Children's Friendly Society


       Children's Friendly Society

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून जेमतेम आठवडाच झाला होता. सुट्टी लागल्यामुळे सुट्टीत बाहेर कुठे जायचे याचे प्लॅनिंग सगळ्या घराघरांतून सुरू होते. आज सकाळ पासूनच मुले खेळण्यात दंग होती. लपंडाव खेळत होती. आलोक, अमेय, सई, स्निग्धा, कौशिक, विराज,स्वप्ना सगळे लपले होते, राज्य मीनलवर होते. मीनलने सगळ्यांना शोधले पण एकटा विराज सापडायचा राहिला होता. काही वेळात विराज ही सापडला. मी पेपर वाचत होते. मुलांच्या मोठ्या आवाजावरून समजले की राज्य कोणावर यावरून गोंधळ सुरू आहे. इतक्यात कोणाचा तरी मोठ्याने बोलण्याचा आवाज कानी पडला. मुलांचा आवाज एकदम बंद झाला. क्षणभर अंदाज घेऊन दार उघडून मी बाहेर आले. तर शेजारचे दंडवते आजोबा मुलांना रागवत होते. "तुमच्या आवाजामुळे माझी झोप मोडते" मला बघून आजोबा मला सांगू लागले, "हे असे ओरडतात, मोठ्याने बोलतात, भांडतात, आता हे सहन नाही होत, छातीत धडधड होते, वयोमानानुसार गोष्टी सहन होत नाहीत आता. आता तर यांना सुट्टी लागली आहे आता हे रोज असे खेळणार, आरडाओरडा, गोंधळ नुसता."  हे सगळे ऐकून मी गप्पच झाले. कोणाला आणि काय बोलू. कळेचना. मुले तर खेळणार, पण काकांचेही बरोबर आहे. मध्य काय काढावा. मी काकांना सांगितले मी मुलांशी बोलते. मुलांना घरात बोलावले. मुलेही नाराज झाली होती. त्यांनाही माझ्याशी बोलायची होते.  मुलांशी चर्चा करुयात असे मनाशी ठरवून मी मुलांना विचारले, "सांगा रे काय करूयात?" मुले एका सुरात म्हणाली "काकू आम्हाला खेळायचे आहे. आजोबा नेहमीच ओरडतात आम्हाला  सकाळ असू द्या , दुपार, किंवा संध्याकाळ, ते फक्त ओरडतात इथे खेळू नका. मग आम्ही खेळायचे कधी आणि कुठे? मी म्हणाले दुपारी घरात खेळा. तर आलोक म्हणाला,"मी घरात असलो की टीव्ही पाहत बसतो,मग आई ओरडते आणि खेळायला बाहेर पाठवते". स्निग्धा म्हणाली,"आई मला पुस्तक नाहीतर पेपर वाचायला सांगते. पेपर मी सकाळी वाचते आणि पुस्तक रात्री झोपण्याआधी वाचतेय मग दुपारी पण मी तेच का करू? मला खेळायचे असते." सई म्हणाली,"दिवसभर घरात कोणीच नसते मला घरात बसायचं कंटाळा येतो." विराज म्हणाला," मी घरात असलो की मोबाईलवर गेम खेळत बसतो. आई ओरडते.मित्रांबरोबर खेळ म्हणते."  मुलांची कारणे तयार होती. कोणाचे काय आणि कोणाचे काय. शहरात जवळजवळ किंवा अगदी लागून लागून असलेल्या इमारती असतात त्यामुळे मुलांना खेळायला मोकळी जागा, मैदान असे राहिलेच नाहीये.  पूर्वी आम्ही लहान असताना आजोळी नागपूर ला जायचो. घरात सगळी भावंडे मिळूनच आम्ही ८ ते १० जण असायचो. घराभोवती मोकळी जागा असायची. सगळे मिळून खेळायचो.  असेच आई कडे पण बैठे घर असल्यामुळे आजूबाजूला भरपूर जागा होती खेळणे मनसोक्त असायचे. कोणी ओरडायचे नाही की रागवायचे नाही. आता फ्लॅट सिस्टीममुळे आजूबाजूला मोकळी जागाच राहिलेली नाही. जिथे मुले मनसोक्त खेळू शकतील. मुलांना घरात खेळण्यापेक्षा बाहेर खेळायचे असते. खेळ हा मुलांच्या शारीरिक तसेच मानसिक वाढी साठी महत्वाचे आहे. समजूत काढून मी त्यांना घरी पाठवले. माझे विचारचक्र सुरू झाले. आज माझ्या सोसायटीमध्ये झालेल्या प्रसंगामुळे मला इतर सोसायटीतील मुलांचा विचार मनात येऊ लागला खरचंच मुले काय करत असतील? काय खेळत असतील? 

    माझी मैत्रीण सौ दीप्ती जोशी जी सोयकॉलॉजिस्त व फॅमिली कौन्सिलर आहे मी तिच्याशी बोलायचे ठरवले. वरील प्रसंग तिला सांगितला तर ती म्हणाली," मुलांचा सर्वांगीण विकास खेळाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होतो. एकमेकांमध्ये मिसळून, खेळणे, भांडणे, वादविवाद, मारामारी, या सर्वातून सर्व भावनांना वात करून दिली जाते. शिवाय व्यक्तिमत्व विकास , लाईफ स्किल सारखे क्लासेस लावण्यापेक्षा खेळा खेळातून शेअरिंग , केअरिंग, अडजस्टींग, लीडर शिपचे अनेक धडे  आपोआप मिळतात. शिवाय मुले अनुकरण प्रिय असतात. त्यामुळे चांगल्या सवयी चांगल्या संगतीने जडतात. चुकून कोणाला वाईट सवय असेलच तर इतर मुलांच्या संगतीने आपोआप प्रेरणा घेतली जाऊ शकते व वाईट सवय सोडून चांगल्या सवयी अंगी बाणू शकतात. सोबतीला खेळायला कोणी मुले नसतील तर मूल एकटे खेळून कंटाळत असते. मग टीव्ही किंवा मोबाईल कडे मोर्चा वळवत असते. आईवडील ही मुलांच्या एकटे पानावर हतबल होतात आणि यातूनच सुरू होते मोबाईल आणि टीव्ही चे अडिक्शन." 


खरचंच मुलांच्या वाढी साठी खेळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मुलांच्या गरजांकडे लक्ष देणे ही पालकांची जबाबदारी आहे. पूर्वी घरात मुलांचे प्रमाण २-३ अपत्य असतं पण आता आई वडील एकाच अपत्यावर थांबतात. आणि त्यामुळे मुलांचे शेअरिंग, केअररिंग आणि अडजस्तींग या गोष्टी घरात होत नाहीत या गोष्टी मुलांनी त्यात्या वयात शिकणे आवश्यक आहे असे मला वाटते. 


याबाबत मी आमच्या फॅमिली डॉक्टर , डॉ . दीपक रासने यांच्याशी बोलले तर ते म्हणाले ,"वृद्धांची समस्या पण योग्य आहे. ठराविक वयानंतर सहनशक्ती कमी कमी होत जाते. आवाज सहन न होणे, छातीत धडधडणे या गोष्टी होणे स्वाभाविक आहे. त्यासाठी वृध्द मंडळींना आरामाची नितांत गरज असते. ही गरज लक्षात घ्यावी.असे त्यांना वाटते.


मुले सुट्टीमध्ये संपूर्ण वेळ घरीच असतात.बाकी रोजच्या दिनक्रमाप्रमाणे दिवसभर ते शाळा, क्लासेस, इतर उपक्रमात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचे खेळणे होते ते थेट संध्याकाळीच तरी ही मला असे वाटते की, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आता नवनवीन संकल्पना पुढे येत आहेत त्यापैकी एक children friendly society. आज नवीन घर घेताना या गोष्टीची विचारणा होताना दिसते आहे. असे म्हणता येईल की, या गोष्टीला प्राधान्य दिले जात आहे. त्या दृष्टीने क्लब हाऊस चा वापर वाढला आहे. प्रत्येक सोसायटी मध्ये अशी एक जागा असावी जिथे मुलांना खेळता येईल. अगदी मनसोक्त खेळता येईल. त्यांच्या खेळण्याचा त्रास कोणालाही होणार नाही. मुलांना बैठे खेळ खेळता येतील याची सोय तिथे केली जावी, फक्त सुट्टीत च नाही तर इतर दिवशीही मुले खेळू शकतील. इनडोअर आऊटडोअर खेळ खेळू शकतील. मला ही संकल्पना मनापासून आवडली. आपणच मधल्या पिढीने आपल्या मागच्या आणि पुढच्या पिढीला सांभाळायचे आहे त्याकरिता दोघांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. मला वाटते आपण ही  संकल्पना समजून घेऊन प्रत्येक सोसायटी मध्ये आपापल्या पद्धतीने रूजवावी. तर मग तयार आहात ना children friendly society   साठी , ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी🙏🏻 

©kkdhanashree

Comments

  1. खूपच सुरेख लिहिलं आहे. मुलांना खेळायला कॉमन जागा हवीच.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद