निसर्ग देवाचा खेळ
एकदा काय झाले, सूर्यदेव आणि वरूण देव हे दोघे मोबाईलवर इंटरनेट वापरून व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादीवर खूप मग्न झाले होते. हे भगवान विष्णूंनी बघितले आणि त्यांनी दोघांनाही सांगितले की तुम्ही जर हे सोडून पटाचा डाव खेळलात तर मीही त्या खेळात तुम्हाला सामील होईन. आता भगवान विष्णूंनी सांगितले म्हणल्यावर सूर्यदेव आणि वरूण देव पट खेळायला बसले. पटावर बऱ्याच सोंगट्या आणि काही फासे होते. दोघांनीही आलटून पालटून फासे टाकण्याचे आणि सोंगट्या हलविण्याचे ठरविले. असा हा खेळ सुरू झाला आणि पटावरील सोंगट्या हालायला लागल्या. सोंगटी १ : सूर्य देवाने फासे टाकले आणि पहिली सोंगटी हलवली. चैत्र महिन्यात पृथ्वीवर भरपूर ऊन पाडले. लोकांना घामाच्या धारा येऊ लागल्या. सूर्यदेव नुसते तळपत होते आणि हसत होते. सोंगटी २ : सूर्य देवांचा हा प्रताप पाहून वरूण देव गालातल्या गालात हसत होते. त्यांनी पण हळूच एक सोंगटी हलवली. ही सोंगटी कुठली तर नियोजन समितीची एक बैठक झाली आणि त्यात यावर्षी कोणते गड किल्ले किंवा घाटवाटा करायच्या हे ठरले. सोंगटी ३ : आता पटावरील सोंगट्य...