
नवीन वर्षाची सुरूवात जरा मस्त करूयात असे मनी योजिले होते पण हात दुखीने त्रस्त मी! त्यामुळे खूप काही मोठे नियोजन नाही करता आले किंवा तडीस नाही नेता आले म्हणणे योग्य. पण त्यातूनही काही तरी वेगळे म्हणून नवीन वर्षाची सुरुवात आपण सूर्योदय बघून करूयात असे वाटले. बऱ्याच जणांच्या स्टेटसला २०२१ चा शेवटचा सूर्यास्त मी पहिला. पण मला सूर्योदय बघायला मनापासून आवडते. मग पुण्यातल्या पुण्यात काय बघावे. तशा टेकड्या आहेत पुण्यात पण त्यातली कोणती तर आम्ही निवडली बाणेर हिल्स. बाणेरला एके ठिकाणी आत वळून थोडे अंतर कापलं की टेकडीची वाट सुरू होते. गाडी लावून आम्ही चढायला सुरुवात केली. चढताना वाटले छोटीच आहे. पण जस जसे वर चढत गेलो तेव्हा बऱ्यापैकी उंच आहे हे जाणवले. गर्दी म्हंटले तर होती म्हंटले तर नाही. कालचे जोरदार सेलिब्रेशन झाल्यामुळे आज पुण्याची सकाळ अर्थातच उशीर हे जातानाच जाणवत होते. काही लोक, काही कॉलेजियन्स मुले अर्थातच न्यू इयर सेलिब्रेशन करायला आली होती. नेहमीच दिसणारे दृश्य काही श्वानप्रेमी श्वानांना फिरायला घेऊन आलेली. वर चढून गेल्यावर एक ठिकाणी विस्तीर्ण जागा दिसली. तिथे जरावेळ थांबून आम्ही अजुन जरा वर चढून गेलो. छोट्या छोट्या पायवाटा तयार झालेल्या दिसल्या. तशी टेकडी बरीच मोठी आणि विस्तीर्ण आहे. टेकडीवर वृक्षारोपण केलेले आम्हाला दिसले. छोटे छोटे पाण्याचे हौद बांधलेले दिसले. व्यायामासाठी काही यंत्रे बसवलेली दिसली. आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात झालेली डेव्हलपमेंट टेकडी वरून दिसत होती. नववर्षाची सुरुवात तर छान झाली. सकाळची ताजी हवा आणि कोवळे ऊन हे आपल्याला खूप आवश्यक असते हे तर नक्कीच. साधारणपणे पाऊण तास आम्ही तिथे भटकलो. नंतर त्या टेकडीला वळसा घालून जिथून चढून वर आलो होतो तिथे पोहोचलो परत ५ मिनिट बसून सूर्य आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळला. काही उंच इमारती तर काही बंगले आमच्या दृष्टीस पडले. शांतता जाणवत होती. मन प्रसन्न झाले. आम्ही टेकडी उतरून खाली आलो. ७.१५ घरून निघालेलो आम्ही ९ वाजता घरी परत आलो होतो.
©kkdhanashree
Comments
Post a Comment