आमची दक्षिण भारताची सहल भाग २

 संपूर्ण रात्रीचा प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मदुराईला पोहोचलो. स्टेशन जवळच एक उत्तम धर्मशाळा आम्हाला मिळाली. आम्ही तिथे जाऊन पटपट आवरून, न्याहारी करून पुढे कोडाई कॅनालला जायला निघालो. साधारण 3-4 तासाचा रस्ता आणि बराचसा घाटाचा. वळणं वळणं घेत आम्ही 17 सीटर गाडीने पुढे जात होती. आजू बाजूला सर्वत्र हिरवळ आणि शांत वातावरण अहाहा! उन्हाचा थोडा सुध्दा त्रास आम्हाला जाणवला नाही. मग कोडाई आले. सुरुवाती पासूनच वेगवेगळी हॉटेल्स दिसायला सुरू वाट झाली काही रस्त्याच्या शेजारी तर काही उंच डोंगरांवर. मला तर मुंबईला जाताना खंडाळा दिसतो तसेच काहीसे वाटले. हवेतला गारवा मनालही सुखावत होता. तिथले १-२ पॉइंट बघून आम्ही जेवणासाठी हॉटेल मध्ये गेलो अर्थातच पोळी नाही. पण पाहिजे तेवढा भात मिळाला किंवा फक्त भातचं मिळाला 😀 जेवण झाले मग एक जवळच मार्केट मध्ये फेरफटका मारायला आम्ही गेलो. तिथे भरपूर फळांची दुकाने होती. माझा एक मामा मला म्हणाला चल जरा आणि एका फळाच्या दुकानापाशी घेऊन गेला. तिथे फळवाल्याला १०-२० रुपये देऊन म्हणाला या पैशात जेवढी फळे येतील ती दे. त्याने आम्हाला ७-८ फळे दिली. आम्ही दोघांनी तिथे उभे राहून ती आवडीने खाल्ली. खरच फळे मधुर होती आणि चवीला उत्तम. भात खाऊन जरा वैतागले होतो आम्ही पण फळे खाऊन छान वाटले. मग आम्ही बोटींग करायला गेलो तिथून पुढे ३-४ पॉइंट बघून परत मधूराईला जायला निघालो.

दुसऱ्या दिवशी आम्ही मदुराई फिरलो. सकाळी आम्ही मदुराईच्या देवीचे दर्शन घेतले. देवीची मूर्ती अतिशय प्रसन्न आणि बोलकी आहे. मंदिर परिसर मोठा आणि प्रशस्त आहे. तिथे एक गोष्ट नवीन कळले एक पार्वती देवीची उंच अशी मूर्ती आहे. त्या मूर्तीवर सर्वजण लोण्याचे गोळे फेकत होते. हा काय प्रकार आहे आम्हाला समजेना. तिथे चौकशी केली तेव्हा समजले की पार्वती देवी इथे चिडून बसली आहे. तिला शांत करायचे आहे म्हणून लोणी तिला लावायचे म्हणजे मग ती शांत होणार. १० रुपयांना छोटे ४-५ लोण्याचे गोळे विकायला १-२ माणसे होते त्यांच्या कडून विकत घेऊन तिला लोणी लावायचे पण मूर्ती उंच असल्यामुळे फेकून मारायचे. वेगवेगळ्या प्रदेशात काय काय पद्धती असतात हे तिथे गेल्यावरच समजते जेव्हा आपण तिथली संस्कृती समजून घेऊ. तिथून आम्ही जरा भटकंती केली. मग जेवणासाठी एका हॉटेल मध्ये गेलो. तिथे जेवण चांगले होते. अर्थात दक्षिणेकडील जेवणात स्वादिष्ट तर असते पण सर्व समावेशक ही असते. त्या हॉटेल मधून बाहेर पडण्याआधी आम्ही बिल देण्यासाठी काउंटर वर गेलो तेव्हा तिथे हळदी कुंकू ठेवलेले दिसले. जरा उत्सुकता म्हणून त्या काउंटरवर बसलेल्या माणसाला विचारले तर त्याने सांगितले की ज्या स्त्रिया इथे जेवायला येतात त्या परत जाताना हे हळदी कुंकू लावतात अशी इथे पद्धत आहे. आपल्याकडे कोणी स्त्री आपल्या कडे आली तर ती परत जाताना आपण तिला हळदीकुंकू लावून, साखर देतो. तसेच काहीसे तिथेही असल्याचे समजले. तिथून मी माझ्या मामा आणि मामी सोबत मदुराई विद्यापीठात गेले होते. मामीचे काही काम होते. विद्यापीठाचा परिसर खूप मोठा आहे आणि स्वच्छ आहे. मला तो भाग आवडला. तिथून परत आल्यावर आम्ही सगळे खरेदीसाठी गेलो. काही छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन रात्री सगळे गप्पा मारत एक एक गंमत जम्मत सांगत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही रामेश्वरला जायला निघालो. रामेश्वर काय आहे बरं? तिथे अरे हो! रामाने इथूनच तर सेतू बांधला होता लंकेत जाण्यासाठी. 4 तासाच्या प्रवास करून आम्ही तिथे पोहोचलो. रामेश्वरच्या आधी नवीन पुलावरून जाताना आम्ही रेल्वेचा पूल बघायला थांबलो एक रेल्वे त्यावरून जात होती. तो पूल रेल्वे आणि जहाजांची ये जा यादोन्ही गोष्टी उत्तम रित्या पूर्ण करताना दिसतो रेल्वे आली की रेल्वेसाठी जुळून थांबवला जातो तर जहाज आले की पुलाचे व्यवस्थित 2 भाग होतात ज्यामुळे जहाज न्यायला सोपे जाते. एका किनाऱ्या पासून दुसऱ्या किनाऱ्या पर्यंत बांधलेले दोन्ही पूल उत्तम आहेत. दोन्ही बाजूला अथांग सागर आणि 2 किनारे जोडायला बांधलेले पूल हे बघताना खूप प्रसन्न वाटते. खरच एखादी गोष्टी दुसऱ्या किनाऱ्यावर असेल आणि आपल्याला तिथे पोहोचायचे असेल तर मनाने असा पूल बांधला क्षणार्धात आपण पोहोचू😀 मग पुढे आम्ही रामेश्वर मंदिरात गेलो. रामेश्वराच्या मनोभावे दर्शन घेतले. रामेश्वर ला प्रदक्षिणा घालताना लागणारी छोटी छोटी कुंड आहेत. आपण पैसे दिले तर तिथली माणसे त्या कुंडातील पाणी काढून आपल्या डोक्यावर ओततात. असे म्हणतात ते पाणी पवित्र आहे. आम्हीही सगळ्यांनी त्या पाण्यात स्नान केले. त्यानंतर तिथली एक दोन ठिकाणे बघून आम्ही मदुराई ला परत जायला निघालो. संध्याकाळी आम्ही मदुराई ला परत आलो. लगेचच समान आवरून आम्ही जेवण करून लगेचच कन्याकुमारीला जायला निघालो. पहाटे ३.३० ला आम्ही कन्याकुमारीला पोहोचलो. तिथे विवेकानंद आश्रमात आमची राहण्याची सोय झाली. जरा वेळ विश्रांती घेऊन ५ वाजता सूर्योदय बघण्यासाठी सगळे समुद्र किनारी गेलो. सगळी कडे निरव शांतता आणि अंधार होता. हळू हळू पूर्व दिशेला फाटू लागले. खरचंच रात्र संपून दिवस उजाडेल सुरूवात होते हे काय असते हे मी स्वतः अनुभवले आहे. अलगद होत जाणार उजेड सूर्यनारायणाचे दर्शन घेणे म्हणजे काय हे त्या दिवशी पाहिले अनुभवले. पक्ष्यांची किलबिल दिवस उजडण्याची ग्वाही देत होता. क्षणाक्षणाला वर येणार सूर्य अंधार दूर लोटून आपल्याला उजेडाकडे नेत होता आणि मी देहभान विसरून त्याच्या कडे टक लावून बघत होते कित्येक वेळ....... हा अनुभव आयुष्याचा महत्वाचा ठेवा आहे माझ्या. जो मी सतत माझ्या मध्ये जपून ठेवते आहे.
क्रमशः

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद