आजोबा, माझे आजोबा!
१-२ दिवसांपूर्वी, प्रा. वंदना जोशी यांची एक फेसबुक वरची पोस्ट वाचण्यात आली. ती पोस्ट वाचून मी माझे बालपण आठवण्यात हरवून गेले......
शिरूर घोडनदी काठी वसलेले टुमदार गाव. माझे माहेर यापेक्षा वेगळी ओळख काय सांगू? माझे बालपण, महाविद्यालयीन शिक्षण इथे झाले.
लहानपणापासून एक नाव माझ्या सतत सोबत असलेले म्हणजे गुरूवर्य गो. ना. वाघ, माझे आजोबा. माझ्या बाबांचे बाबा. लाडात वाढलेली मी पण घरात एक दरारा असायचा या नावाचा. हे नाव सांभाळताना एक दडपण मनावर सतत असायचे. आपली कोणतीही कृती या नावाला धक्का लागणार नाही याचे. पंचक्रोशीत हे नाव महत्वाचे होते ते आजोबांच्या कर्तृत्वामुळेच. १९५१ साली आजोबा पुण्यातील भारत हायस्कूल सोडून शिरूरला गेले ते कायमचेच...
मुख्याध्यापक म्हणून ते शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याधाम प्रशाला या शाळेत रुजू झाले आणि ते शाळेचेच होऊन गेले. दिवसरात्र कष्ट करून त्यांनी शाळेचा नावलौकिक वाढविला. आजोबांनी पुढाकार घेऊन संस्थेच्या ८ शाळा सुरू केल्या, एक महाविद्यालय सुरू केले. पुढे आय. टी. आय. व एक फार्मसी कॉलेज सुरू केले.
मला आजोबांचा सहवास १४ वर्षे लाभला. या काळात मला जे आजोबा कळले ते म्हणजे हसरे, शांत, समजूतदार, हुशार आणि आम्हा नातवंडांवर प्रेम करणारे, माया करणारे आजोबा. आजी माझ्या जन्मापूर्वी गेली असल्याने आजी आणि आजोबा या दोघांचे प्रेम आजोबांनीच आम्हाला दिले.
मला आठवते ७ वीमध्ये असताना सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत मी भाग घेतला होता. गोखले बाईंनी आमचे 'माझी आजी' हे नाट्यवाचन बसवले होते. प्रॅक्टिस झाली होती. पण ऐनवेळी स्पर्धेच्या दोन दिवस आधी मी तापाने फणफणले होते. आईबाबा यांना मलेरिया झाला होता. मी व माझा भाऊ तापाने फणफणलो होतो तर माझी काकू आजी आली होती ती पण आजारी पडली होती. प्रॅक्टिससाठी मला फोन आला आणि आजोबांनी तो उचलला. माझ्या बाईंना सांगितले घरात एकटा मी उभा आहे बाकी सगळे आजारी आहेत. स्पर्धेच्या दिवशी आजोबा सकाळी १० वाजता शाळेत गेले. ११वाजता रिक्षा घेऊन मला घ्यायला आले. आम्ही दोघे शाळेत गेलो. माझे नाट्यवाचन झाले आजोबांनी परत रिक्षा आणून मला घेऊन घरी आले. महिनाभराने नाट्यवाचनाचा निकाल सकाळ पेपर मधून जाहीर झाला आणि त्यात मला प्रथम क्रमांक मिळाला होता, हे फक्त आजोबांमुळेच. त्यानंतर नगरला फिरोदिया करंडक ही स्पर्धा झाली तिथेही आम्ही 'माझी आजी' हेच नाट्यवाचन सादर केले होते. तिथेही माझा प्रथम क्रमांक आला. नाट्यवाचन करताना मला एकावेळी ठसका लागला आजोबा उठून माझ्या जवळ आले त्यांनी पटकन मला खडीसाखरेचा एक खडा दिला. मी तो खाल्ला आणि पुढचे वाचन उत्तम केले. पुणे आणि नगर दोन्हीकडे माझा क्रमांक आल्याचे बघुन आजोबांना खूप आनंद झाला होता.
मी आजोबांकडून कधीच असे ऐकले नाही की, 'मी दमलो आता.' त्यांना डायबिटीस होता. पण ते नेहमी त्यांची काळजी घेत. आई घरात नसेल तर मला आणि भावाला दूध गरम करून ते कपात ओतून द्यायचे, जेवायला वाढायचे. आम्हाला ते भरपूर गोष्टी सांगायचे. आमच्यासोबत सापशिडी खेळायचे. मी अभ्यासात कधीच हुशार नव्हते. पण माझ्यात असलेल्या कलांचे ते भरभरून कौतुक करायचे. मग मी केलेला नाच असो किंवा मी काढलेली रांगोळी. आमचे आजोबा आदरातिथ्य खूप मनापासून करायचे मग कोणी नातेवाईक,आईच्या माहेरचे कोणीही येवो ते तत्परतेने सर्वांचे स्वागत करायचे. आजोबांनी आमची नावे पण विचार करून ठेवली आहेत. धनश्री, चैतन्य तसेच माझ्या आत्येभावंडांची नावे संपदा, मंदार, ज्योती, निरंजन अशी सगळीच नावे छान आहेत. आजोबा एक हाडाचे शिक्षक होते. ते कोणताही विषय उत्तम शिकवायचे. नवीन शिक्षक शाळेत रुजू झाला तर त्यांची पण काळजी ते घ्यायचे. काय हवे नको बघायचे. आजोबांचा वाढदिवस म्हणजे एखादा सण आहे जणू असाच... दसरा आणि संक्रांत हे सण म्हणजे संध्याकाळी ५ वाजता लोक यायला सुरुवात झाली की रात्री ११ पर्यंत लोक येतच असायचे. आजोबांचा वाढदिवसाला तर ३-४ पोटी फक्त नारळ आलेले असायचे. संक्रांतीला १० किलोच्या वर तिळगुळ लागायचा. तोही लवकर संपायचा. त्यामुळे आई जास्तीचा हलवा आणूनच ठेवायची.
आजोबा आम्हाला सोडून गेले त्या दिवशी आम्ही सगळे जेजुरीला दर्शनाला गेलो होतो. मला आजही तो दिवस आठवतो आजोबा (वय वर्ष ८६) ते पूर्ण जेजुरी गड चढले होते. त्यानंतर आम्ही देवीला आणि बनेश्वरला दर्शनासाठी गेलो. आम्हाला पुण्यात काकांकडे सोडून आजोबा, बाबा, आत्या आणि काका शिरूरला परत जात होते आणि घर अगदी १० मिनिटांच्या अंतरावर असताना गाडीला अपघात झाला आणि आजोबा आम्हाला सोडून कायमचेच गेले.....
आजोबा गेल्यानंतर ही त्यांच्या नावाचे वलय आमच्या भोवती होतेच. त्यावर्षी दसऱ्याच्या दिवशी दैठणकर सर मुद्दाम आले होते. ते म्हणाले, "आज तुम्हाला सोने द्यायला आलो. इतक्या वर्षांची सवय सरांकडे सोने द्यायला यायची ती मोडणे अवघड आहे.. " आजोबा लोणावळ्याच्या एका शाळेत शिकवायला होते. तेव्हाची त्यांची एक विद्यार्थिनी एकदा शिरूरमार्गे पुढे औरंगाबाद का कुठे तरी चालली होती. वेळ रात्री साधारण११ ची घराची बेल वाजली इतक्या उशिरा कोण आले म्हणून आईबाबा बाहेर आले तोवर आजोबांनी दार उघडले होते.. समोर एक स्री आणि एक पुरुष.. अनोळखी.. तिने विचारले "येऊ का सर..?" " हो या ना" आजोबा म्हणाले. ती आत आली आजोबांच्या पाया पडली आणि म्हणाली मी तुमची विद्यार्थिनी आज इकडून जात होते बस १० मिनीटे स्टँडवर थांबणार असे कळले आणि मी तुम्हाला भेटायला माझ्या मुलाला घेऊन आले... मी हा प्रसंग प्रत्यक्ष पहिला आहे... काय बोलू मी निःशब्द होते ... आपले गुरुजन प्रत्येकालाच आदरणीय असतात हे त्याचे उत्तम उदाहरण ...
एक कविता आजोबांवर माझ्या अनुराधा मावशीने केलेली मला म्हणायला करून दिली होती..
फणसावर असतात काटे फार,
पण आत असतात गरे रसाळ,
बाबा सांगतात सदा न कदा,
आहेत रागीट त्यांचे बाबा,
आईच्या बोलण्या तर निराळेच येते,
नसतील कोणाला दादानं सारखे सासरे,
माझ्या पुढे तर प्रश्नच मोठा,
आजोबा आहेत कोणाचे बाबा,
ते कोणाचे ही असो बाबा,
माझे मात्र नक्की प्रेमळ आजोबा,
माझे मात्र नक्कीच प्रेमळ आजोबा....
तुम्हाला जाऊन २२ वर्ष होऊन गेली पण तुमची उणीव सतत भासते. तुमची मूर्ती डोळ्यांसमोर सदैव असते....
© kkdhanashree
खूप छान लिहीले आहेस.मी जवळ जवळ दर दोन वर्षांनी घोडनदी गाठायचो. माझा जिव्हाळा राजू वाईला राहिल्यावर वाढत गेला. आजोबा नुसते कर्तृत्ववान नव्हते पण गावातील विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करीत व शिक्षणाचा प्रसार त्यांनी केला.ते स्मित हास्य करायचे व घरी आले की टोपी काढून आडकवायचे व डोक्यावरून हात फिरवून खुर्चीवर बसायचे.त्यांना जेवताना घाम यायचा.
ReplyDeleteएक वेगळे व्यक्तीमत्व होते त्याचे.. अर्थातच जगाचे दादा...
खूपच छान 👌👌👌
ReplyDeleteमी स्वतः आ. वाघ सरांना सार्वजनिक ग्रंथालय चळवळीच्या निमित्ताने अनुभवले. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्वांने आम्ही 2 हात लांब रहायचा प्रयत्न करायचो. पण सरांनी ते अंतर कधीच पार केलेले होते. अतिशय शांत, निश्चयी, हसतमुख व्यक्तिमत्त्व. चळवळीतील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सोबत जाण्याचा आणि शिरूरच्या घरी जाण्याचाही योग आला. वाघ सरांच्या सर्व कुटुंबीयांचा देखील नंतर परिचय झाला. सरांच्या सुसंस्कारात वाढलेली पिढीदेखील तशीच आहे. धनश्री आणि तिच्या मातोश्री या तर माझ्या ग्रंथपालन वर्गाच्या विद्यार्थिनी. धनश्रीचे बाबा माझे चांगले मित्र आणि मार्गदर्शक देखील. धनश्रीला यानिमित्ताने खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा !
ReplyDeleteधनश्री .... शिरूरच्या आठवणी छान शब्दबद्ध केल्या आहेत... शेवाळे सर
ReplyDelete👌खुप छान
ReplyDelete