एका वाडीतून जात होतो तिथे आम्हाला कोकणातील बैठी आणि कौलारू घरे पाहायला मिळाली. उंचीने कमी असलेले घरे सारवलेली होती त्यामुळे गारवा टिकून होता. बऱ्याच घरासमोर वळवणाचे पदार्थ आणि आमसुले म्हणजे कोकम वळत घातलेले दिसले. अष्टवणे गणेशाचे मंदिर डोंगरात वसलेले असून जरा उंच असल्यामुळे साधारण १००-१२५ पायऱ्या चढून जाव्या लागतात. स्वयंभू अशा शिळेत श्रीगजानन प्रकट झाले आहेत. मंदिराच्या आवारात बकुळीचे सुंदरसे झाड आहे. फुलांचा मंद सुगंध सर्वत्र दरवळत होता. तिथे एक अखंड वाहणारा झरा आहे. या झऱ्याच्या पाण्यावरच मंदिराचे संपूर्ण बांधकाम झाले आहे असे समजले.
वसंत विहारला परत आल्यावर आमच्या शेजारी राहणारे श्री व सौ सावंत यांच्याशी काही विषयांवर बोलणे झाले आणि त्यांच्या कडून एक गोष्ट आम्हाला समजली. ती गोष्ट ऐकून आम्ही अवाक् झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ती गोष्ट पाहायला मिळणार होती. बघुयात पुढे कळेलच काय आहे ती गोष्ट😊 त्यांनतर आम्ही उकडीच्या मोदकांचा आणि सांडगी मिरचीचा आस्वाद घेतला...कोकण म्हटलं की अंबोळी, उकडीचे मोदक, मिरगुंड, सांडगी मिरची आलेच😋
क्रमशः
©kkdhanashree



Comments
Post a Comment