अन्नपूर्णा
चैत्र महिना सुरुवात. गुढीपाडवा झाला आणि काल चैत्रगौरीचे आगमन झाले. आता खरी उन्हाळ्याला सुरूवात झाली म्हणता येईल. मस्त कैरीचे आंबटगोड पदार्थ, आंब्याचा रस, श्रीखंड, थंडगार सरबत, पन्हे, अहाहा!काल कैरीची डाळ आणि खीर याचा नैवेद्य झाला. कोकिळेच्या कुजन आता जोरदार सुरू झालेले जाणवते. काळानुरूप गोष्टी बदलत गेल्यात हे नक्की.
चैत्र महिना आला की सगळ्या गोष्टी जोमाने सुरू व्हायच्या. वर्षभराचे पापड, कुरडई, सांडगे,शेवया अशी वर्षभराची साठवण म्हणजे उन्हाळी कामांना सुरुवात. लहानपणी आई, आजी यांना ही कामे करताना पाहिले आहे. गव्हाचा चिक, पापडाची लाटी खाल्ली आहे. घरातल्या सर्व स्त्रिया एकत्रित जमल्या की ही कामे जोमाने होत. ठरवून आज हे उद्या ते असे असायचे. चैत्र गौरीच्या निमित्ताने माहेरवाशीण घरी आल्याने घर गजबजून जायचे. हळदीकुंकू हे मात्र ठरलेलेच. त्यातून जर २-३ जणींनी एकत्र केले तर ती मज्जा वेगळीच. मी लहानपणी अनुभवली आहे ती मज्जा. कैरीची झणझणीत डाळ आणि पन्हे. आता फारसे कोणी हे सगळे करायला उत्सुक नसते. त्यातून गेल्या वर्षी आणि यावर्षी कोरोनाचे सावट. मग तर नकोच.पण आपली संस्कृती आपल्याला काही ना काही शिकवत असते. घरीची लक्ष्मी म्हणजे अन्नपूर्णा हीचे दर्शन यातून होत असते. आताही लोणची, पापड, कुरडया होत असतात. पण त्याला पूर्वीची सर राहिली नाही. आता प्रत्येक जण आपल्या सवडीने आणि आवडीने लागेल तितकेच करत असते.
अर्थात या लॉकडाउन ने आपल्यातील अन्नपूर्णा उत्तमरीत्या जागी झाली आहे हे नक्की. त्यामुळे जे जे काळानुरूप मागे पडले होते ते ते आता परंपरे नुसार एकटीने का होईना प्रत्येक घरात होताना दिसते आहे. हे अगदी नक्की
©kkdhanashree
©kkdhanashree
छान लेखन
ReplyDeleteखूपच छान. आपल्या पारंपारिक गोष्टी निसर्ग आणि आपल्या शरीर मनाचं संतुलन राखण्यात. आनंदाने हे सगळं साजरं करून पुढच्या पिढीकडे हा ठेवा सोपवला पाहिजे.
ReplyDelete