सप्तश्रृंगी माता की जय🙏


 

आजचा ब्लॉग जरा हटके.

        नेहमी भटकंती , माझे विचार मी लिहिते, मांडते. पण यावेळी देवदर्शन 🙏 आहे. नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या वीकेंडला आम्ही नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जायचे ठरवले. एका रात्रीचा मुक्काम आणि दर्शन घेऊन परत पुणे असा बेत आखला. श्री सप्तश्रृंगी माता आमचे कुलदैवत. ही जगतजननी भक्तांना दर्शन देण्यासाठी या भूतलावर आलेली आई. हिचे भव्य दिव्यरूप डोळ्यात साठवून ठेवणे मनस्वी आवडते मला. शांत, किंचित हसरा चेहरा असा मला भासतो हिचा. मुळात तिचा चेहरा वेगळा आहे. असे वाटते की दारातून मंडपात जाताना ही आपल्याला म्हणते आहे या भक्तांनो या... आईची आठवण आली आणि तुम्ही मला भेटायला आलात मलाही आनंद झाला. आई काय वर्णू तुझा महिमा...

आम्ही आणि आमच्यासोबत श्री व सौ सराफ आणि त्यांची सुकन्या असे आम्ही एकूण ६ जण होतो. चार मोठे दोन लहान. आम्ही शनिवारी सकाळी लवकर आपापल्या गाड्या घेऊन पुणे सोडले आणि नाशिकला प्रस्थान केले. आल्हाददायक वातावरण, सूर्योदयाला वेळ होता. आम्हाला असे वाटले होते की शनिवार रविवार मुळे ट्रॅफिक कमी असेल, तसेच परिवहन मंडळाचा संप त्यामुळे S.T. बसेस पण नाहीत. पण इतक्या सकाळी ही गर्दी ही भरपूर होती. सूर्योदय होऊन दिशा फाकताना पाहणे आम्हाला खूप सुखावून गेले. आम्ही हळूहळू  मंचरच्यापुढे आलो. आमच्या गाडीला १० वर्ष झाली असल्यामुळे आम्ही सावकाश आणि गाडीची काळजी घेत घेत प्रवास करणे पसंत करतो, तसेच आम्ही त्यावेळीही करत होतो. सकाळची न्याहारी आम्ही घरूनच बनवून नेलेला असल्यामुळे आम्ही वाटेत एका ठिकाणी थांबून तिचा आस्वाद घेतला. 

एकमेकांच्या साथीने आम्ही प्रवासाचा आनंद घेत होतो. सप्तश्रृंगी गडावर थेट न जाता आजूबाजूची ठिकाणे बघत जावे असा आमचा मानस होता. म्हणून नाशिकच्या जवळ प्राचीन पांडवलेण्या आहेत, त्या बघून पुढे जाऊ असे आमचे ठरले. नाशिकच्या जवळून पुणे एस्कॉर्ट नाका नं.७ येथून वळून पाथर्डी फाटा येथून आम्ही पांडवलेण्या बघायला गेलो. हा रस्ता चांगला आहे आणि जास्त रहदारी नसलेला. अर्थात आम्ही गूगल मावशीच्या साहाय्याने तिथवर नीट पोहोचलो. तिथे गेल्यावर जरा चढून वर जावे लागते. वर चढून गेल्यावर तिथे तिकीट आहे. तिकीट काढून आम्ही डोंगरात तयार केलेल्या लेण्या बघायला गेलो. अप्रतिम शिल्पकाम असलेल्या लेण्या आहेत. उत्कृष्ट शिल्पकाम आहेच आणि त्याची काळजी तिथे व्यवस्थित घेतली जाते हे तेथील वस्तू, लेण्या पाहून समजते. ध्यान धारणा करण्यासाठी छोट्याछोट्या खोल्या वजा हॉल आहेत. तिथे असलेल्या मूर्ती आपण शांतचित्ताने पाहिल्यास आपल्याला त्या बोलत आहेत असे जाणवते. त्यांच्या चेहेऱ्यावरचे भाव कमालीचे शांत आणि अवर्णनीय आहेत. प्रत्येक मूर्ती सुंदर, आखीवरेखीव आणि बोलकी वाटते. अशा या लेण्यापाहून आम्ही नाशिकमध्ये जेवण करून पुढे वणीला निघालो. नाशिक वणी रस्तावर दिंडोरी नावाचे गाव आम्हाला लागले. येथे श्री स्वामी समर्थ  यांचे सेवा केंद्र आहे. तिथे जाऊन दर्शन घ्यावे या हेतूने आम्ही तिथे थांबलो. शांत आणि मनाला भुरळ घालणारे असे वातावरण तिथे ही अनुभवले. शांतता असणारा परिसर खरोखर स्वच्छ आणि सुंदर आहे. स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही तिथून पुढे वणीला निघालो. सप्तश्रृंगीचा घाट चढून आल्यावर आम्ही  एका ठिकाणी जरा थांबलो. येथून वणीच्या आजूबाजूचा परिसर आम्ही पहिला. वानरांची लुडबुड येथे होतीच. दोन्ही मुलांनी वानराला काकड्या खायला दिल्या. बच्चे कंपनी खुश आणि वानर ही खुश जरा वेळ तिथे थांबून आम्ही पुढे गडावर गेलो. इथे राहण्यासाठी उत्तम सोय ही भक्तनिवास मध्ये आहे. याचे बुकिंग तिथे जाऊन करावे लागते.आम्ही तिथे बुकिंगसाठी गेलो पण त्यादिवशी एका राजकीय पक्षाने सर्व भक्तनिवास बुक केलेले असल्यामुळे आम्हाला एका खाजगी हॉटेलमध्ये खोली मिळाली. खोली बरी होती. रात्र काढायची एवढेच काय ते. देवीचे सर्व कामकाज येथे दीक्षित बघतात. म्हणजे देवीचा अभिषेक, पूजाअर्चा असे सर्व काही दीक्षित बघतात. आम्ही आमचा अभिषेक व नैवेद्य आमच्या ओळखीच्या दीक्षित काकूंना सांगितला आणि आम्ही गड फिरायला निघालो. जरा भटकून आम्ही भक्तनिवसाकडे आलो. रात्रीचे जेवण आम्हाला भक्तनिवासमध्ये मिळाले. अगदी माफक दरात पोळी, भाजी,भात, वरण, शिरा असे जेवण चवदार होते. खरचं अत्यल्प दरात भक्तनिवासमध्ये खोल्या आणि जेवण चांगले मिळते. 

सकाळी लवकर आवरून गड चढून आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो. देवीची सकाळची पूजा बघण्यासारखी आणि मन तृप्त करणारी असते. साधारण सकाळी ७ ते ९ अशी ही पूजा असते तिचा अभिषेक , तिचा शृंगार, तिचे कुंकू सर्व काही इथे खूप तन्मयतेने करतात हे लक्षात येते. अखंड २ तास चालणारी पूजा बघायला भक्तगण गर्दी करतात. सकाळी ९ वाजता होणारी आरती मन प्रसन्न करते. देवीचे मनमोहक रूप डोळ्याचे पारणे फेडणारे असते. आम्ही सकाळी ७.३० पासून देवीची पूजा बघायला थांबलो होतो. तिला शेंदूर लावून तिचे डोळे, कपाळावरील कुंकू खूप अप्रतिम रेखाटतात. तिला ११वार  साडी परिधान करतात. त्यादिवशी तिला लाल रंगाची पैठणी साडी नेसवली होती. तिला मंगळसूत्र, हार , कानातील कर्णफुले, कंबरपट्टा वगैरे दागिने घालण्यात आले आणि त्यानंतर तिला फुलांचा हार, तुळशीपत्राचा हार, विड्याच्या पानांचे हार घालण्यात आला. डोक्यावर मुकुट चांदीचा होता त्यात गजरे आणि फुलांचा मुकुट खोचण्यात आला. तिच्या नाकात तिची आवडती मोराची नथ घालण्यात आली. तिचे हे मनोहारी रूप पाहून मी धन्य धन्य झाले. " श्री सप्तश्रृंगी आईचा उदो उदो, श्री सप्तश्रृंगी माता की जय" हे अगदी सहज म्हणले गेले. आरती झाली आणि आम्ही गड उतरून खाली आलो. ज्यांना गड चढून जाणे शक्य नाही अशांसाठी गडावर जाण्यासाठी येथे ट्रॉलीची व्यवस्थाही उत्तम आहे. 

खाली आल्यावर जरा खरेदी करू. म्हणून आम्ही गडावर जरा फिरलो. त्यानंतर खोली सोडायची म्हणून परत हॉटेल वर गेलो. सर्व सामान आवरून आमच्या गाड्या घेऊन आम्ही निघालो. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या डाव्या बाजूला एक रस्ता पुढे पुढे जातो. त्या रस्त्याने आम्ही पुढे आलो. एके ठिकाणी गाड्या लावून आम्ही फिरायला निघालो. गडाच्या कडेकडेने रेलिंग लावलेले दिसले. आम्ही तिथून एक फेर फटका मारला. तिथून समोरचा मार्कंडेय डोंगर बघताना, त्याच्या आजूबाजूचा परिसर बघताना निसर्गाची लयलूट आपल्याला दिसते. पुढे एका ठिकाणी छोटा झरा वाहत होता. पुढे त्याचा छोटा धबधबा तयार झाला होता. हा लांबून बघताना वाटत होते किती छान धबधबा आहे पण जसजसे जवळ गेलो तसे त्याचे पाणी वाऱ्याच्या वाहण्याने उलटे येताना दिसले. उन्हामध्ये चमकणारे त्याचे थेंब अंगावर झेलताना क्षणभर तारे आपल्याकडे येत आहेत असे वाटले. जरा फिरून ही दीक्षित काकूंकडे जेवायला गेलो. पुरणपोळीचे जेवण करून त्यानंतर आम्ही निघालो. येताना थेट पुणे गाठायचे त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये न शिरता नाशिक बाहेरून जाणाऱ्या रोडने डायरेक्ट पुणे रस्त्याला लागलो. रस्ता चांगला आहे. त्यामुळे कुठे न थांबता आम्ही निघालो. लवकर पुण्यात पोहोचू असा आमचा मानस होता. त्यामुळे आम्ही घाई न करता पण कुठेही न थांबता पुढे पुढे जात होतो. संध्याकाळी साधारण ६ च्या सुमारास आम्ही आळेफाट्याच्या अलीकडे अपूर्व कामत हे रेस्टॉरंट आहे तिथे थांबलो. ३ वर्षांपूर्वी आम्ही वणीला जाताना व येताना इथे थांबलो होतो. एक गोष्ट जाणवली इथली फूड क्वालिटी अजूनही चांगली ठेवली आहे. आम्हाला हे ठिकाण आवडते. इथे थोडे खाणे झाले आणि आम्ही एका पाठोपाठ एक असे पुण्याकडे कूच केले. नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण इथे प्रचंड ट्रॅफिक लागले आमचा बराचसा वेळ यातच गेला. अर्थात पुण्यात शिराल्यावरही परिस्थिती काही वेगळी नव्हती. अस आम्ही मजलदरमजल करीत अर्थात खूप ट्रॅफिक लागल्यामुळे रात्री उशिरा पुण्यात पोहोचलो.२ दिवसाच्या प्रवासाचा थकवा जाणवला नाही पण ट्रॅफिक मुळे वैताग नक्कीच आला. हे देवदर्शन आणि पांडवलेणी आमच्या स्मरणात सदैव राहतील. या  दोन दिवसात आम्ही एक गोष्ट आठवणीने केली ती म्हणजे पाणी आम्ही आमच्या सोबत नेले होते कुठेही आम्ही बिसलेरी विकत घेतली नाही. १०-१२ पाण्याच्या बाटल्या आणि एक मोठी कूलकेज. पर्यावरणाचा विचार करून ही गोष्ट प्रत्येकाने करावी ही नम्र विनंती.

                                  🙏श्री सप्तश्रृंगी माता की जय🙏 

 

  ©kkdhanashree 

Comments

  1. खूपच छान लिहिला आहे लेख. दोन दिवस कसे गेले कळले नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद