भटकंती


 भटकंती हा विषय सर्वांच्याच आवडीचा असतो आणि अशा या भटकंती मध्ये जर जर अनपेक्षित काही समोर आले तर....😳😊


नमस्कार 🙏 
माझा नवीन ब्लॉग. 
भटकंती सगळ्यांना आवडणारी गोष्ट. मग ती कुठेही असो. फिरायला जायचे म्हंटले की सगळे एका पायावर तयार. गेले दीड दोन वर्ष कोरोना मुळे कुठेच जाता आले नाही. जशी सुट्टीची चाहूल लागली तसे पटपट नियोजन झाले. कोकण आवडीचे ठिकाण🌊 पण जास्त लांब नको म्हणून दापोलीच्या आसपास जायचे ठरले. ३ दिवसांचा दौरा. अगदी ठरल्याप्रमाणे आम्ही तिघे आणि आमचा भाचा असे आम्ही चौघे सकाळी लवकर निघालो. ताम्हिणी मार्गे जायला आम्हाला आवडते. कारण कोकणात जायला सोयीचा मार्ग. पण यावेळी मात्र काही ठिकाणच्या रस्त्याने निराशा केली. दुपारपर्यंत आम्ही लाडघरला पोहोचलो. फ्रेश होऊन गरम गरम जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला. साधेच पण रुचकर असे कोकणातले जेवण म्हणजे नारळाचा पुरेपूर केलेला उपयोग असेच🥥 कोकण म्हणजे शांत आणि निवांत असे ठिकाण. संध्याकाळचा सूर्यास्त आणि समुद्र एकत्र पाहण्याचा आनंदच वेगळा. यावेळी कोकणात गर्दी भरपूर पाहायला मिळाली. समुद्रात खेळताना, ॲडवेंचर गेम्स खेळताना बरेच जण दिसले. घोडागाडी, उंटाची फेरी आणि बरेच काही. वृद्धांपासून ते बालचमु पर्यंत सगळेच मनसोक्त आनंद घेत होते. कोकणात सकाळ लवकर होते तर संध्याकाळ ही लवकर होते. साधारण पहाटेच कोकण जागे होते तर संध्याकाळी ७ नंतर सगळं शांत झालेले असते. कोकण समुद्र किनारी सकाळी लवकर असणारी 🐬 डॉल्फिन राईड आज काल कोकणात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. ही याआधीही आम्ही बघितली आहे. पण यावेळेसचा अनुभव काही वेगळाच होता. त्या लहानशा बोटीत आम्ही २०-२५ जण होतो. समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या बऱ्याच बोटी दिसत होत्या, शांतपणे तरंगणाऱ्या.सूर्योदय झालेला होता. त्या सूर्याच्या प्रकाशात चमकणारे समुद्राचे पाणी जणू काही हिरे चमकत आहेत असेच दिसत होते. समुद्राच्या पाण्यावर तरंगणारी आमची बोट क्षणभर वर तर पुढच्याच क्षणी खाली होत होती. या आल्हाददायक वातावरणात काहीच्या गप्पा सुरू होत्या...कोणी म्हणे डॉल्फिन उंच उडी मारतात. तर कोणी म्हणे बोलू नका ते लांब जातात....  बराच वेळ डॉल्फिन दिसलेच नाहीत. सगळे शोधत होते. पण ते कुठे दिसेच ना. पण अचानक.... आम्हाला बरेच डॉल्फिन बघायला मिळाले. जवळ आणि लांबचे पण डॉल्फिन अचानक दिसायला लागले. इतकेच काय त्यांची मस्ती पण आम्ही पाहिली. एक दोनदा त्यांनी मारलेली उलटी उडी पाहायला मिळाली.🐬 त्यांची एकसारखी हालचाल आणि एकदा दिसले की गायब होतात त्यांना शोधताना येणारी मज्जा काही वेगळीच. अरे इथेच तर होते म्हणे पर्यंत हे गायब. 📷कॅमेरा मध्ये त्यांचा फोटो काढणे यासाठी ज्याची त्याची चाललेली दमछाक दिसत होती. पण ते काही हाती लागत नव्हते. जवळजवळ तासभर चालणाऱ्या या फेरीने सकाळ कशी उत्साही झाली. मग आम्ही हॉटेलवर परतलो.त्यानंतर आम्ही न्याहारी करून पन्हाळकेजी या लेण्या पाहण्यासाठी निघालो. बऱ्याच शतकांपूर्वी या लेण्या एकाच कातळात कोरलेल्या, शिल्पकलेच्या उत्तम उदाहरण आहेत. गणपती, शंकर, लक्ष्मी, शिल्पकामाची चित्रे आणि बरेच काही येथे कोरलेले आम्हाला पाहायला मिळाले. अर्थात आम्ही आधी चौकशी केली बुरोंडी मार्गे जाता येते, म्हणून निघालो. पण दापोली मार्गे तिथे जाणे योग्य. दापोली दाभोळ रस्त्याला एके ठिकाणी आत वळून थोडे आत जावे लागते. अर्थात रस्ता म्हणावा तितका चांगला नाही पण त्या लेण्या बघण्यासाठी 'इतना तो चलता है'. गणपतीचे दर्शन घेऊन बाजूलाच असलेली नदी, शांत प्रवाह आणि तिचा स्वच्छ दिसणारा तळ. आम्हाला खुणवत होता. नदीचे गोड पाणी पिऊन आम्ही पुढे दाभोळकडे निघालो. दाभोळ जवळ एक कमान दिसली " स्वयंभू चंडिका देवी मंदिर"  🙏हे सर्व आम्ही गूगल मॅपच्या साहाय्याने शोधले होते आणि direction लावूनच आम्ही ही ठिकाणे बघितली. (अर्थात कोकणात bsnl आणि जिओ हे दोनच नेटवर्क उत्तम कार्यरत आहेत). ही चंडिका देवी एक गुहेत प्रकट झाली आहे. मंदिरात सभा मंडप मोठा आहे. देवीच्या गाभाऱ्याकडे जाताना देवीचा मनमोहक असा फोटो वर लावलेला दिसला. क्षणभर मला तर ती सप्तशृंगीदेवीच वाटली. एकदम थंडगार आणि शांत वातावरण गाभाऱ्यात होते. काही पायऱ्या उतरून खाली गाभाऱ्यात जावे लागते. आम्हाला आवडलेली गोष्ट म्हणजे देवीचे दर्शन घेण्यासाठी जाताना चक्क पणत्या लावलेल्या होत्या. कोणत्याही वीज उपकरणांचा येथे वापर नव्हता. शांत तेवण्याऱ्या या पणत्यांच्या ज्योती मध्ये देवीचे विलोभनीय रूप मनाला प्रसन्न करणारे. या स्वयंभू देवीच्या दर्शनाने मन तृप्त झाले. काहीच गर्दी नसल्यामुळे देवीचे दर्शन छान झाले. आजूबाजूचा परिसर पाहून आम्ही पुढे निघालो.
क्रमशः
©kkdhanashree

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद