माझे (टी. पी.) निरीक्षण


 घरात माझी आवडती जागा म्हणजे हॉलची खिडकी😀 मी कितीही वेळ इथे बसू शकते. सोसायटीची आतील बाजू आमच्या हॉलमधून दिसते. इथून मला बऱ्याच गोष्टी दिसतात. खेळाचे पटांगण, भरपूर झाडे, क्लब हाऊसचा परिसर वगैरे वगैरे. मी रोज सकाळी उठून ५ मिनिट तरी या खिडकीतून गंमत बघत बसते. शांत वातावरण, सुर्योदय , पक्ष्यांचे मधुर आवाज, त्यांचा किलबिलाट बरेच वेळा मला इथूनच 'भारतद्वाज'  पक्षाचे दर्शन घडते 😊 तो दिवस माझ्यासाठी आनंदाची परवणीच असतो. सकाळची काहींची फिरायला जाण्याची गडबड, गाड्या साफ करणारे, दुधवाले, पेपरवाले यांची धावपळ, कोणाकडचे कूकरच्या शिट्टीचे आवाज, तर कोणाची स्वयंपाकाची लगबग, सकाळी फिरून आलेले काही जण, कोणाची ऑफिसला जायची गडबड, तर कोणी लहान मुलांना चक्कर मारायला घेऊन आलेले, कोणाला पोहायला म्हणजे स्विमिंग हो जायची गडबड आणि रोज न चुकता दिसणारे दृश्य म्हणजे काही जण आपापल्या डॉगीला फिरायला आणतात🐶 ती गंमत तर निराळीच असते. कुत्र्यांच्या मूडप्रमाणे फिरायचे. त्याला हवे तिथे जायचे. कधी सावकाश चालायचे तर कधी त्यांच्या वेगाने धावायचे. कधी कधी समोरच्या दोन बिल्डिंगमधले दोन कुत्रे एकमेकांकडे बघून भुंकत असतात. मला वाटते की 'ते दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात'. सूर्योदय इथून बघणे आवडते मला. तसेच चंद्रदर्शनही इथूनच होते मला, त्यामुळे कोजागिरी आणि भाऊबीज छान साजरी होते. अशा नानाविध गोष्टी रोजच मला या खिडकीतून दिसतात. एक गोष्ट मला समाधान देते ती म्हणजे समोरच्या बिल्डिंगमध्ये ६ व्या मजल्यावरच्या गॅलरीमध्ये रोज पोपट येतात आणि तिथे राहणारे गृहस्थ त्यांना रोज दाणे खाऊ घालतात. हे बघून मला मनस्वी आनंद होतो.

सध्या माझा हात गळ्यात असल्यामुळे( उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे😀) मला काम काहीच करता येत नाही. आज दुखण्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी सकाळपासून माझ्या या आवडीच्या ठिकाणी बसले होते. चला जरा हातकडे दुर्लक्ष करूयात आणि वेगळीकडे मन गुंतवूयात. दर आठवड्याला आमच्या सोसायटीमध्ये एक भाजीवाला येतो. आज तो ८ वाजता आला. सकाळी लवकर आला की सगळी भाजी व्यवस्थित लावून फळे नीट रचून तयार असतात. खरे तर तो आल्यापासून भाजी नीट लावून होईपर्यंत लोकांना धीर नसतो. कधी एकदा तो येतो आणि आम्ही भाजी घेतो, असे होते. कदाचित त्यांना कामाची गडबड असेल. त्याची भाजी पूर्ण लावून व्ह्यायाच्या आत लोक भाजी घ्यायला सुरूवात करतात. तो पण मग लवकर काम करून आपल्या जागी जाऊन बसतो आणि भाजीचे वजन करायला सुरुवात करतो. आज तो आला. त्याचे काम, भाजी घ्यायला आलेले लोक हे सगळे बघून मी त्याबद्दल बोलत होते त्यावर आज मी 'थेट प्रक्षेपण' करते आहे असे माझ्या नवऱ्याला वाटले. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत येणारी माणसे. मी आज सगळ्यांचे निरीक्षण करत होते. कोणी भरकन आले भाजी घेतली आणि निघून गेले. कोणी सावकाश आले भाजी निवडून निवडून घेतली. कोणी फक्त कांदे बटाटे घेतले तर कोणी फक्त पालेभाजी तर कोणी फक्त फळं. 'व्यक्ती तितक्या प्रकृती'. एक काकूंनी सगळ्या पपया बघितल्या मग त्यातली एक घेतली तर एक काका आले समोरची पपई उचलून पहिली त्यांना ती ओके वाटली त्यांनी ती घेतली आणि निघून गेले. एक काकू आल्या, आधी टोपली वजन करायच्या रांगेत ठेवली आणि मग भाजी घेऊन आल्या. वेळ नको जायला म्हणून असेल कदाचित. एक गृहस्थ आले, त्यांनी पिशव्या एका ठिकाणी ठेवल्या. हळू हळू सगळी भाजी निवडून टोपलीत ठेवली. टोपली भाजीवाल्याकडे देऊन 'फळं अजून आली की येतो' असे सांगून निघून गेले. ते थेट तासाभराने आले फळं नीट बघून घेतली, भाजी व फळांचे वजन केले पैसे दिले आणि निघून गेले. एक छोटी मुलगी तिच्या वडिलांसोबत भाजी घ्यायला आली होती. तिचे बाबा भाजी घेत होते ही छोटी मुलगी तिला हवे ते फळ उचलून टोपली टाकत होती. तिच्या वडिलांना समजले की ते तिला फळं परत नेऊन ठेवायला सांगत होते. ही तिची गंमत ४-५ वेळा तरी झाली. मग तिला तिची मैत्रीण भेटली मग त्यांचे तिथे खेळणे सुरू झाले. ९ ते १२.३० ते असे साडेतीन तास भाजी विक्री सुरू होती. या संपूर्ण वेळेत मी खिडकीपाशी नव्हते पण जेवढा वेळ होते त्या वेळात या सगळ्या गमतीजमती मी पहिल्या 🤓. रोज कामाच्या गडबडीत मला एवढा वेळ मिळत नाही पण आज बराच वेळ मी इथेच होते. सर्वात शेवटी एक काकू आल्या त्यांनी पटपट भाजी घेतली पैसे दिले आणि निघून गेल्या. त्या नंतर भाजीवाल्याने सर्व भाजी आवरायला सुरूवात केली. क्रेटमध्ये नीट भाजी भरली. फळे नीट ठेवली. सर्व कचरा केर काढून स्वच्छ केला. टेम्पोमध्ये सर्व माल भरला आणि पुढच्या ठिकाणी भाजी विकायला तो निघून गेला. थोडा वेळ तिथे कोणीच नव्हते साधारण १.३० च्या सुमारास २-३ ड्रायव्हर डबे खाण्यासाठी तिथे येतात तसे ते आजही आले. रोजच ते एकत्र बसून डबे खातात, गप्पा मारतात. डबा खाऊन झाला की आपापल्या कामाला निघून जातात. आजही ते आले. रोजच्या प्रमाणे एकमेकांच्या डब्यांची देवाण घेवाण झाली. गप्पा झाल्या, जेवणं झाली आणि ते आपापल्या वाटेने आले तसे निघून गेले. 3 वाजता सोसायटीच्या साफसफाईच्या मावशी आल्या. त्यांनी व्यवस्थित सगळे झाडले, स्वच्छ केले आणि साधारण अर्ध्या तासाने त्या निघून गेल्या. मग नंतर बराच वेळ तिथेच कोणीच नव्हते. नाही म्हणजे तिथून येणारे जाणारे असतात पण ते येतात अन् जातात तिथे थांबणारे कोणीच नसते. संध्याकाळी मुले खेळायला आली. कधी ८ वाजेपर्यंत ते खेळतात तर कधी ९ पर्यंत. आज ते ८.३० पर्यंत खेळ खेळून निघून गेले. असा हा दिवस कधी उगवला आणि कधी मावळला मलाच समजले नाही. एक दिवसाचे निरीक्षण मला बरेच काही शिकवून गेले. खरचं या गोष्टी अशाच घडत असतात पण आपण त्याकडे कसे बघतो त्यावर आपला आनंद अवलंबून असतो असे मला वाटते
© kkdhanashree

Comments

  1. होय, आपण जसे बघतो त्यावर आपला आनंद अवलंबून असतो. छान दिवसभराचे निरीक्षण टिपले आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद