मृगगड आणि पायमोडीची वाट
एक आटपाट नगर होत अशी सुरुवात झाली की डोळ्यासमोर जसे गाव येते तसेच एक गाव - भेलिव . आजूबाजूने डोंगर रांगा, गावात जाणारा एकच गाडी रस्ता, छान मंदिर परिसर, त्याच्या बाजूला टुमदार घरे, घरांच्या मधून आखीव रेखीव गावातला रस्ता, गावकऱ्यांची सकाळची लगबग, एका घरातील नीटनेटकी खोली आणि खोलीत गरम गरम पोहे खाणारे मावळे..... अहाहा SSS.... अशी सुंदर आणि चविष्ट सुरुवात झाली मृग गडाच्या भ्रमंतीला! ही सुरुवात करून वाटाडे मामांना घेऊन गटाने मृग गडाकडे कूच केले. या गटाचे प्रताप भेलीव गावात पण बहुतेक पोहोचले असावेत कारण एक से भले दो म्हणत वाटाडे मामांनी - साठे मामांनी त्यांच्या साथीला - राहिलेले दोर कापायला - शेलार मामांनापण - बरोबर घेतले. गडाच्या वाटेवर छान जंगल आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. गड चढताना काही गुहा दिसतात. त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण गुहा बघायला मिळाली. गुहेत जाण्यासाठी साधरण ३ फुटाचा बोगदा आहे. या बोगद्यातून आधी साधारण २० फूट सरळ, मग ५ फूट काटकोनात उजवीकडे, मग ३ फूट खाली आणि शेवटी ५ फूट डावीकडे गेले की आपण त्या छ...