सिंहगड


 सोमवार सकाळ, मुलाच्या हिवाळी सुट्टीचे दिवस सुरू होते. अचानक ठरले चला, आत्ता सिंहगडवर जाऊयात. मग काय पटापट आवरून तासाभरात बाहेर पडलो आणि निघालो. आज सिंहगड सर करून येऊयात. आत्तापर्यंत सिंहगडावर ९ वेळा मी गेले आहे. त्यात ४ वेळा गाडीने वर पर्यंत जाऊन मग तिथून सिंहगड पाहणे तर ५ वेळा पायथ्यापासून चढत जाणे. पुण्यात दर आठवड्याला जाऊन सिंहगड चढून येणारे बरेच जण आहेत. अगदी २० मिनिटात चढणारे ही बरेच जण आहेत. एक छोटी टेकडी मग एक मोठा डोंगर आणि मग आपण पोहोचतो सिंहगडावर. आज आम्ही पहिल्यांदाच आमच्या बाईकने सिंहगडच्या दिशेने कूच केले. आत्तापर्यंत आम्ही बसने सिंहगड पायथ्याशी जाऊन सिंहगड चढला आहे. आज निमित्त होते लेकाच्या शाळेत दिलेल्या उपक्रमाचे. हिवाळी सुट्टीत एक गड चढून या असे ताईंनी सांगितले आणि आम्ही ठरवला होता वेगळा गड पण काही कारणाने तिकडे जाणे जमले नाही म्हणून झटपट जाऊ सिंहगडावर असे ठरले. अर्थात चिरंजीव सकाळी आधी नाही म्हणाले. मग त्याला समजावून नेले. साधारण आम्ही सकाळी १०  वाजून ६ मिनिटांनी चढायला सुरूवात केली. हळूहळू चढत आजूबाजूचे छान छान शेते, झाडी बघत चढत होतो. अर्थात सावकाश. माझ्या हाताच्या दुखापतीमुळे सावकाश निघालो होतो. सुरवातीचा चढ चढत असताना एक आजी म्हणाल्या मला, अगं कशाला इकडून आलात. सरळ गाडीने वर जायचेना. मी फक्त त्यांच्याकडे बघून हसले आणि निघाले. बरोबर २ वर्षांनी आम्ही सिंहगडावर जाणार होतो.  फेब्रुवारी २०२० मध्ये आम्ही सिंहगडावर गेलो होतो. अर्थात चढत. त्यानंतर एकदम आज. मस्त गुलाबी थंडी, धुक्याची झालर, आणि अशा मस्त वातावरणात आम्ही चढत होतो. गड चढायला जाण्यासाठी हे उत्तम वातावरण होते. कुठे जरा थांबत, पाणी पितपित आम्ही पहिली टेकडी, नंतर मोठा डोंगर पार केला. आता जरा चढण, लगेच एक वळसा आणि आलाच सिंहगड. चला आज लवकर जाऊयात. घड्याळ पाहून अहो म्हणाले, चला आता पावणे बाराच्या आत पोहोचायचे असे ठरवा. झाले! मी आणि लेक चला चला करून लक्ष गाठण्याच्या मागे लागलो. चढत चढत आम्ही ११.३९ ला वर पोहोचलो. तब्बल १तास आणि ३३ मिनिटात आम्ही गड सर केला. केवढा आनंद झाला की काय वर्णू तो... अहाहा ... आधी आम्हाला सिंहगडावर पोहोचायला २ तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ लागे. पण आम्ही आज लवकर चढलो होतो. आधी नेहमीप्रमाणे कठड्यावर फतकल मारून बसलो आणि उकडलेल्या शेंगांचा फडशा पाडला. भूक जाम लागली होती. कधी एकदा वर जाऊन शेंगा खातो असे आम्हाला झाले होते. शेवटच्या पायऱ्या म्हणा किंवा चढण चढताना उकडलेल्या आणि भाजलेल्या शेंगांचा घमघमाट आला होता मग पाऊले पटपट उचलली गेली आणि आलो एकदाचे गडावर. उकडलेल्या व भाजलेल्या शेंगा, काप करून ठेवलेली कैरी, अननस, पेरू, बोरे, आवळा, चिंच वाळलेली आणि कच्ची. आईग! काय सांगू वर्णन माझ्या तोंडलाच पाणी सुटते आहे😋 तर असा मस्त थोडासाच पोटोबा करुन पुणे दरवाजातून  प्रवेश करून गड बघत निघालो. आपण हे पाहू, ते पाहू असे करत करत आम्ही पुढे निघालो. घोड्याच्या पागा, दारूगोळा करण्याचे कोठार असे पाहिले. त्यानंतर मात्र आम्ही आमच्या आवडीच्या गोष्टीकडे वळलो अर्थात खाणे😋 सिंहगडावर गेल्यावर सगळे भटकतात पण त्यापेक्षा मडक्यातील दही, कांदाभजी, झुणका भाकर, वांग्याचे भरीत, मसाला ताक, कुल्फी असे बरेच पदार्थ खाऊन गड उतरतात. आम्ही काही वेगळे नाही. मडक्यातले दही, कांदा भजी, झुणकाभाकरी, वांग्याचे भरीत मस्त फर्मास बेत. विशेष म्हणजे हे मडक्यात असलेले दही याची चव वेगळीच असते म्हणजे अगदी मधुर म्हणा ना, या दह्यासोबत साखर आणि जिरेपूड इथे देतात. अहाहा लाजवाब. मनसोक्त त्यावर ताव मारला. छान झाडाच्या सावलीत चटई टाकून बसण्याची व्यवस्था इथे सर्वत्र बघायला मिळते. कुठे कुठे पारावर चटई टाकून अथवा खाली जमिनीवर चटई टाकून बसण्याची म्हणजे आसन व्यवस्था इथे उत्तम आहे सावलीत मस्त गार वारा आणि चढून आल्यामुळे झालेली दमझाक त्यामुळे हे वातावरण एकदम भन्नाट वाटते. जरावेळ भटकंती करून आम्ही गड उतरायला सुरूवात केली. आम्ही गड सावकाश उतरला. चढण्यापेक्षा थोडा जास्त वेळ आम्हाला उतरायला लागला. पण खाली आल्यावर परत गडाकडे बघताना म्हणावेसे वाटले, लवकर भेटूच पुन्हा!😊

©kkdhanashree

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद