मनाला वेड लावणारा रोहिडा

 



निसर्गाची मनसोक्त उधळण, मनाला थंडावा देणारा थंड गार वारा, उन सावलीचा चाललेला मन मानेल तसे खेळ.... आणि या प्रसन्न वातावरणात स्वतःचे अस्तित्व टिकवून मानाने उभा असणारा 'रोहिडा म्हणजेच विचित्रगड'. कोरोना चे अस्तित्व कमी होते आहे असे पाहून आम्ही रविवारी रोहिडा बघण्याचा कार्यक्रम आखला.. ३-४ जणांना विचारले पण काही कारणामुळे त्यांना जमले नाही मग नेहमीचे आम्ही तिघे. मी,अहो आणि लेक निघालो सकाळी ५.३०  वाजता किल्ले रोहिडा सर करायला. पाऊस येतो का काय? असेच वातावरण होते. भाटघर धरणातून होणारा विसर्ग बरेच काही निसर्गाचे वर्णन सांगत होता. पुढे भोर मार्गे बाजारवाडी गावात पोहोचलो. बाजारवडी हे रोहिड्याच्या पायथ्याशी वसलेले गाव. तिथे आम्हाला अंकुश वाघ(धायकुले) यांच्याकडे न्याहारी मिळाली 'पोहे '. गरम गरम पोहे, ते खाऊन आम्ही गड चढायला सुरूवात केली. कधी ऊन तर कधी सावली... अशा या उत्स्फुत खेळत आम्ही गड चढत होतो...साधारणपणे १ तास आणि थोडा वर असा वेळ आम्हाला अर्थात माझ्या चालीने चढायला लागला. वर गेलो प्रवेशद्वार अर्थातच स्वागताला सज्ज होते. आत जाऊन उजव्या बाजूला असणाऱ्या बुरुजावर मी ठाण मांडून बसले आता जरा वेळ थांबा इथेच म्हणून. पण खर सांगू थंडगार वारा मनाला खूप सुखावत होता. आजूबाजूचे शांत वातावरण आणि त्यात फक्त अधे मध्ये ऐकू येणारे मोरांचे आवाज... अहाहा काय सांगू मी कुठल्या कुठे पोहोचले होते ... बास बाकी काही नको. हे वातावरण मनाला वेड लावणारं होते. मग जरा फिरुया म्हणून मंदिर कडे गेलो. मंदिर बंद होते पण बाजूला असणारे तळे खुणावत होते. थंडगार पाणी चेहेऱ्यावर मारून आम्ही गड बघायला निघालो. पाय वाट संपवून आम्ही चुकून म्हणा किंवा गडबडीने गुरांच्या वाटेने पुढे निघालो. ५ फूट गवत तर कुठे कुठे त्यापेक्षा जास्त उंचीचे गवत यातून वाट काढताना आधी मज्जा वाटली पण नंतर भीतीही वाटली. ४-५ बुरुज पाहून आम्ही पूर्ण गडाला प्रदक्षिणा घातली. हे करताना सुंदर सुंदर फुले पहिली. खरे सांगू कास पठारावरची फुले मी पहिली आहेत पण त्या पेक्षा सुंदर सुंदर फुले मी गड, किल्ले यांवर पहिली आहेत. निसर्गाचा वरदहस्त असणारे भोर आणि त्याच्या जवळचे सगळे किल्ले. अप्रतिम निसर्ग आहे... कोणीही प्रेमात पडेल असेच. माझ्या लेकाला जर विचारले की भटकंती करायला कुठे जायचे? तर तो अर्थातच एखाद्या गडाचे नाव घेईल. गड पाहून आम्ही गड उतरायला लागलो तर खालून वर येणाऱ्यांची रंग लागायला सुरूवात झाली होती. गड, किल्ले चढायचे तर ते सकाळी लवकर . ऊन डोक्यावर आले की त्रास जास्त होते पाणी पाणी, चक्कर हे नेहमीचेच... असो तर गड पाहून आम्ही खाली आलो तर अंकुश वाघ यांच्या कडे जेवणासाठी आम्ही सांगून गेलो होतो. परत त्यांच्या कडे गेलो तर त्यांच्या वडिलांनी छान स्वागत केले. त्यांच्या आईने चुलीवर केलेला स्वयंपाक काय सांगू त्याचे वर्णन.. व्वा एकदम झाक. गरम गरम चुलीवरच्या भाकरी, वावरातून तोडून आणून लगेच केलेली भेंडीची ताजी भाजी, मिरची आणि शेंगदाणे यांची चटणी, त्यांच्याच शेतातल्या तांदळाचा भात. यापुढे सगळेच फिके. त्यांची आई माझ्या लेकाला अगदी आजीच्या मायेने काय हवे नको हे आनंदाने पाहत होती आणि तो ही आजी भाकरी मस्त झाली आहे असे सांगत होता. चवदार आणि स्वादिष्ट असे जेवण जेवून आम्ही अन्नदाता सुखी भव असे मनापासून म्हणून पुण्याकडे येण्यासाठी निघालो...
'छत्रपती शिवाजीमहाराज की जय'!

©kkdhanashree

Comments

  1. तुझ्या निमित्ताने वाचून तिकडे जाऊन आल्या सारखं वाटय.. खूप मस्त👌❤️

    ReplyDelete
  2. खूप छान .तुझे लेखन म्हणजे वाचताना स्वतः घेतलेला अनुभव वाटतो.

    ReplyDelete
  3. नेहमी सारखच उत्तम लिखाण 👌🏼👌🏼👌🏼

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद