एक रविवार फक्त राजगड

शनिवारी संध्याकाळ येते ती रविवारचे नवीन बेत घेऊनच. मग काय चर्चा आणि शेवटी एखादा गड चढून येणे. मग ठरवते, चला उद्या किल्ला चढून येऊ. मग कोणते कोणते एक दिवसात होणारे आहेत ते आधी पाहिले. मग ठरले की राजगड किंवा सिंहगड. आम्ही तिघे आणि भाचा असे आम्ही चौघे जाऊयात असे नक्की झाले. मग काय रविवार सकाळ काही तरी नवीन घेऊन आली. सकाळी बरोब्बर ६.१० ल घरून निघालो.बरोब्बर ७.३० पर्यंत राजगड च्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो. कडाडून भूक लागली होती मग पोहे खाल्ले. काहीही गरम खायला मिळाले की बस तूट पडो. त्यानंतर मिशन चढण आणि निघालो गड चढायला. जरा चढून वर गेलो आणि समोर पाहिले तेव्हाच वाटले अरे कुठे आलो आपण.
मग काय १६ व्या मिनिटालाच मी वैतागले आणि नवऱ्याला म्हणाले "उगाच आले मी". मग काय तोही चिडला आणि म्हणाला "जा मग इथूनच परत." जरा चिडचिड झाली पण चालणे सुरूच होते. तो अधे मधे सांगत होता आता जरा चढण आहे मग सपाट आहे पुढे मग सरळ चालायचे आहे . परत थोडे पुढे गेल्यावर आता चढण झाली की परत सपाट आहे." अरे देवा किती चालायचे ते" मनात सारखे हेच होते. त्यात चढायला सुरुवात केली आणि माझे फ्लोटर्स नी रंग दाखवायला त्यातला उजव्या पायाचा सँडल तुटला. झाले आता अजुन त्रास म्हणून मी जास्तच वैतागले. त्यात मुलांना इतका उत्साह होता की आम्ही मागे हे किती तरी पुढे पुढे जातच होते. मग त्यांना थांबवून जरा रागावलो. मग सगळे एकत्र चढायला सुरुवात. मधे च भाच्याच्या मागे गाय लागली तर कधी भुंगासारखा त्याच्याजवळ यायचा. तो आधीच भित्रा. मग पुढे गेलो की थांबा पाणी पाहिजे, जर २ मी बसू, असे करत करत जरा थांबत थोडे चालत कसे बसे गड चढलो आणि चोर दरवाजा पाशी आलो. हुश्श झाले! चढलो गड म्हणून. तर त्या दारातून आता शिरताना दरवाज्याची उंची कमी आहे हे लक्ष ना आल्या मुळे वर काय आहे पाहण्यासाठी डोके वर केले आहे जोरात डोक्याला भिंत लागली." अरे यार कुठे आले मी" परत चिडचिड. मग वर गेलो तर उन्ह वर यायला सुरुवात झालेली. पण वारे थंड होते. वातावरण आल्हाददायक होते. जरा बरे वाटले. एक पद्मावती देवीचे मंदिर आहे तिथे दर्शनाला गेलो. तिथेच जरा थांबून सफरचंद खाल्ले. एनर्जी आली. मग परत पुढे बालेकिल्ला चढायला सुरुवात केली. हळू हळू वर चढत होतो. तिथे गेलो आणि ही मोठी ओळ पाहिले वाटले जाऊ दे नको जायला. पण नवरा हट्टी आणि त्याच्या पुढे माझी नाही म्हणायची काय बिशाद. चुपचाप रेलिंग ला धरून चढलो. चढताना हाच विचार की, का आलो आपण इथे? चढण सोपे नाही हे ही नीट समजले. पण भाचा आणि मुलाचा उत्साह चांगलाच होता. वर जाऊन आलो परत खाली यायचे तर परत उतरणे म्हणजे दिव्यच. नक्की पायऱ्या होत्या का फक्त दगड रचलेले होते तेच समजत नव्हते. हळू हळू उतरत कधी बसत असे करून कसे बसे उतरलो. मग हत्ती नेढे बघायला निघालो. मध्येच एकदम ७-८ माकडे समोर आली. मग पुढे एक बुरुज पाहायला निघालो, तिथे गेलो आणि ठरले की आधी हत्ती नेढ पाहुयात. हत्ती नेढ्याचे नामकरण भाच्याने आणि मुलाने पेढा, पेडा, पेड, नेन, मेड वगैरे केलेले होते. चालत चालत तिथे पोहोचलो आणि परत ते नेढे पाहायचे म्हणून चढावे लागणार हे कळले की परत माझा वैतागलेला चेहेरा आलाच. तेवढ्यात मुलगा म्हणाला "आई! त्या आजी चढल्या मग तू पण चाढाशिल" हे ऐकले आणि मी जोरजोरात हसायला सुरूवात केली. तो ज्यांना आजी म्हणाला त्या ४० च्याआसपास वय असणाऱ्या एक काकू होत्या. मग तिथे चढलो. खरच खूप छान वाटले. आपण खूप गोष्टी एन्जॉय करायला मुकतो असे वाटले तिथे ५ मिं बसून खाली उतरलो. मग चिडचिड कमी झाली होती की खरच खूप गोष्टी छान आहेत इथे पाहण्या सारख्या. परत सदरे पर्यंत चालत आलो तिथे सँडविच खाल्ले ( अर्थात नेहमी प्रमाणे, सगळे घरून जिन्नस नेले होते). जरावेळ थांबलो. मग आधी एक वेळ माझ्या सँडल ल गुंडाळली. म्हणजे बांधली. जरा चालायला त्याने त्रास होत होता. ती टोचत होती. पण काय करणार नाइलाज को क्या इलाज. then back to pavellion. उतरला सुरूवात केली. चढताना चढलो पण उतरणार कसे आता. पण हळू हळू २ तासात उतरलो. कुठे थांबत तर कुठे भुंगा सोहम च्या मागे लागला, मग परत सँडल ने चालता येईना, असे करत करत खाली आलो मध्येच रस्ता पण चुकलो पण आलो. खाली आल्या आल्या आधी थंड गार लिंबू सरबत प्यायलो. हुश्श झाले. आणि गंगेत घोडे न्हाले. अशा रीतीने मुलाच्या मते आम्ही एक गड सर केला.
©KKDhanashree 

Comments

  1. तुझ्या शब्दांबरोबर आमचीही राजगडची सफर छानच झाली !

    ReplyDelete
  2. मस्तच अगदी तुझ्या सोबत जाऊन आल्यासारखं वाटले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद